सन्माननीय अपवादांची माफी मागून! जनतेच्या हिताला दंश करणारे विषारी दात जबड्यातून खेचावेच लागतील!!
सन्माननीय अपवादांची माफी मागून!
जनतेच्या हिताला दंश करणारे विषारी दात जबड्यातून खेचावेच लागतील!!
नाशिक। प्रतिनिधी
पोलिस ठाण्यात दाखल झालेली प्रत्येक तक्रार खरीच असते असे नाही, आणि प्रत्येक खरी तक्रार आहे तशीच दाखल होते असेही नाही. हे सारे सापेक्ष असते. तक्रारदार कोण? कुणाच्या विरुद्ध तक्रार आहे? कुणाचे उपद्रव मूल्य किती? यावर तक्रार कशी दाखल होते, दाखल तक्रारीचा तपास कुठल्या दिशेने, किती खोलवर करायचा, हे अवलंबून असते. तक्रारदार सामान्य माणूस असेल तर खरी माणसारखी तक्रार दाखल होणे तसे अवघड, याउलट ज्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करायची आहे तो, सामान्य असेल तर मात्र मनासारखी तक्रार दाखल होते. आणि तपासही.यात अन्यायग्रस्ताला नैसर्गिक न्याय मिळेलच असे नाही. अशा अनेक घटना आपला भवताल व्यापून आहे.अर्थात या अनेकात काही सन्माननीय अपवाद आहेत, तसे ते नाशिकमध्येही आहेत, त्या सन्माननीय अपवादांची माफी मागून न्यायाला बटीक बनविणाऱ्या त्या असंवेदनशील प्रवृत्तीचा खरपूस समाचार घेणे पारदर्शक पत्रकारितेचे कर्तव्य आहे.
‘तु काेण? कशाला आलास’, असे म्हणत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. चारुदत्त शिंदे यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्याने जबर मारहाण करत प्राणघातक हल्ला केल्याचा दावा जिल्हा रुग्णालयाचे तत्कालिन शवविच्छेदन कक्षप्रमुख डाॅ. आनंद पवार यांनी केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून त्यांनी गंगापूर पाेलीस ठाण्यात लेखी तक्रार नाेंदविली आहे. तर दुसरीकडे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. शिंदे यांनी डाॅ. पवार यांचे आराेप व दावे फेटाळून लावले आहेत. दरम्यान, डाॅ. पवार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान (दि. २१) शुक्रवारी हा हल्ला झाल्याचे लेखी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाच्या वतीने त्र्यंबक रोड नजीकच्या महात्मानगर मैदानावर क्रिकेट मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी सामन्यादरम्यान पूर्वी सिव्हील रूग्णालयाशी संबंधित पण वर्तमानात खासगी डॉक्टर म्हणून कार्यरत डॉ. आनंद विलास पवार(वय ३९, रा. गाेविंदनगर, मुंबईनाका, नाशिक) हे देखील मैदानावर उपस्थित होते. यावेळी डॉ. पवार यांना बघताच जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चारूदत्त शिंदे हे डॉ. पवार यांच्या दिशेने अंगावर धावून येत त्यांनी पवार यांना मारहाण करीत हातातील बॅटचा देखील वापर केल्याचे गंगापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सिव्हील रूग्णालयाच्या विसंगत कारभाराबाबत तक्रारी केल्यामुळे राग मनात ठेवून ही मारहाण झाल्याची तक्रार डॉ. आनंद पवार यांनी केली आहे. उपचारार्थ त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती डॉ. पवार यांच्या सहकाऱ्यांनी दिली. यासह, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावत असे काही घडलेलेच नाही असे सांगितले आहे. शुक्रवारी सकाळी मॅचमध्ये काही वेळ सहभागी होऊन डॉक्टरांच्या एका परिषदेत सहभागी झालो. यानंतर काही महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित होतो. वाद झाला नसून कुणाशी हाणामारी करण्याचा प्रश्नच नाही. या प्रकरणात तथ्य नसल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
तक्रार नाेंदीला अडचण?
झालेल्या प्रकारानंतर गंगापूर पाेलिसांत गेलाे असता तक्रार नाेंदविण्यासाठी वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांना संपर्क करावा लागला. महत्प्रयासानंतर मला तक्रार काॅपीवर सही शिक्का मिळाला. प्राणघातक हल्ला झाला असून त्याबाबत गुन्हा दाखल व्हावा. वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार आहाेत, असे डाॅ. पवार आणि आप्तांनी सांगितले.
ही झाली एक घटना आणि त्या घटनेची बातमी. पत्रकारितेने नेहमीप्रमाणे या घटनेचे वृत्तांकन केले. आणि पुढच्या प्रवासाला निघालेली पत्रकरिता आणखी अशाच एखाद्या घटनेचा शोध घेण्यात व्यस्त झाली. अशा या पत्रकारितेला नेमके काय साध्य करायचे आहे? अर्थात हा प्रश्न सक्रिय चालू पत्रकारितेला रुचणार नाही, म्हणून जातीवन्त पत्रकारितेवार घेतला जाणारा आक्षेप थांबणार आहे का?
या घटनेपुरते बोलायचे झाले तर या प्रकरणात आरोप खरे की खोटे? हे ठरविण्याचा अधिकार ना पत्रकारितेला आहे ना पोलिस यंत्रणेला, हे खरे असले तरी प्रथमदर्शनी या दोन्ही घटकांना पार्श्वभूमी चांगलीच ठावूक असल्याने बातमीत किंवा कारवाईत त्याचे पडसाद उमटायलाच हवेत. ही अपेक्षा अगदीच गैर नाही. हे दोन्ही जबाबदार घटक आधी जनतेला उत्तरदायी आहेत. आणि जनतेच्या हिताला कुणी दंश करीत असेल तर ते विषारी दात जबड्यातून खेचण्याचे कर्तव्य याच जबाबदार घटकांनी पार पाडायला हवे. तात्पर्य, जिल्हा शासकीय रुग्णालयात काय सुरु आहे? कारभार कसा चालतो हे या जबाबदार घटकातील महानूभवांना वेगळे सांगण्याची गरज आहे का?