सूरज चव्हाणची पहाटे शरणागती, पहाटेच जामीन? व्यवस्थेच्या साशंक वेगावर छावा क्रांतीवीर सेना संतप्त
सूरज चव्हाणची पहाटे शरणागती, पहाटेच जामीन?
व्यवस्थेच्या साशंक वेगावर छावा क्रांतीवीर सेना संतप्त
नाशिक /प्रतिनिधी
वर्षानुवर्षे, पिढ्यान पिढ्या न्यायासाठी चप्पल झीजवावी लागते, तीच व्यवस्था सोईनुसार वाकवून काही तासात आपल्या बगल बच्चांना जामीन मिळवून दिला जातो. अवेळी व्यवस्थेला जागवले जाते. ही कुठली लोकशाही? असे संतप्त सवाल छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी उपस्थित केले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा पदाधिकारी सूरज चव्हाण प्रकरणावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर करण गायकर आपली दुनियादारीशी बोलत होते.
लातूर येथे चार दिवसांपूर्वी अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे शेतकरी समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी गेले असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे तथाकथित युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापती झाल्या असून, हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे.
या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात छावा क्रांतिवीर सेना, मराठा क्रांती मोर्चा आणि अन्य समविचारी संघटनांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्याय मागितला. मात्र, सुरज चव्हाणचा फक्त एक औपचारिक राजीनामा घेऊन त्याला पक्षातून न हाकलता हा प्रकार थांबवण्यात आला, हे अत्यंत खेदजनक आहे.
जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या घटनेचे गांभीर्य वाटत असेल, तर त्यांनी सुरज चव्हाण याला पक्षातून तात्काळ व कायमस्वरूपी निलंबित करावे. त्याच्याकडे असलेले पद हे ना संवैधानिक आहे, ना कायदेशीर अधिकार प्राप्त.
याशिवाय, या हल्ल्यासंदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर IPC कलमे टाळून सौम्य स्वरूपाची कलमे लावून सुरज चव्हाणला तत्काळ जामीन मिळवून दिला, हे देखील न्याय व्यवस्थेचा अपमान आहे.असा दावा करण गायकर यांनी यावेळी केला.
छावाची मागणी : लातूर पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,सुरज चव्हाणवर खालील IPC कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात यावा:
IPC 307 – जीव घेण्याचा प्रयत्न
IPC 120B – कट रचणे
IPC 147, 148, 149 – शस्त्रासह जमाव व दंगल
IPC 506 – जीवे मारण्याची धमकी
IPC 34 – सामूहिक उद्देशाने गुन्हा
. सुरज चव्हाणला राष्ट्रवादी काँग्रेसमधून कायमस्वरूपी हकालपट्टी व्हावी, यासाठी केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा.
अन्यथा, छावा क्रांतिवीर सेना व मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडले जाईल. याची सर्व जबाबदारी शासन व पोलीस प्रशासनावर असेल.असा इशारा करण गायकर यांनी दिला आहे.
या प्रसंगी छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवाजी राजे मोरे, विजय वाहुळे, मनोरमा ताई पाटील, प्रवीण पाटील, भारत पिंगळे, दिनेश जाधव, शुभम महाले, अर्जुन फरकाडे, संकेत पिंगळे, अमोल शिंदे, रुपेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“प्राप्त माहितीनुसार सूरज चव्हाण हा पहाटे लातूर पोलिसांना शरण आला. पहाटेच पोलिसांनी त्याला जामीनावर मुक्तही केले. पोलिसांची ही संशयस्पदच नाही तर राजकीय प्रभावाखाली काम करण्याची प्रवृत्ती दाखवते. सामान्य माणूस किरकोळ चूक असतांना किंवा चूक नसतानाही पंधरा पंधरा दिवस जामीन देण्याची याचना करतो. व्यवस्थे कडून त्याला न्याय मिळत नाही. मग सूरज चव्हाण कोण लागून गेला. त्याला हा वेगळा न्याय का? या प्रकरणात राजकीय पुढारी आणि पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करावी.”
-करण गायकर
संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतीवीर सेना
राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा



