नाशिक ग्रामीण पोलीस दल:सुरक्षित गाव, सक्षम प्रशासन ! जिल्हयातील पोलीस पाटीलांसाठी कार्यशाळेचे आयोजन
नाशिक ग्रामीण पोलीस दल:सुरक्षित गाव, सक्षम प्रशासन ! जिल्हयातील पोलीस पाटीलांसाठी कार्यशाळेचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात “महाराष्ट्र पोलीस पाटील (पद स्थापना व निवड) अधिनियम १९६७ नुसार पोलीस पाटील पद अस्तित्वात आले. त्याआधी या पदाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली होती. सन १९६७ पासून त्याला कायदेशीर स्वरूप मिळाले आहे. पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील पदाची जबाबदारी महत्वपुर्ण ठरते. पोलीस पाटील हा गावाचा केंद्रबिंदु असल्याने गावातील सर्व घडामोडी त्यांना अवगत असतात. त्याअनुषंगाने मंगळवार दिनांक १९/०८/२०२५ रोजी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे महाकवी कालिदास कला मंदीर, नाशिक येथे “पोलीस पाटील कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे उपस्थित होते. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी प्रमुख अतिथीचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रम प्रसंगी जिल्हयातील गावपातळीवरील सुमारे ७५० पोलीस पाटील, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, प्रसार माध्यामांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
पोलीस पाटील हे प्रशासकिय कामात महत्वाचा आधारस्तंभ ठरतात, गावपातळीवरील माहिती संकलन, आपत्ती व्यवस्थापन व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. यावेळी आयोजित कार्यशाळेत नवीन फौजदारी कायदेविषयक ज्ञान, पोलीस पाटलांचे कर्तव्य, अधिकार व मर्यादा, पोलीस पाटलांचा पूर्व इतिहास, पंचायत राज संस्थेवा महत्वाचा घटक, पोलीस पाटलांचे योगदान, पोलीस पाटील व पोलीस यांमधला दुवा, पोलीस पाटलांच्या कर्तव्याचा समाजावर होणारा चांगला परिणाम, कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीसांना होणारी मदत, पोलीस पाटलांनी ठेवावयाचे रजिष्टर, रजिष्टरमध्ये करावयाच्या महत्वाच्या नोंदी, गुन्हेगारी नियंत्रण, अवैध व्यवसाय समुळ उच्चाटन, तंटामुक्त गाव, सण-उत्सवादरम्यान राखावयाची शांतता व सुव्यवस्था, शांतता समिती सदस्य अशा अनेक मुद्यांवर पोलीस पाटलांच्या भुमिकेचे महत्व विषद करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथींनी उपस्थित पोलीस पाटलांना त्यांचे कर्तव्य व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ मुक्त गाव ही संकल्पना राबवुन, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरूध्द लढण्यासाठी जनजागुंती निर्माण करावी यासाठी देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस पाटलांना सदर पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले. सदर मार्गदर्शिकेत नमुद केलेले पोलीस पाटलांचे कर्तव्य व अधिकार याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी उपस्थितांना यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. कल्पेशकुमार चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हयातील बेरोजगार तरूणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उपस्थित असलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी यांचेमार्फतीने उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन करण्यात आले व खेडोपाडयांतील शिक्षित तरूणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रशासनाच्या मदतीसाठी कर्तव्य बजावणा-या पोलीस पाटलांचे यावेळी प्रमुख अतिथीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. पोलीस पाटलांच्या कार्यामुळे प्रशासनाचे काम सुकर होत असून, भविष्यातही त्यांच्याकडून अशाच प्रकारे सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांनी केले. सदर कार्यक्रमप्रसंगी नाशिक शहरावे पोलीस आयुक्त संदिप कर्षिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिस्खेलकर, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रविंद्र मगर, पोलीस निरीक्षक मानव संसाधन विभाग राहुल मोरे, पोहवा ज्ञानेश्वर शेलार, यांचेसह नाशिक विभागातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, प्रसार माध्यामांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव असे उपस्थित होते.



