बसपाचा पाठिंबा मिळाल्याचे वृत्त खोडसाळ, निराधार, धादान्त खोटे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा
बसपाचा पाठिंबा मिळाल्याचे वृत्त खोडसाळ, निराधार, धादान्त खोटे
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा
शिर्डी प्रतिनिधी
बहेन कु मायावती यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाची घोडदौड सुरु असून शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामचंद्र जाधव हे बसपाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. त्यांचा प्रचार देखील शिगेला पोहचला असून समाजाच्या विविध थरातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. ही बाब विरोधकांना चांगलीच जिव्हारी लागली असून प्रचाराचा हा रथ रोखण्याच्या कुटील हेतूने बसपाने इतर उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या बातम्या पेरून कंड्या पिकवल्या जात असल्याचा खुलासा पक्षाने केला आहे. दोन दिवसापूर्वी शिर्डी लोकसभा मतदार संघात बहुजन समाज पक्षाने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ते वृत्त धादांत खोटे, निराधार आणि खोडसाळपणाचे असल्याचे पत्र जिल्हा प्रभारी राजू खरात,संगमनेर अकोले तालुका प्रभारी प्रकाश अहिरे आणि स्वतः उमेदवार रामचंद्र जाधव यांनी आपली दुनियादारीकडे प्रसिद्धीसाठी दिले आहे. पक्षाचा स्वतःचा उमेदवार रिंगणात असतांना इतरांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे असे स्पष्ट करून हे वृत्त देणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षातून निलंबित केले असून त्याच्यावर गुन्हाही दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.