प्रचंड सहसी व्यक्तिमत्व :अॅड.अरुणराव सावंत
प्रचंड सहसी व्यक्तिमत्व :अॅड.अरुणराव सावंत
अमर आढाव /नाशिक
गर्जना थे, और हुंकार थे आप..वज्र थे आप.. धैर्य, साहस, शक्ति के आधार थे आप, आंधियों में अनल बनकर आप जले..आप चले तो रो पडी सारी दिशाऐं,आप चले तो चली कितनी प्रार्थनाऐं..विदा आपको दे रहे धरती गगन,आपको शत शत नमन..
उपरोक्त ओळी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सार्थपणे ओळख करून देतात असे एक प्रचंड साहसी,संघर्षशील व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.अरुणराव सावंत यांना आपल्यातून जाऊन बोलता बोलता दहा दिवस होतायेत..त्यांचा दशक्रिया विधी नाशिक येथील पवित्र रामकुंडावर उद्या बुधवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता होत आहे.. या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा श्रद्धांजलीपर लेख…
संघर्ष आणि अॅड. अरुणराव सावंत हे जणू एक समीकरणच होते.प्रचंड परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून अॅड. अरुणराव सावंत यांची सर्वदूर ओळख आहे. २३ एप्रिल १९४४ रोजी मुंबई येथे एका सामान्य कुटुंबात अॅड. अरुणराव सावंत यांचा जन्म झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण दादर येथील किंग जॉर्ज हायस्कूल येथे झाले.महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथील बी.वाय.के कॉलेज येथे झाले.या कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केले.जनरल सेक्रेटरी (G S) म्हणून आपली कार्यकुशलता दाखवली. एन.बी.टी लॉ कॉलेज येथे वकिलीसाठीचे शिक्षण घेतले. जीवनात चांगल्या मित्रांच्या सहवासात राहून सततचा अभ्यास व पुस्तके वाचून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. पुस्तकांचे वाचन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ते एक यशस्वी वकील म्हणून सर्वदूर ओळखले जाऊ लागले. एक सत्यनिष्ठ, मूल्यनिष्ठ व तत्त्वनिष्ठ व्यक्ती म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. नाशिक येथील जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला.सहकार कोर्टात त्यांनी प्रभावी कार्य केले.अनेक बँकांवर कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.वकिली काळात बहुसंख्य गोरगरीब लोकांना विनामूल्य सेवा देऊन त्यांचे आधार बनले.जेथे कुठे अन्याय होतो तेथे सातत्याने धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.मुंबई मधील विविध भागात त्यांनी बांधकाम व्यवसायात दर्जेदार काम करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला. या काळात त्यांनी अनेक बहुमजली इमारतींचे बांधकाम त्यांनी केले.पन्नास वर्षे यशस्वी वकिली केली.वकिली काळात अनेक ज्युनियर वकिलांना योग्य मार्गदर्शनातून प्रगतीचा मार्ग दिला.आणि आदर्श सत्यव्रती जीवनाचे रहास्याची शिकवण त्यांना दिली. नातेवाईक व मित्रपरिवारात त्यांची तत्वनिष्ठ,सत्यनिष्ठ व प्रचंड साहसी व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती. सातत्यपूर्ण संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा धागा राहिला तरीही ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे एकंदरीत जीवन सातत्याने जगणारे अॅड.अरुणराव सावंत हे देहाने नाही तर विचाराने आणि कार्याने आपल्या सोबत नक्कीच राहतील..त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..
भावपूर्ण श्रद्धांजली.