क्राईम

✍️संपादकीय : शितल मोरे मृत्यू प्रकरण :संस्थात्मक हत्या 


✍️संपादकीय :

शितल मोरे मृत्यू प्रकरण :संस्थात्मक हत्या 

एक सामान्य, मागासवर्गीय महिला, शितल मोरे; जिला मातृत्वाचं सुख लाभावं, तिचं घर फुलावं, या आशेने ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र या देशातील आरोग्य व्यवस्थेची बेफिकिरी, माणुसकीशून्य डॉक्टरांचा व्यवस्थात्मक उन्माद, आणि दलितांना सतत दुय्यम समजणारी मानसिकता यांनी तिचं मातृत्वही हिरावलं आणि जीवनही.

प्रसूतीनंतर केवळ काही तासांत तिला असह्य पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तिच्या नातेवाईकांनी अक्षरश: हातपाय जोडले. ऑक्सिजन लावा, ICU द्या – पण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर जराही संवेदना नव्हती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ३० बेडचं ICU असूनही ती वापरली जात नाही, आणि एक बाई अशा अवस्थेत तडफडून प्राण सोडते. हे केवळ वैद्यकीय निष्काळजीपण नाही, तर संस्थात्मक हिंसाचार आहे.

अजून गंभीर बाब म्हणजे, मृत्यूनंतरही नातेवाईकांनी इन-कॅमेरा पोस्टमार्टमची विनंती केली, पण ‘अशा सुविधा नाही’ असं सांगण्यात आलं. आणि हे सांगणारे तेच डॉक्टर, ज्यांच्या काळात याच रुग्णालयात डझनभर इन-कॅमेरा पोस्टमार्टम झालेले आहेत! मग खोटं कोण बोलतंय?

ही केवळ एक वैद्यकीय चूक नव्हे.हा वर्ग, जात, आणि लिंग यांच्या एकत्रित व्यवस्थेचा शिकार होण्याचा प्रकार आहे.

नंतर जे घडलं ते अजून भयावह. पोलिसांनीही FIR नाकारला. रुग्णालयाने स्वतःच नेमलेली कमिटी ‘कोणतीही चूक नाही’ असं सांगते, आणि पोलीस त्याच अहवालावर विश्वास ठेवून गुन्हा नोंदवत नाहीत. उपसंचालकांचा रिपोर्ट ‘दोषी’ असतानाही पोलिसांचा हा पवित्रा ही न्यायव्यवस्थेची दिशाभूल आहे की मूलगामी नैतिक भ्रष्टाचार?

ही व्यवस्था जर एका गरीब, दलित महिलेला न्याय देऊ शकत नसेल, तर ती कोणासाठी आहे? वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किती बेजबाबदारपणे एका जिवंत बाईचा मृत्यू घडवून आणावा आणि मृत्यूनंतरही तिच्या शरीराचा अपमान व्हावा, आणि त्यात सहभागी असलेल्या डॉक्टर, अधिकारी आणि पोलिसांवर काहीही कारवाई न होणं, याला दुसरं नाव असूच शकत नाही: संस्थात्मक हत्या.

वंचित बहुजन समाजाचा संताप योग्यच आहे.

हा केवळ आंदोलनाचा विषय नाही, तर या व्यवस्थेने स्वतःला आरशात पाहण्याची वेळ आहे. जर सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, आणि आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली नाही, तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाची व्यवस्था आणि लोकशाहीवरची श्रद्धा उरणार नाही.

शितल मोरे हिचा मृत्यू हा तिचा वैयक्तिक अंत नव्हता, तो आपल्या व्यवस्थेच्या आत्म्याचा अंत आहे.

“जर आरोग्य व्यवस्था जीव वाचवण्याऐवजी वर्ग आणि जात पाहून काम करणार असेल, तर ती व्यवस्था नाही – ती नरसंहाराची फॅक्टरी आहे.”

Awaited :केवळ शब्द नाहीत, तर असहाय्यतेतून फुलणारा रोष, अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज, आणि समाजाच्या मूकेपणावर ओरडणारी एक अस्वस्थ जाणीव:.

Advertisement

—एक अनावृत्त पत्र संवेदना ठार झालेल्या व्यवस्थेला!

हे व्यवस्था  “तुझी नजर पक्षपाती आहे… तुझा न्याय अंध नाही, तो धादांत खोटा आहे!”

ती मेली, दोषी कुणी नाही, सत्य लिहिलं तो मात्र गुन्हेगार?

शितल मोरे या मागासवर्गीय महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागतो. वेळेवर ऑक्सिजन, ICU मिळत नाही. नातेवाईकांच्या विनवण्या धुडकावून लावल्या जातात. मृत्यूनंतरही अपमान – इन-कॅमेरा पोस्टमार्टम नाकारला जातो.

हे सर्व झालं तरी कोणताही अधिकारी दोषी धरला जात नाही. प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस – सगळे गप्प.

दुसऱ्या बाजूला, व्यवस्थेतील भोंगळा कारभाराचा फायदा घेऊन शासकीय योजनेचा निधी लुटणाऱ्या डॉक्टर विरुद्ध लिहिलं तर मागासवर्गीय अत्याचार कायद्याचा बडगा उगारून सत्य लिहिणाऱ्या पत्रकाराला गुन्हेगार ठरवलं जातं. मग शीतल नव्हती का मागासवर्गीय? कायदा आपल्या सोई प्रमाणे वापरायचा का?हीच आपल्या व्यवस्थेची शोकांतिका आहे.

सत्य लिहिणाऱ्यावर आरोप, आणि अन्याय करणाऱ्या विषयी मौन, हा कुठला न्याय?व्यवस्था गुन्हेगाराला वाचवते आणि साक्षीदाराला फाडते.

या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट ठळकपणे समोर येते –

जे गुन्हे करतात त्यांना संरक्षण मिळतं, आणि जे गुन्ह्याचं वास्तव उघड करतात त्यांच्यावर खटले दाखल होतात.

शितल मोरे हिला वेळेवर उपचार मिळाले असते, तर ती वाचली असती.तिचा मृत्यू म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा मृत्यू आहे.

आणि व्यवस्थेचा फोलपणा, पोकळी दाखवणारी बातमी लिहिणाऱ्या पत्रकारावर आरोप होणे म्हणजे,पत्रकारितेचा खून.लोकशाहीचा चौथा स्तंभ हादरतो आहे.

पत्रकार जर भीतीने गप्प बसू लागले, तर लोकशाहीचे अवयव एकेक करून निकामी होतील.

जो आवाज उठवतो त्याचा आवाज बंद करण्याचा हा कुटील प्रयत्न आज थांबवला नाही, तर उद्या प्रत्येक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, आणि सामान्य नागरिक याला त्याची किंमत मोजावी लागेल.

“सत्य बोलणाऱ्याला आरोपी ठरवायचं, आणि सत्य लपवणाऱ्याला संरक्षण द्यायचं,मग हे राज्यसंविधानाने चालतंय की सत्ता-संस्थेच्या स्वार्थाने?”या प्रश्नाचे उत्तर शोधणे काळाची अपरिहार्यता आहे.

✍️ – कुमार कडलग

              संपादक

     दुनियादारी won’t lie

Awaited :केवळ शब्द नाहीत, तर असहाय्यतेतून फुलणारा रोष, अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज, आणि समाजाच्या मूकेपणावर ओरडणारी एक अस्वस्थ जाणीव:.

एक अनावृत्त पत्र संवेदना ठार झालेल्या व्यवस्थेला!

हे व्यवस्था  “तुझी नजर पक्षपाती आहे… तुझा न्याय अंध नाही, तो धादांत खोटा आहे!”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *