ताज्या घडामोडी

*शांत संयमी “ओंकारेश्वर” निशब्द झाले…* *कट्टर शिवसैनिक काळाच्या पडद्याआड…* …….


*शांत संयमी “ओंकारेश्वर” निशब्द झाले…*

*कट्टर शिवसैनिक काळाच्या पडद्याआड…*

…….

राजकारण म्हणजे पदांची बेरीज नव्हे, तर विचारांची मशाल असते,हे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला शिकवले. त्या मशालीला अखेरपर्यंत जपणारा, कोणत्याही सत्तासमीकरणांपुढे न झुकणारा आणि निष्ठेची किंमत शब्दांत नव्हे तर कृतीत मोजणारा शिवसैनिक म्हणजे कैलास उर्फ आप्पासाहेब केसेकर. आज तो कट्टर शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे; आणि संगमनेरच्या चौकातील ते शांत, संयमी ओंकारेश्वर हॉटेल निशब्द झाले.

आप्पासाहेब शरीराने गेले, मात्र त्याची निष्ठा, संघर्ष आणि स्वाभिमान मात्र इतिहासात कोरले गेले आहेत.

शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा आवाज, आणि शिवसैनिक म्हणजे त्या आवाजातून संघर्षाचे रणशिंग फुंकणारे सैनिक . आप्पासाहेब केसेकर हे त्या रणशिंगातील एक खडे सूर होते. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही सत्तेच्या दारात न वाकता त्यांनी शिवसेनेचा भगवा डोईवर नव्हे, तर रक्तात मिरवला. आंदोलन असो, मोर्चा असो वा संघटन बांधणी शिवसेनेच्या प्रत्येक कठीण टप्प्यावर आप्पासाहेब पुढे उभे राहिले.

Advertisement

आजच्या राजकारणात निष्ठा ही व्यवहाराच्या काट्यावर तोलली जाते; विचारांची जागा सोयीस्कर भूमिका घेतात. अशा काळात आप्पासाहेब केसेकर हे जुनी शिवसेना शाळा दाखवणारे कार्यकर्ते होते. ‘बाळासाहेब म्हणाले म्हणून’ हीच त्यांची अंतिम भूमिका होती. कुठल्याही पद, मान-सन्मान, निधी किंवा प्रसिद्धीपेक्षा त्यांनी संघटनेला आणि विचाराला प्राधान्य दिले,ही बाब आज दुर्मीळ होत चालली आहे.

स्थानिक पातळीवर सामान्य माणसाचा प्रश्न उचलून धरणे, अन्यायाविरोधात निर्भीडपणे उभे राहणे आणि शिवसैनिकांना एकत्र ठेवणे, हीच त्यांची ओळख होती. ते बोलत नसत तर लढत; आश्वासन देत नसत तर काम करून दाखवत. त्यामुळेच ते कार्यकर्त्यांमध्ये ‘नेते’ म्हणून नव्हे, तर आप्पासाहेब म्हणून ओळखले जात.

त्यांच्या जाण्याने शिवसेनेने केवळ एक कार्यकर्ता गमावलेला नाही, तर बाळासाहेबांच्या विचारांची एक जिवंत साक्ष हरवली आहे. आज जेव्हा राजकारणात तत्वांची घसरण, पक्षनिष्ठेची मोडतोड आणि सोयीस्कर पलटणी सामान्य झाली आहे, तेव्हा आप्पासाहेबांसारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचे जाणे अधिक बोचरे वाटते.

कैलास उर्फ आप्पासाहेब केसेकर काळाच्या पडद्याआड गेले असतील, पण त्यांची शिवसेनाप्रती निष्ठा, संघर्षशील वृत्ती आणि स्वाभिमानी विचार हीच खरी वारसा आहे. शिवसेना टिकवायची असेल, तर अशा कार्यकर्त्यांच्या स्मृती नाही, तर त्यांची पायवाट जपावी लागेल,हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *