नियतीचा हेतू कर्तव्यातून साधणारा कर्तव्यदक्ष मित्र ; नावातच पी आर असलेले पो. अधीक्षक पाटील जपताय सामाजिक संस्कार
नियतीचा हेतू कर्तव्यातून साधणारा कर्तव्यदक्ष मित्र ;
नावातच पी आर असलेले पो. अधीक्षक पाटील जपताय सामाजिक संस्कार
माणूस जन्माला येतो, तेव्हाच नियतीने त्याच्या आयुष्याचे वेळापत्रक मांडून जबाबदारी निश्चित केलेली असते. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच प्रवृत्ती याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्याचे उद्दिष्टही वेगळे असते. हेच वेगळ्या शब्दात सांगायचे म्हटले तर प्रत्येकाला नियतीने सोपवलेली जबाबदारी पार पाडूनच आयुष्याचा निरोप घ्यायचा असतो. ही जबाबदारी कोण कशी पार पाडतो त्यावर त्याच्या आयुष्याचे यश अपयशाचा लेखा जोखा मांडला जातो. त्यावरच त्याच्या आयुष्याची किंमत ठरते. म्हणूनच कोण किती जगले यापेक्षा कसे जगले हे महत्वाचे, असे म्हटले गेले आहे. यातील कसे या कर्म विशेषणाला अनन्य साधारण महत्व आहे. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. मात्र काही ठराविक व्यक्तींच्या कामाची चर्चा होते. विवेक आणि चिकित्सेचे परिमाण वापरून अशा व्यक्तिमत्वाच्या कामाची तुलना त्याच इतरांशी केली जाते. तेंव्हा अशा वेगळेपण जपणाऱ्या महानुभवांना विशेष म्हणून संबोधले जाते.
खरे तर अशी विशेष व्यक्तिमत्वाची माणसं आपल्या सहकाऱ्यांपेक्षा वेगळं काहीच करत नसतात. त्यांची पद्धत मात्र वेगळी असते. त्यांचे हेच वेगळेपण समाजाला त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यास भाग पाडते.
पोलीस खात्यातील कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पी आर. पाटील हे त्यातलेच वेगळे नाव. त्यांचे नाव उच्चारताच मोठ-मोठ्या गुन्हेगारांच्या उरात धडकी भरते प्रामाणिक माणसाला मात्र ते खाकी वर्दीतील देव माणूस वाटतात.त्याचे कारण पोलिस खात्यात काम करताना बालपासून झालेल्या संस्कारांशी राखलेला प्रामाणिकपणा.
महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणाऱ्या बळीराजाच्या कुटुंबात झालेले संस्कार आयुष्यात खांद्यावर पडलेल्या प्रत्येक जबाबदारीशी निष्ठा ठेवण्याची शिकवण देतात हेच पी आर पाटील या पोलिस अधिकाऱ्याने दाखवून दिले.
सरूड (ता. शाहूवाडी ) येथील पी. आर. पाटील नावाच्या या व्यक्तीमत्वाने कोल्हापूरच्या रापलेल्या मातीतून घेतलेले संस्कार पावलोपावली जपले. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विक्रीकर निरीक्षक, तहसिलदार, पोलिस उपअधिक्षक, पोलिस उपायुक्त ते पोलिस अधिक्षक (आय.पी.एस) पदापर्यंतचा त्यांचा २४ वर्षाचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.सरुड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पी. आर. पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरुड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण मलकापूर येथे झाले. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली. दोनच वर्षामध्येच त्यांनी विक्रीकर निरीक्षक परिक्षेत यश सपांदन केले. त्यांनतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेतुन १९९८ मध्ये त्यांची तहसिलदारपदी निवड झाली. पंरतू एवढयावर समाधान न मानता मुंबई उपायुक्त विश्वास नांगरे – पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन १९९९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतुनच त्यांनी पोलिस उपअधिक्षकपदाला गवसणी घातली.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक म्हणून प्रथम त्यांची जळगाव येथे नेमणूक झाली. प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर अचलपूर (जि. अमरावती ) येथे त्यांची नेमणूक करण्यात आली. अचलपूर बरोबरच त्यांनी पंढरपूर,पुणे ग्रामीण ( राजगुरुनगर) येथेही पोलिस उपअधिक्षक म्हणून उत्तम सेवा बजावली. त्यांनतर पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.पुण्याहुन त्यांची नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. त्यांनतर त्यांची कोल्हापूर नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली.. येथे सेवा बजावत असतानाच पाटील यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये पोलिस अधिक्षकपदी (आय.पी.एस) म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी नंदुरबारचे पोलिस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले.सध्या ते पुणे येथे राज्य गुन्हे शाखेचे अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.आजपर्यंतच्या त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना मुंबईचे उपायुक्त विश्वास नांगरे – पाटील, पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले हे ते आवर्जून सांगतात.
सरूड गाव हे पोलिस अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. खरे तर पी.आर. पाटील यांच्या स्पर्धा परिक्षेतील यशानंतरच गावात किंबहुना शाहूवाडी तालुक्यात खऱ्या अर्थाने स्पर्धा परिक्षेचे वारे वाहु लागले. पी. आर. पाटील यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तसेच परिसरातील अनेक युवकांनी स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले आहे.
गावाकडच्या संस्कारात वाढलेले हे व्यक्तिमत्व त्याच संस्काराची शिदोरी कायम सोबत ठेवून पोलिस खात्यात सेवारत राहिल्याने कर्तव्य बजावताना कठोर दिसणारे,प्रसंगी खाकी वर्दीतील माणूसकीचा झरा सतत वाहत ठेवणारा देवमाणूस म्हणूनच अधिक चर्चेत आहे. प्रसंगी स्वतःची पदरमोड करून गोर-गरीबांच्या मदतीला धावून जाणारा अधिकारी म्हणजे पी आर पाटील, अशीच त्यांची ख्याती आहे. भारतीय पोलीस सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी, पत्रकारितेतील एका सामान्य पत्रकाराशी मैत्री होणे तसे दुरापास्तच.. पण त्यांची कर्तव्य निष्ठता त्यांच्याकडे खेचून गेली. आणि त्यांच्या संस्काराने त्यांच्या अंगी बाणलेल्या विनम्रतेने ते खेचणं स्वीकारलं. अशा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी माझ्यासारख्या सामान्य पत्रकारांशी मैत्री होणं तशी फार दूरची गोष्ट. समोर उभे राहून संवाद साधण्याचीही पात्रता नाही, ही आपली सोज्वळ धारणा. मात्र वर सांगीतल्याप्रमाणे मैत्रीला कुठलेही बंधन रोखू शकत नाही याची जाणीव नंदुरबारमधील त्या वर्षभराने करून दिली. आणि वर्दीतला हा माणूस सख्खा मित्र कधी झाला हे काळालाही समजले नाही. मैत्री झाली म्हणजे दोन्ही बाजूला विश्वासार्हतेचे एक बंधन आपसूकच चिकटते. त्या विश्वासार्हतेला जागलं की मैत्री निभावणे अवघड नाही, याचा अनुभव या वर्षांने दिला. पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर आहेत म्हणून त्यांच्या मैत्रीचा नको तितका फायदा उपटणारेही या काळात जवळून पहायला मिळाले. त्यांच्या मैत्रीच्या नावावर स्वतःच उखळ पांढरे करून घेत बदनामीचा वाटा मित्राच्या ताटात सरकावणारे पाहीले. तरीही केवळ मैत्री निभावण्यासाठी मित्राची चुक पोटात घालून स्वतःला दंडीत करणारा असा मित्र अलिकडच्या काळात शोधूनही सापडणार नाही.मधल्या काळात घडलेल्या अनेक घडामोडी या मित्राच्या मैत्रीची साक्ष काढणाऱ्या ठरल्या. पुणे सी. आय. डी. पोलीस अधिक्षक म्हणून काम करतांना आपल्या कार्यक्षेत्रात कायदा सुव्यस्थेला प्राधान्य तर दिलेच. एरवी कुठलाही पोलीस अधिकारी आपल्या चौकटीत राहून काम करण्यास प्राधान्य देतो. म्हणजे घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल करणे आणि दाखल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सहकारी अधिका-यांना मार्गदर्शन करणे ही साधारण चौकट ठरलेली. या चौकटी पलिकडे जाऊन काम करण्याचे धाडस फार थोडे अधिकारी दाखवतात. पी आर पाटील हे त्यापैकीच एक आहेत. हा अनुभव प्रकर्षांने मिळाला. ज्या समाजाने आपल्याला घडवले त्या समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो, ही बांधिलकीची भावना त्यामागे आहे.ही बांधोलकी निभावतांना समाजाला वेठीस धरणाऱ्या नाठाळ प्रवृत्तींना कायद्याची जरब बसवली. उदाहरणे किती देणार? ते सर्वश्रुत आहेच. तरीही शेतकरी आणि तरूणाईला वाचविण्यासाठी त्यांनी उचललेली पाऊले कौतूकास्पद म्हणावे लागतील. अडचणीच्या काळात मदतीला धावून येतो,तोच खरा मित्र हो मैत्रीची खरी जाणही या काळात नव्याने झाली.जेव्हा जेव्हा समाजातील गरजवंतावर अन्याया झाला,तेंव्हा तेंव्हा मदतीचा हात तात्काळ पुढे आला.असा हा मित्र जिल्हा पोलीस दलातही कुटूंब प्रमुखाच्या भुमिकेत वावरत असल्याने हवाहवासा वाटणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते.अशी मैत्री जन्मोजन्मी लाभावी, अशी इच्छा कुणाला उत्पन्न होणार नाही! म्हणूनच या मित्राला वाढदिवसानिमित्त अनंत कोटी शुभेच्छा!
शुभेच्छुक
प्रशांत हिरे, कार्यकारी संपादक, रयतेचा आवाज
आणि मार्कंडेय प्रकाशन आणि आपली दुनियायादारी न्यूज पोर्टल, यू ट्यूब चॅनेल परिवार