जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर;राजापूर (संगमनेर) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शाहीर विठ्ठल उमप यांचे नाव;आयटीआयनी ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ वाढविण्याची गरज- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर;राजापूर (संगमनेर) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शाहीर विठ्ठल उमप यांचे नाव;आयटीआयनी ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ वाढविण्याची गरज- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर प्रतिनिधी:-
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राजापूर आयटीआयचे शाहीर विठ्ठल उमप असे नामांतर करण्यात आले आहे.राजापूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राजापूर येथे प्राचार्य यु.डी.पालवे, शाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप, जिल्ह्यातील सर्व आयटीआयचे प्राचार्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी आयटीआय कार्यरत आहेत. यापैकी १०८ आयटीआयना त्या जिल्ह्यातील थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांची नावे देण्यात येत आहेत. आयटीआयचे नामांतर ही ऐतिहासिक घटना आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातून तरूणांना रोजगाराबरोबर कुशल करण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना करावे लागणार आहे. काळानुरूप तंत्रज्ञानात बदल होत असून आयटीआयनी ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ अधिकाधिक वाढवण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.शाहीर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या शाहीरीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव साता समुद्रापार उंचावले. शाहीर उमप यांच्या लौकीकाला साजेसे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे चिकनी (संगमनेर) येथे शाहीर विठ्ठल उमप यांचे स्मारक साकार झाल्याचे संदेश उमप यावेळी म्हणाले.
या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात झाला बदल
अहिल्यानगर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कै. माणिकराव नरसिंगराव पाटील, श्रीगोंदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री संत शेख महंमद महाराज, कर्जत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री संत शिरोमणी गोदड महाराज, शेवगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्वातंत्रसेनानी पद्मभूषण बाळासाहेब भारदे, श्रीरामपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्व. जयंतराव ससाणे, कोपरगाव श्रीरामपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्व. सूर्यभान पाटील वहाडणे, राहाता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, मवेशी (ता. अकोले) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डॉ. गोविंद गारे, केळी कोतुळ (ता.अकोले) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक, अकोले व राजूर (ता.अकोले) या दोन्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे क्रांतिकारक राघोजी भांगरे, पारनेर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेनापती बापट, नेवासा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत ज्ञानेश्वर महाराज, पाथर्डी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे असे नामांतर करण्यात आले आहे.