छेड काढणे पडले महागात; विद्यार्थिनींनी वाहकाला चपलेने दिला चोप; संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको
छेड काढणे पडले महागात;
विद्यार्थिनींनी वाहकाला चपलेने दिला चोप;
संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको
दापोली –प्रतिनिधी
सर्वत्रच महिलांची असुरक्षितता वाढत असतांनाच सर्वांत सुरक्षित सेवा देणार्या एस्.टी.मध्येही विद्यार्थिनीची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील दापाली-कोळथरे एस्.टी. बसमध्ये घडला. छेडछाडीची घटना समजल्यानंतर प्रवासी आणि ग्रामस्थ यांनी बसला घेराव घालत एस्.टी. वाहकाला जाब विचारला. या वेळी संतप्त विद्यार्थिनींनी एस्.टी. वाहक मजिद मेहबूब तांबोळी याला चपलेने मारले. या घटनेची माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रस्ता अडवून आरोपी वाहकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
नेमके काय घडले?
९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ च्या दापोली कोळथरे गाडीत वणौशी येथून पंचनदी येथील कनिष्ठ महाविद्यालयाकडे प्रवास करत असतांना वाहक छेडछाड करत असल्याची तक्रार ११ वीत शिकणार्या युवतीने केली.
. त्यामुळे गाडीत गोंधळ उडाला. गाडी थांबवण्यात आली. गाडीभोवती ग्रामस्थही गोळा झाले. ग्रामस्थांनी वाहकाला गाडीतून खाली उतरवले आणि जाब विचारला.
. या वेळी वाहकाला चोप देतांना ‘तुझ्या मुलीची छेड काढायला कुणाला पाठवू का? मग तुला काय वाटेल ? तू यापुढे बांगड्या भर आणि ‘ड्युटी’ कर… तुझी ही कसली एस्.टी. ची सेवा !’, असे विचारत चपलेने चोपले. या वेळी अन्य विद्यार्थिंनींही चोप दिला.
. याविषयी संबंधित विद्यार्थिंनीने सांगितले की, २ दिवसांपूर्वी प्रवास करत असतांना गाडी बस थांब्याजवळ आल्यानंतर वाहकाला ‘बेल’ मारायला सांगितली; मात्र त्याने गाडी न थांबवता गाडी पुढे आघारी गावात नेली. आघारी येथून परत येत असतांना ‘तुला आज फिरवून आणले’, असे तो बोलला. आज तर त्यांने माझ्या पायालाही स्पर्श केला.
वाहकावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी:-
पंचनदी गावातील ग्रामस्थांनी वाहकाला जाब विचारला. त्याच्याकडे त्याचे कोणतेही ओळखपत्र नसल्याने ग्रामस्थ अधिक संतप्त झाले. या वेळी पोलीस घटनास्थळी पोचल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी, ‘वाहकावर कारवाई झालीच पाहिजे’, अशी मागणी केली.
एस्.टी. महामंडळाच्या अधिकार्यांनाही ग्रामस्थांनी जाब विचारला. ग्रामस्थ म्हणाले, ‘‘वाहकाकडे त्याची कोणतीही ओळख देणारा पुरावा का नाही ? प्रत्येक चालक आणि वाहक यांना देण्यात येणारा ‘बॅच’ही त्याच्याकडे नाही. त्यामुळे तुम्ही नक्की या लोकांची कोणती कागदपत्रे तपासता ? तुम्हीच अशा लोकांना पाठीशी घालता असे म्हणत वाहकावर कारवाईची मागणी केली. या वेळी अधिकार्यांनी ‘वाहकावर योग्य ती कारवाई केली जाईल’, असे सांगितले.