समृद्धी महामार्गावर गांजा माफियांचा सिनेस्टाईल थरारक पाठलाग ; स्थानिक गुन्हे शाखेने बांधल्या मुसक्या ; २४ लाखांचा गांजा, १२ लाखांच्या चार चाकी, तीन जण ताब्यात
- समृद्धी महामार्गावर गांजा माफियांचा सिनेस्टाईल थरारक पाठलाग ;
स्थानिक गुन्हे शाखेने बांधल्या मुसक्या ; २४ लाखांचा गांजा, १२ लाखांच्या चार चाकी, तीन जण ताब्यात
सिन्नर प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एखाद्या चित्रपटातील दृश्यात पहायला मिळावा असा थरार पाठलाग करून तब्बल २४ लाखांचा गांजा पकडण्यात यश मिळवले आहे. हा गांजा ओरिसातून मुंबईकडे नेण्यासाठी गांजा माफियांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आणि नाशिक ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकले. सुमारे सव्वाशे किलो गांजा समृद्धी महामार्गाने मुंबईला पोहोच करण्यासाठी निघालेल्या दोन चारचाकी वाहनांचा नाशिक ग्रामीणच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करीत तिघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. २४ लाखांच्या गांजासह दोन कार असा ३६ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सदरची कारवाई समृद्धी महामार्गावरील सिन्नर हद्दीतील शिवडे शिवारात केली आहे. यातील फरार संशयित हा नाशिकमधील कुख्यात टिप्पर टोळीचा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी भारत नारायण चव्हाण (३५, रा. अण्णा भाऊ साठेनगर, नेवासा, जि. अहिल्यानगर), तुषार रमेश काळे (२७, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर), संदीप कचरू भालेराव (३२, रा. गंगासागर,नेवासा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांना अटक केली असून कुख्यात टिप्पर टोळीचा सदस्य व सराईत गुन्हेगार सुनील भास्कर अनार्थे (रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हा फरार असून ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या सर्व संशयितांवर सिन्नर पोलिस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांकडून १२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा २४ लाख २८ हजार ५८० रुपयांचा गांजा, स्वीफ्ट कार, अमेझ कार, तीन मोबाईल असा ३६ लाख २९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मगर, सहायक निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, नवनाथ सानप, सचिन धारणकर, विनोद टिळे, सचिन गवळी, माधव साळे, श्रीकांत गारुंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमोडे आदींच्या पथकाने बजावली.
…
कारवाईचा थरार :-
स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मगर यांना समृद्धी महामार्गाने गांजाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके सिन्नर हद्दीत महामार्गावर गस्तीवर नेमले. शनिवारी (ता. १२) नागपूरकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगातील जाणाऱ्या स्वीफ्ट कार व अमेझ कारचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता, स्वीफ्ट कारने यु-टर्न घेत नागपूरच्या दिशेने तर, अमेझ कार मुंबईच्या दिशेने वेगात निघाल्या. पथकांनीही दोन्ही कारचा पाठलाग सुरूच ठेवला. स्वीफ्ट कारला समृदधीवरील कोकमठाण टोलनाका येथे अडविले तर, अमेझ कारचालकाने शिवडी शिवारात कार सोडून दिली आणि तो पसार झाला. या दोन्ही कारमधून सुमारे सव्वाशे किलोचा गांजा जप्त करण्यात आला.
ओरिसा मुंबई कनेक्शन:
संशयितांनी सदरचा गांजा ओरिसातून आणल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले. तसेच सदरील गांजा मुंबईत पोहोच केला जाणार होता. यावरून गांजाचे ओरिसा-मुंबई कनेक्शन समोर आले आहे. ग्रामीण पोलीस मुंबईतील रॅकेटचा शोध घेत आहेत. या कारवाईदरम्यान उपनिरीक्षक बोडके व अंमलदार किरकोळ जखमी झाले आहेत. तिघा संशयितांना न्यायालयाने बुधवारीपर्यंत (ता.१६) पोलीस कोठडी सुनावली आहे.