ताज्या घडामोडी

**गुन्हे वाढले की व्यवस्थेचा आरसा समोर येतो…! व्यवस्था अपयशी की समाज बेफिकीर?


**गुन्हे वाढले की व्यवस्थेचा आरसा समोर येतो…!

व्यवस्था अपयशी की समाज बेफिकीर?

…….

नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोंदवले जात असलेल्या गुन्ह्यांची संख्या आणि प्रकार लक्षात घेतल्या नंतर खरोखर यातील अनेक गुन्हे रोखता येऊ शकत नाहीत का? उत्तर जर होय असेल तर जबाबदारी कुणाची

? असे नाना प्रश्न उपस्थित झाले. एका दिवसात नोंदले गेलेले चोरी, जबरी लूट, घरफोडी, अपघात, फसवणूक आणि अकस्मात मृत्यू हे केवळ आकडे नाहीत.ते आपल्या सामूहिक अपयशाचे निदर्शक आहेत. गुन्हा घडतो तेव्हा बोट लगेच व्यवस्थेकडे जाते; पण आरशात पाहण्याची तयारी समाजा किती आहे, हा प्रश्न अधिक अस्वस्थ करणारा आहे.

*व्यवस्थेची जबाबदारी : ‘कायदा’ कागदावर नाही, रस्त्यावर दिसायला हवा*

पोलीस बंदोबस्त, गस्त, सीसीटीव्ही, तात्काळ तपास, दोषींवर जलद कारवाई हे सगळे कायद्याचे किमान निकष आहेत. तरीही जर दिवसाढवळ्या जबरी लूट होते, गर्दीत दागिने चोरीला जातात, महामार्गांवर मृत्यू वाढतात, तर प्रश्न उभा राहतो:गस्त पुरेशी आहे का?

संवेदनशील ठिकाणी (तीर्थक्षेत्रे, बाजारपेठा, महामार्ग) प्रतिबंधक उपाय का कमी पडतात?

तपासाचा वेग आणि शिक्षा यांचे भय गुन्हेगाराला जाणवत नाही का?

व्यवस्थेचे अपयश हे केवळ संसाधनांचे नसते; ते प्राधान्यांचे असते. आकडे गोळा होतात, पण प्रतिबंध का होत नाही.याचे उत्तर व्यवस्थेने द्यायलाच हवे.

 

*समाजाची जबाबदारी : ‘मी सुरक्षित’ ही भ्रमाची ढाल*

 

गुन्ह्यांच्या वाढीला समाजातील बेफिकिरीही खतपाणी घालते.

गर्दीत मौल्यवान दागिने, मोबाईल उघड्यावरआपणच संधी देतो.अपघातांत वेग, नियमभंग, हेल्मेट-अनास्था ही केवळ ‘चूक’ नाही, तर जबाबदारीपासून केलेले पलायन आहे.

फसवणुकीत ‘स्वस्ताचा मोह’,हा गुन्हेगाराचा नव्हे, तर आपल्या निर्णयांचा पराभव आहे.शेजाऱ्याबद्दल उदासीनता, संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष यामुळे गुन्हेगार निर्धास्त होतो..

समाज जागरूक नसला, तर व्यवस्था एकटी अपुरी ठरते.

 

*कुटुंब, शाळा, समुदाय : गुन्ह्यांच्या मुळाशी जाण्याची गरज*

 

अकस्मात मृत्यू, आत्महत्यांचे संकेत, हिंसाचार हे मानसिक आरोग्य, कौटुंबिक तणाव, व्यसनाधीनता यांची घंटा वाजवतात.कुटुंबांनी संवाद वाढवला पाहिजे.

शाळांनी मूल्यशिक्षण आणि भावनिक साक्षरतेवर भर द्यायला हवा.समुदायांनी समूह-नजर (community watch) उभी करायला हवी.

…………

*उपायांचा मार्ग : दोषारोप नव्हे, जबाबदारी*

Advertisement

व्यवस्था

हॉटस्पॉट गस्त, तात्काळ FIR, वेळबद्ध तपास

सीसीटीव्ही व डेटा-आधारित पोलिसिंग

अपघातप्रवण ठिकाणी कडक अंमलबजावणी

समाज

वैयक्तिक सुरक्षा शिस्त

संशयास्पद बाबींची त्वरित माहिती

नियमपालन आणि नागरिक शिस्त

दोघे मिळून

जनजागृती, स्थानिक समित्या, सार्वजनिक सुनावण्या

…………….

गुन्हा हा एकट्याचा नसतो.तो व्यवस्थेच्या दुर्बलतेचा आणि समाजाच्या निष्काळजीपणाचा संयुक्त परिणाम असतो.

जर व्यवस्था कठोर नसेल आणि समाज सजग नसेल, तर आकडे वाढतच राहतील.

सुरक्षा हा हक्क आहे.पण तो टिकवणे ही दोघांची संयुक्त जबाबदारी आहे.

 

*गुन्हे वाढत नाहीयेत, ते पोसले जात आहेत!*

व्यवस्था गप्प,समाज बघ्याची भूमिका असेल तर गुन्हेगारांचे फावते!

आजचा प्रश्न हा “गुन्हे का घडतात?” असा राहिलेला नाही.

खरा प्रश्न आहे. गुन्हे कुणाच्या संरक्षणाखाली घडतात?

अंमली पदार्थांची तस्करी, बालविनयभंग, महिलांवरील अत्याचार, गुटखा माफियांची खुलेआम वाहतूक, शाळांमधील लैंगिक गुन्हे, पोलिस ठाण्यांमधील दलाली, राजकीय आश्रयाने चालणारे गुन्हे हे सारे अपघात नाहीत, ही सडलेली संस्थात्मक व्यवस्था आहे.

*व्यवस्था दोषी कशी?*

 *पोलीस यंत्रणा*

कारवाईपेक्षा “सेटिंग”ला प्राधान्य.

तक्रारदाराला संशयित मानलं जातं, गुन्हेगाराला ओळखीने सोडलं जातं.

 *राजकीय नेतृत्व*

गुन्हेगार हेच कार्यकर्ते, आणि कार्यकर्ते हेच मतदार.

निवडणूक आली की गुन्ह्यावर पांघरून घातले जाते. सत्ता आली की फायली गायब होतात.

*न्यायव्यवस्था*

वर्षानुवर्षे खटले प्रलंबित.

पीडित थकतो, आरोपी मोकळा फिरतो.

समाजाची जबाबदारी कुठे जाते?

 “आपल्याला काय घेणं-देणं?”

 “आपला मुलगा नाही ना?”

 “बोललो तर उद्या आपल्यालाच त्रास होईल!”

हीच भीती, मौनाची परीक्षा घेते. ही गुन्हेगारांची सर्वात मोठी ढाल आहे.

आज एखाद्या आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत अत्याचार होतो,

उद्या तुमच्या घराच्या दारापर्यंत तोच राक्षस येणार नाही याची खात्री कोण देणार?

 

*माध्यमांचीही जबाबदारी आहे*

गुन्ह्यांवर बातमी होते, पण नावे झाकली जातात.

सिस्टमवर प्रश्न विचारण्याऐवजी, “दोन्ही बाजू ऐकूया” असा सुरक्षित पळ काढला जातो.

पत्रकारिता जर सत्याऐवजी सोयीचा मार्ग निवडत असेल,

तर ती सत्तेसोबत गुन्हेगारीची भागीदार ठरते.

 

*निर्णय घ्यावा लागेल*

▪️ गप्प बसायचं की आवाज उठवायचा?

▪️ गुन्हे पाहायचे की रोखायचे?

▪️ फक्त पोस्ट शेअर करायच्या की प्रत्यक्ष लढायचं?

कारण जेव्हा समाज गप्प बसतो,

तेव्हा गुन्हेगार बोलू लागतात.

आणि जेव्हा व्यवस्था विकली जाते,

तेव्हा न्याय हा फक्त पुस्तकात उरतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *