वारकऱ्यांनाच भोंदू हिंदुत्वाचा मुखवटा फाडावा लागेल!
वारकऱ्यांनाच भोंदू हिंदुत्वाचा मुखवटा फाडावा लागेल!
हिंदुत्वाचा हा खेळखंडोबा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरु आहे.त्याची नवी आवृत्ती आता आकार घेत आहे.राजकारणात धर्म घुसवून धर्माचे काही ठेकेदार या नव्या आवृत्तीला पद्धतशीरपणे समाजाच्या गळी उतरविण्यासाठी नियोजनात्मक कार्यक्रम राबवित असून यात सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी सत्ता लोलूप, तयारीनिशी उतरलेले दिसतात. सत्तेच्या क्षणिक खेळात, काही अल्प लाभ मिळविण्याच्या नादात आपण कित्येक पिढ्यांचे,कित्येक शतकं भरून न येणारं नुकसान करीत आहोत,याचं भान या मंडळींना राहिलेलं नाही. संतांनी , महंतांनी, महापुरुषांनी, राजें महाराजांनी खरा धर्म रुजवला, जतन आणि संवर्धन केला, त्या धर्माचे श्राद्ध घालण्याच्या या नियोजनबद्ध षडयंत्रात सहभागी होऊन आपल्या हातून किती भयंकर प्रमाद घडतो आहे, याची जाणीव या पामरांना नाही.
हिंदुत्व रक्षणासाठी एक फळी सध्या अती वेगाने सक्रिय आहे.. अर्थात खऱ्या, वास्तव, हिंदू धर्मापासून शेकडो सूर्य मैल दूर असलेला धर्म समाजाच्या माथी मारला जात आहे. हिंदुत्वाचा मिथ्या कार्यक्रम घेऊन कीर्तनकार राजकीय प्रचारासाठी मैदानात उतरवले जात आहेत. भक्तीच्या रंगमंचावरून सत्ता मिळवायची धडपड सुरू आहे. धर्म, देव, संत, परंपरा सगळ्यांचा वापर फक्त मतपेटीसाठी केला जात आहे .
खऱ्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी संत परंपरेचे योगदान अमूल्य आहे. त्याच संत परंपरेचा पाईक,
वारकरी पंथाचा आत्मा म्हणजे ज्ञानोबा-तुकाराम.कथित हिंदुत्वाचा घोष करणाऱ्या ढोंगी मंडळींनी या संत परंपरेला कधीही धर्म प्रचारक किंवा धर्म रक्षक म्हणून सन्मान दिल्याचे दिसत नाही. ही गोष्ट या कथित ढोंगी राजकीय धर्म वाद्यांच्या संमोहनाला बळी पडलेल्या विद्यमान संत परंपरेतील कीर्तनकारांनी लक्षात घ्यायला हवी. संत महिमा सांगून धर्म प्रचार केला तर खरा धर्म सांगावा लागेल, आणि खरा धर्म सांगितला तर सत्तेसाठी छल कपट करता येणार नाही ही भीती त्यांच्या मनात कायम आहे. लोकभावनांशी खेळता यावं म्हणून राजकीय राम उभा केला, पंढरीच्या वारीत भक्तिभावाचा जयघोष व्हायला हवा तिथं भोंदूंनी घोषणाबाजीची जत्रा भरवली.. पांडुरंग-रुक्माईच्या वारीला धर्माचा रंग देऊन संत परंपरेचा अपमान केला.
‘अध्यात्मिक आघाडी’ काढून अध्यात्मही राजकारणाच्या बाजारात विकायला काढलं. गावॊगावच्या परंपरेचा साधा “राम राम” बाजूला टाकून, मार्केटिंगसाठी “जय श्रीराम” चा नारा विकायला आणला. हे आहे राजकारणाच्या बाजारबुडव्याचं सर्वात उघड उदाहरण.
आज वारकरी उठतोय, बहुजन जागतोय. कारण भक्तांना कळलंय, कीर्तनकाराच्या तोंडून आलेला जयघोष हा संतांचा असतो; राजकारणाचा नाही. संतांचा मार्ग समतेचा, भक्तीचा, करुणेचा आहे.धर्म ढोंग्यांचा मार्ग फसवणुकीचा, द्वेषाचा, मतपेटीचा आहे.
एक साधा पण थेट प्रश्न प्रत्येक हिंदू भक्ताने विचारावा,बेगडी हिंदुत्वाचे नारे लावणाऱ्या भोंदूंच्या कार्यालयात कधी ज्ञानोबा-तुकारामांच्या तसबिरी पाहिल्यात का? नाही पाहिल्या ना?
आज हिंदू धर्म वाचवायचा असेल तर पहिली लढाई बेगडी हिंदुत्वाशी छेडावी लागेल.संतांचा धर्म हा भक्तीचा आहे,आणि या मंडळींचा धर्म हा भोंदूपणाचा आहे. आता वारकरी संप्रदायानेच अशा राजकीय अजेंडा घेऊन समाजाची दिशाभूल करणारे प्रबोधन करू पाहणाऱ्या भोंदूंना,संत समजायचं की नाही; त्यांचा मुखवटा फाडून खऱ्या हिंदू धर्मावर आक्रमण करू पाहणाऱ्या ‘भोंदू’ हिंदुत्वाची घुसखोरी रोखायची की नाही?
ज्ञानेश्वर माउलीपासून तुकोबांपर्यंत संतवाङ्मयाचा गाभा हा समता, करुणा, भक्ती आणि अन्यायाविरोधात उभं राहणं हाच आहे. त्या संतांचा जयघोष डावलून राजकीय नारा वारीत घुसवला. पांडुरंगाच्या पंढरीकडे नेणाऱ्या वारीत भक्तीभावाने “ज्ञानोबा-तुकाराम” घुमायला हवा, घोषणाबाजीचे राजकारण नाही.
वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्भेळ आध्यात्मिकता. संतांच्या अभंगात, ओव्यात, भारुडात जी समता व सामंजस्याची मशाल आहे, वारकऱ्यांचा तोच खरा श्वास आहे. या परंपरेतूनच हिंदू सुरक्षित राहणार आहे.
हिंदू धर्म हा संतांच्या अध्यात्मावर उभा आहे, बेगडी हिंदुत्वावर नाही. त्यामुळे हिंदू धर्म वाचवायचा असेल, तर तो भोंदू प्रचारकांच्या पकडीतून वाचवणं हाच आजच्या वारकऱ्यांचा, बहुजनांचा आणि सर्व भक्तजनांचा खरा धर्मसंरक्षणाचा संकल्प असायला हवा.



