ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

पाटणकर मिरवणूकीवर कारवाईसाठी पोलिसांना व्हिडीओची प्रतीक्षा कशासाठी? सरकारवाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणखी एक प्रश्नचिन्ह


पाटणकर मिरवणूकीवर कारवाईसाठी पोलिसांना व्हिडीओची प्रतीक्षा कशासाठी?

सरकारवाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणखी एक प्रश्नचिन्ह

नाशिक: प्रतिनिधी
शहरात सातत्याने वाढत असलेल्या गुन्हेगारीचे सातत्याने उदात्तीकरण होत असताना पोलिसांची बघ्याची भूमिका शहरात चर्चेचा विषय बनली आहे.शहरातील अनेक गुन्हेगार कुठल्या कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या आश्रयाखाली असून या राजकीय नेत्यांशी असलेले पोलिसांशी असलेले हितसंबंध या गुन्हेगारी उदात्तीकरणाला हातभार लावल्याची चर्चा शहरात सुरु आहे. याच उदात्तीकरणाचा एक भाग म्हणून हर्षद पाटणकर या गुंड प्रवृत्तीच्या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. हर्षद पाटणकर या गुंडाला तुरुंगातून सोडण्यात आले. यानंतर या गुंडाच्या समर्थकांनी त्याची शहरात जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. ही मिरवणूक म्हणजे एकप्रकारे पोलीस यंत्रणेलाच आव्हान असल्याची चर्चा सुरु असतानाच पोलिसांनी त्याच्यावर केलेली कारवाईनंतर देखील सरकारवाडा पोलिस संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकर याची नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती. यानंतर शरणपूर रोड परिसरात पाटणकरच्या समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. यावेळी एक छोटेखानी रोड शो देखील झाला. या मिरवणुकीत तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचाही सहभाग होता. या मिरवणुकीत चारचाकी महिंद्र एक्सयुव्ही 300 आणि 10 ते 15 बाईकचा सहभागी होत्या. शरणपूर रोडवरील बैथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी रोड, शरणपूर रोड परिसरातून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.या घटनेमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होऊ लागल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी केलेली कारवाई चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
ही मिरवणूक आणि रोड शो सुरु असताना वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने शरणपूर परिसर दणाणून गेला होता. याशिवाय, मिरवणुकीतील सहभागी झालेले टवाळखोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. या सगळ्यांकडून बॉस इज बॅकच्या घोषणाही दिल्या जात होत्या. यानंतर हर्षद पाटणकरच्या समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हीडिओ अपलोड केले. हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची जोरदार चर्चा होऊ लागली. त्यानंतर सरकारवाडा पोलिस जागे झाले आणि व्हिडीओवरून पोलिसांनी गं मिरवणुकीची भीर दखल घेतली. मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी, दहशत माजविल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

हर्षद पाटणकरचे कारनामे :

अंकुश शिंदे यांनी जुलै महिन्यात नाशिकच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झोपडपट्टीदादाविरोधी कलमान्वये (एमपीडी) हर्षद पाटणकर याच्यावर कारवाई झाली होती. त्याच्याविरोधात सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात जबर दुखापत, चोरी, घरफोडी, शिवीगाळ व दमदाटी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

बॉक्स :मिरवणूक सुरु असताना पोलिस कुठे होते?

पोलिस आयुक्तालय हद्दीत जमाव बंदी आदेश लागू आहे. जमाव बंदी आदेश लागू असताना आणि एरवी देखील लोकशाही मार्गाने सनदशीर आंदोलन करणाऱ्या सामान्य जनतेला पोलिसांचा जाच सोसावा लागतो. त्याच शहरात गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक सीमेवर विजय मिळविल्याच्या अविर्भावात जामीन मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करतात. वाहतुकीचे सारे नियम धाब्यावर बसवून मिरवणूक काढतात. अश्लील शिवीगाळ करतात.ही मिरवणूक किमान तासभर तरी सुरु असेल. तोपर्यंत सरकारवाडा पोलिस या घटनेपासून अनभिज्ञ कसे? कारवाई करण्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडीओची प्रतीक्षा का करावी लागली? एरवी दाखवली जात असलेली कार्य तत्परता अशा घटनांमध्ये नेभळट का होते? यासारख्या प्रश्नांची कधीच न मिळणारी उत्तरे शहरातील गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *