संपादकीय : माणिकराव!शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, हा विनयभंगच!
संपादकीय : माणिकराव!शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, हा विनयभंगच!
शेतकऱ्यांशी केवळ घोषणांच्या मर्यादित प्रेमाने नव्हे, तर कृतीतून बांधिलकी दर्शवणं, हीच खरी राजधर्माची कसोटी आहे.
देशाच्या कणा असलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर आभाळ कोसळतंय, आणि सत्तेच्या पायऱ्यांवर मात्र बिनधास्त राजकारणाचं नाटक सुरू आहे. शेतकऱ्याचं दुःख, त्याचा संघर्ष, त्याचे आक्रोश हे निवडणुकांच्या घोषणा आणि फोटोसेशन्सपुरतेच वापरले जातात. त्याच्या वेदनेवर राजकारण करणं, हे केवळ शरमजनकच नाही, तर तो त्याच्या सन्मानाचा उघड विनयभंग आहे.
शेती ही आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. पण आज त्याच्या जगण्याला आणि सन्मानाला केवळ उपेक्षेची, लुटीची आणि राजकीय थट्टेची वागणूक मिळतेय. आज ज्या पद्धतीने शासन आणि राजकारणी वर्ग शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे बघत आहेत, ती एक प्रकारची भावनिक क्रूरता आणि असंवेदनशीलतेची परिसीमा आहे.
आजच्या परिस्थितीत अनेक भागांतील शेतकरी वीज, पाणी, ट्रान्सफॉर्मर, कर्जमाफी आणि हमीभाव यांसारख्या मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत. दोन-दोन वर्ष ट्रान्सफॉर्मरची वाट पाहणारे, ऊस तोडल्यानंतरही पैसे न मिळालेले, कांदा विकून तोट्यात गेलेले, शेतीचा खर्च परवडत नसलेले लाखो शेतकरी “कोण ऐकेल आमचं?” या एकाच प्रश्नाने गुदमरले आहेत. आणि तरीही सभागृहात रमी खेळली जाते,असे आरोप करण्याचे धाडस विरोधक दाखवतात. मंत्र्यांच्या तोंडून शेतकऱ्यांची थट्टा करणारे वादग्रस्त विधाने झळकतात. ही परिस्थिती भेदरवणारी आहे.
ट्रान्सफॉर्मरचा तुटवडा की व्यवस्थेचा ट्रान्सफर?
सायगाव, कोपरगाव, सिन्नर, वैजापूर, अकोले…यांसह अवघ्या महाराष्ट्रात कित्येक भागांमध्ये दोन-दोन वर्षे ट्रान्सफॉर्मरसाठी शेतकरी आर्जव करत आहेत. पिकं करपली, कर्जं वाढली, आणि आत्महत्येचा टोकाचा विचार करायला शेतकरी भाग पडतो, अवघ्या सहा महिन्यात साडे तीनशे शेतकरी आत्महत्या करतात. तरीही अधिकारी ‘फाईल चालू आहे’ असं उत्तर देतात. नेते चालूगिरी करीत असतील, अधिकारी चापलुसी करीत असतील तर फाईल चालूच राहणार! फाईल व्यवस्था ट्रान्सफॉर्मर पुरवत नाही, पण शेतकऱ्याला ‘करंट’ लागावा इतकी झळ मात्र सोसायला लावते.
कृषी मंत्रालय, वीज वितरण कंपन्या, प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शेतकरी हा यंत्र नव्हे, तो जिवंत माणूस आहे. त्यालाही भावना आहेत. त्याचे स्वप्न, त्याची अभिलाषा, त्याचे भविष्य आहे. आणि त्या सर्वांचा अपमान म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा अवमान आहे.
राजकीय नेत्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की,
शेतकरी रडतो तेव्हा पाऊसही थांबतो… पण त्याच्या अश्रूंवर सत्तेची खुर्ची ठेवली, तर ती लवकरच कोसळते.
राज्यघटनेने दिलेली जबाबदारी, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे हे मंत्र्यांचं मूलभूत कर्तव्य आहे. पण आज चित्र अगदी वेगळं आहे. कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना “तुम्ही आत्महत्या करायला मोकळे आहात” अशा उपरोधिक उत्तरांनी फटकारतंय. हे केवळ दुर्लक्ष नाही, तर शेतकऱ्याच्या अस्मितेचा जाहीर विनयभंग आहे.
पत्रकारितेची जबाबदारी
खरे पत्रकार हे “नेत्याच्या वक्तव्यावर नव्हे, तर जनतेच्या वेदनेवर फोकस करणारे असावेत.”
पत्रकार घडतो बातमीने, पण नेता घडतो भूमिकेतून, ही शिकवण शेतकऱ्याच्या लढ्याला दिशा देऊ शकते.ही भूमिका पत्रकारितेने घ्यायला हवी.
सत्तेच्या खुर्चीखाली वाहून जाणारे शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी,पेनाची शाई म्हणून वापरून लेखणीतून भ्रष्ट, शेतकऱ्यांशी प्रतारणा करणाऱ्या सत्तेविरुद्ध आग ओकायला हवी.राजकीय पक्ष सत्तेसाठी हातमिळवणी करतात, समीकरणं मांडतात, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात, पण शेतकरी कुणाच्याच अजेंड्यावर नसतो. तो फक्त भाषणात असतो, मांडवात फोटोसाठी असतो, आणि धोरणांमध्ये उपेक्षित राहतो. पत्रकारिता देखील माय बाप शेतकऱ्याला बहिष्कृत करण्याचे पाप करते. ही परिस्थिती फक्त शेतकऱ्याची नव्हे – तर लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचीही चेष्टा आहे.
“शेतकऱ्याच्या भावना पायदळी तुडवणं म्हणजे साऱ्या समाजाचा अपमान करणं आहे.”
शासन, राजकारणी आणि माध्यमं — या तिन्ही स्तंभांनी जर संवेदनशीलला सोडली तर हा ‘विनयभंग’ थांबणार नाही. म्हणूनच आज आपल्याला केवळ पत्रकार नाही, तर शेतकऱ्याचा आवाज बुलंद करणारे योद्धे जागवावे लागतील.. नेतृत्व विकासाचं खरं काम हेच आहे – सत्तेच्या आडोशाला लपलेल्या अन्यायाला उघड करणं आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या बाजूने उभं राहणं.
✍️ – कुमार कडलग
संपादक



