क्राईम

सत्याची घुसमट!


सत्याची घुसमट!

सत्य बोलणं ही समाजात सन्मानाची बाब असावी असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. पण वास्तवात – जेव्हा एक व्यक्ती अखंडपणे सत्याची बाजू घेते, तेव्हा तिला विरोध, उपेक्षा, संशय आणि एकटेपणाचा सामना करावा लागतो. ही कथा आहे, अशाच एका सत्य कवटाळणाऱ्या व्यक्तीची – तिच्या घुसमटीची, तिच्या एकटेपणाची आणि तिच्या अंतःकरणाच्या संघर्षाची.

 

 

विष्णू… एका सरकारी कार्यालयात साधा लेखनिक. शिस्तबद्ध, नियमप्रिय आणि कुठलाही भ्रष्टाचार सहन न कणारा. तीन वेळा प्रमोशनची संधी आली, पण कारण तेच – ‘त्याने नेत्यांच्या आणि त्यांच्या बगल बच्च्यांच्या कामाला सहकार्य केलं नाही’.

 

ऑफिसमध्ये सर्वांमध्ये त्याच्याबद्दल एक शंकेची भावना – “हा आपल्याविरुद्ध तक्रार करेल”, “हा कुणाचीच बाजू घेणार नाही”. त्यामुळे विष्णू एकटा पडतो… लंचवेळी त्याच्यासाठी जागा नसते, चहा सोबत प्यायला कुणी नसतं, आणि गल्लीच्या गप्पांमध्ये तो असतच नाही.

 

कुटुंबही थोडं नाराज – “तुझ्या प्रामाणिकपणामुळे काहीच मिळत नाही. शेजारच्या देशमुख साहेबांचं बघ… बंगला, गाडी सगळं आहे, तू मात्र अजून भाड्याच्या घरात.”विष्णूचं अंतरंग गुदमरायला लागतं.

त्याला प्रश्न पडतो –

“सत्य हे इतकं अस्वस्थ करणारं का?”

“मी चुकीच्या मार्गाने का नाही गेलो?”

“का कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही?”

 

एके दिवशी, ऑफिसमधल्या एका भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी सुरू होते.

Advertisement

ज्यांना सगळं माहीत होतं, ते सगळे गप्प बसतात.

पण विष्णूचं अंतरमन म्हणतं – “तू गप्प बसलास तर तुझं सत्य हरलं म्हणून समज..

तो पुढं येतो, सत्य सांगतो… आणि सगळे त्याच्यावर उलटतात.

“बघितलंत? सांगितलं ना, हा विश्वासघात करतो!”

“हा गद्दार आहे

 

 

चौकशीत दोषींना अटक होते, विष्णूचं म्हणणं योग्य ठरतं, पण… त्याचं स्थान मात्र पूर्ववत होत नाही.

त्याची बदली केली जाते, कारण त्याचे सत्य अस्वस्थता निर्माण करते.”

 

तो जातो, एका नवीन ठिकाणी.

पुन्हा एकटा, पण अंतरमनाने शांत.

कारण त्याचं अंतरमन सांगत असते,

“मी हरलो नाही… मी झुकलो नाही… मी सत्याला धोका दिला नाही.”

 

 

—तात्पर्य :

सत्य हे नेहमीच विजय मिळवून देतं असं नाही, पण ते अंतःकरणाला शांतता देतं.सत्यवादी माणूस एकटा असतो, पण तो स्वतःशी, समाजाशी आणि ध्येयाशी प्रामाणिक असतो.

त्याची घुसमट ही त्याच्या समाजातील पोकळ सिस्टिमविरोधातली असते. आणि हीच त्याची खरी ताकद असते.

समाजात प्रत्येक क्षेत्रात असा एखादा तरी विष्णू आपले सत्य उराशी कवटाळून सत्याने निर्माण केलेल्या अस्वस्थतेशी झगडत आहे. त्याचे सत्य ही अस्वस्था स्वीकारत नाही. खोटं मात्र सहज स्वीकारते.सत्य बदनाम ठरते. तरीही ते लढत राहते, प्रश्न विचारत राहते, कारण त्याची कुणाशीच स्पर्धा नसते.

-कुमार कडलग

नाशिक

बुधवार, दि. 16-7-2025

नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *