प्रसूतीनंतर दुर्लक्षित; मागासवर्गीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रसूतीनंतर दुर्लक्षित; मागासवर्गीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
नाशिक | प्रतिनिधी
शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या शितल मोरे या मागासवर्गीय महिलेचा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निलेश पाटील यांच्यासह आठ जणांवर सदोष मनुष्यवध आणि मृतदेहाच्या अवहेलनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीसह समाजबांधवांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली.
वैद्यकीय दुर्लक्षामुळे मृत्यूचा आरोप
शितल मोरे यांची १ ऑगस्ट रोजी प्रसूती झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी ती पोटदुखीने व्याकूळ झाली. नातेवाईकांनी ICU आणि ऑक्सिजनची मागणी केली, मात्र रुग्णालय प्रशासनाने आवश्यक मदत नाकारल्याचा आरोप आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ICU उपलब्ध असूनही तिच्यावर उपचार झाले नाहीत, असा आरोप करण्यात आला.
शीतल मोरे मृत्यू प्रकरण :संस्थात्मक हत्या :संपादकीय Awaited
मृत्यूनंतरही अन्याय
शितलचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी इन-कॅमेरा पोस्टमार्टमची विनंती केली होती, मात्र तीही नाकारण्यात आली. डॉ. शिंदे यांनी “सुविधा उपलब्ध नाही” असे सांगितले, पण याच रुग्णालयात याआधी दहा-पंधरा वेळा इन-कॅमेरा पोस्टमार्टम झाले असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
चुकीच्या कमिटीचा आरोप
या प्रकरणात मेडिकल निग्लिजन्स कमिटीने रुग्णालयाचा बचाव करणारा रिपोर्ट दिला. मात्र ही कमिटी डॉक्टर शिंदे यांनीच नियुक्त केली होती, आणि त्यात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश असल्याने स्वत:च्या चुकीवर पांघरूण देण्याचा प्रकार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
पोलीस गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत
शितलचे भाऊ विकी वाकळे यांनी इंदिरानगर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला, पण गुन्हा नोंदवून घेण्यास पोलीस नकार देत आहेत. उलट जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या चुकीच्या अहवालावर आधार घेत पोलीस माघार घेत असल्याचा आरोप आहे.
वंचित बहुजन आघाडीचा इशारा
या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीने या आठवड्यात विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. “एका मागासवर्गीय महिलेला जीवनातही न्याय मिळाला नाही, आणि मरणोत्तरही तिचा अपमानच झाला. आता आम्ही शांत बसणार नाही,” असा कडक इशारा वंचित बहुजन नेत्यांनी दिला.
मागण्या:
डॉ. शिंदे आणि डॉ. पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
दोघांना तत्काळ निलंबित करून बडतर्फ करावे
पीडित कुटुंबाला ५० लाखांची नुकसानभरपाई व नोकरी द्यावी
स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी
पोलीस आणि अधिकाऱ्यांमधील संभाव्य आर्थिक संबंधांची चौकशी करावी.
शीतल मोरे मृत्यू प्रकरण :संस्थात्मक हत्या :संपादकीय Awaited