विशेष संपादकीय:- संकट मोचक लीला!
विशेष संपादकीय:-
संकट मोचक लीला!
प्रत्येकाची एक सद्दी असते. निसर्गाच्या परिवर्तनशील नियमाला अनुसरून राजाचा रंक आणि राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. अर्थात त्यासाठी ज्यचे त्याचे कर्म कारणीभूत असतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एक माणूस सदा सर्वकाळ सर्वांनां फसवू शकत नाही, हाही निसर्गाचाच नियम आहे. उदय काळाच्या प्रारंभी गुण तेव्हढे दिसतात, हळूहळू अवगुण दिसायला लागले की, खरा चेहरा लोकांना समजू लागतो आणि मग इतरांचा संकटामोचक म्हणून वावरणारा चेहरा स्वतःच कोंडीत अडकतो.
भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून नावारूपाला आलेला चेहरा आज अशाच कोंडीत सापडल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकीय शिखरावर देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व उदयास आले तेव्हापासून त्यांची सावली म्हणून सतत वावरणारा हा संकट मोचक चेहरा आज अडचणीत असणारे अनेक प्रसंग महाराष्ट्रासमोर उदाहरण म्हणून सादर आहेत.
या संकट मोचक चेहऱ्याच्या मदतीला जे म्हणून महत्वाकांशी कार्यकर्ते धावत होते, त्यांना साईडलाईन करण्याचा प्रमाद कळत न कळत हातून घडला किंवा जाणीव पूर्वक केला गेला.
नाशिकच्या राजकारणातील पहिले उदाहरण द्यायचे झाले तर पूर्व विधानसभा मतदार संघांचे माजी आ. बाळासाहेब सानप यांचे देता येईल. उपमहापौर , महापौर अशी पदे पदरात टाकून या संकट मोचक चेहऱ्याने विधानसभेतही संधी दिली. “दो जिस्म एक जान” अशी उभयंतांची चर्चा तत्कालीन राजकीय वर्तुळात होती.इतकेच काय तर या दोघांची विविध व्यवसायात भागीदारी आहे असेही नाशिककर बोलत होते.
काळाच्या प्रवाहात उभयंतामध्ये मतभेद झाले, त्याचे कारण राजकारण की व्यावसायिक अर्थकारण या भानगडीत आपल्याला पडायचे काही कारण नाही. मात्र सानप यांना बाजूला सारून पंचवटीच्या म्हणजे पूर्व विधानसभा मतदार संघावर पारंपरिक पकड असलेला एक चेहरा दुसऱ्या एका राजकीय पक्षातून आयात केला आणि विधानसभेत पाठवला. अर्थात या साऱ्या प्रक्रियेत केवळ राजकीय व्यवहार पाहिला गेला असे नाही तर इतरही अनेक गोष्टींचा “अर्थ”या डीलमागे होता असे नाशिककर खुलेपणाने बोलतात.
याच दरम्यान आणखी एक उभारता चेहरा या संकटामोचकाच्या पदरी होता. अत्यंत विनयशील, गरजवंतांच्या पाठीशी खंबीर उभे ठाकणारा, दिलेला शब्द कुठल्याही किमतीवर पूर्ण करणारा आणि त्याहूनही नेत्याशी आणीबाणीच्या प्रसंगात देखील निष्ठा ठेवणारा चेहरा. होय गणेश गीते.
गेली दहा बारा वर्ष गणेश गीते हे संकट मोचक गिरीश महाजन यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत. अर्थात आता होते असे म्हणावे लागेल. कारण काही तासात ते संकट मोचक यांना सोड चिट्ठी देणार असल्याची जोरदार चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. संकट मोचकाच्या आदेशावरून पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात साम दाम या दोन्ही आयुधांचा मुक्त हस्ते वापर करणारे गणेश गीते आज अचानक या निर्णयापर्यंत का आले हा प्रश्न संकट मोचकाला अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. यंदा पूर्व मधून भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची गणेश गीते यांची तीव्र इच्छा होती. अर्थात तो त्यांचा हक्क आणि अधिकार देखील होता. यापूर्वी पक्षाने त्यांच्या पदरात केवळ आश्वासन टाकले. विधानपरिषदेवर संधी देण्याचा शब्द पाळला गेला नाही. शहर भाजपातील अन्य कुठल्याची पदाधिकारी किंवा नेत्यापेक्षा पक्षासाठी गणेश गीते यांनी अधिक झळ सोसली आहे. हे निर्विवाद सत्य भाजपेयी खासगीत मान्यही करतात. मग अशा त्याग करणाऱ्या कार्यकर्त्याला विधानसभेवर संधी दिली जात नसेल तर किती दिवस फक्त सतरंज्या उचलायच्या? आधी दिलेले सानप यांचे उदाहरण आणि गणेश गीते यांचे हे उदाहरण, गरजेचे पुरता वापर करून घेणाऱ्या प्रवृत्तीला अधोरेखित करते. अर्थात सानप आणि गीते या दोन व्यक्तिमत्वात जमीन अस्मानाइतके अंतर आहे. या दोघांची तुलना अशक्य आहे. सानप यांच्या तुलनेत गणेश गीते यांनी पक्षासह समाजातील सर्व घटकांसाठी केलेली मदत कितीतरी मोठी आहे. गीते यांच्यासाठी संकट मोचक देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हट्ट करीत असल्याचीही चर्चा आहे. त्यातील तथ्य सोमवारपर्यंत समोर येईलच.गणेश गीते यांना या हंगामात विधानसभा सदस्य होण्याची संधी मिळावी अशी केवळ पूर्व मतदार संघाचीच नाही तर अवघ्या नाशिक शहराची इच्छा आहे, हे मात्र खरे.
–कुमार कडलग
कार्यकारी संपादक सायं. नायक
संपादक, आपली दुनियादारी
सल्लागार संपादक, आपली दुनियादारी यु ट्यूब वृत्त वाहिनी



