वणीतील मटका: पोलीसांचा मौनाशिर्वाद?
वणीतील मटका: पोलीसांचा मौनाशिर्वाद?
वणी शहर एकेकाळी अवैध मटक्यापासून मुक्त झाले अशी वलग्ना आपली दुनियादारीच्या हाती आलेल्या चित्र फितीतून सपशेल फोल ठरली आहे मोबाईलवर गुप्त व्यवहार करून हा खेळ कधीमधी सुरू असायचा. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बसस्थानकापासून इंदिरानगर टेकाडीपर्यंत मटक्याच्या पेढ्या उघड्यावर खुलेपणाने सुरु आहेत. आहेत. रोज लाखोंची उलाढाल, उच्चभ्रूंचा सहभाग आणि उघड्यावर मांडलेले बिटर्स टेबल – हे दृश्य पोलिसांच्या डोळ्यासमोर घडत आहे.
प्रश्न असा आहे की हा मटका कुणाच्या कृपाशिर्वादाने सुरू आहे.?
पोलिस ठाण्याच्या जवळच अवैध धंदा सुरू असेल तर ते सामान्य नागरिकांच्या निदर्शनास येते, पण यंत्रणेला दिसत नाही? हे फक्त दुर्लक्ष आहे की जाणूनबुजून दिलेला वरदहस्त?
शहरातील नागरिकांच्या मनात संताप आहे. कारण बेकायदेशीर धंदा वाढला की त्यासोबत गुंडगिरी, दादागिरी, गटबाजी अनिवार्यपणे वाढते. निवडणुका जवळ आल्या की असे अवैध धंदे राजकीय फायद्यासाठी कसे वापरले जातात, हे महाराष्ट्रातील अनेक शहरांनी अनुभवले आहे.
आज वणीची शांतता धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
ज्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आदर्श ठेवला पाहिजे, त्यांच्याच सहभागातून अवैध मटका फोफावत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जर हे खरे असेल तर प्रशासन आणि राजकारणाचा संगनमताचा आरोप नागरिकांनी चुकीचा कसा ठरवायचा ?
वरिष्ठ अधिकाऱ्यांना याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. अन्यथा “पोलिसांची कृपादृष्टी” हा आरोप लोकांच्या मनात पक्का होईल आणि वणीच्या शांततेला तडा जाईल.



