क्राईम

१० लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त; परराज्यातील दोन आरोपी अटकेत मालेगाव तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी


१० लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त;

परराज्यातील दोन आरोपी अटकेत

मालेगाव तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

 

मालेगाव (प्रतिनिधी) :

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि महामार्गावरून होणाऱ्या तस्करीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मालेगाव तालुका पोलीसांना मोठे यश मिळाले आहे. परराज्यातील दोन संशयितांकडून तब्बल १० लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

दि. २९ ऑक्टोबर रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने तत्काळ छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:

१️)मामिर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (वय ३४, रा. मोमिनपुरा, बुरहानपुर, मध्य प्रदेश)

२️)मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (वय ३३, रा. हरीरपुरा, बुरहानपुर, मध्य प्रदेश)

Advertisement

दोघांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या २,००० बनावट नोटा (एकूण किंमत ₹१०,००,०००/-), दोन मोबाईल हँडसेट आणि IMPEX कंपनीची चॉकलेटी-काळी सॅक असा एकूण ₹१०,२०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर नोटांची छपाई, कागदाचा दर्जा आणि सुरक्षा धागा तपासल्यावर त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८०, व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर आरोपी बनावट नोटा कोठून आणत होते आणि त्या कुठे विक्री करणार होते, याचा तपास पोउनि तुषार भदाणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

या यशस्वी कारवाईत मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, सपोनि प्रिती सावंजी, पोउनि तुषार भदाणे, पोहवा अमोल शिंदे, पोहवा प्रकाश बनकर, पोकॉ गणेश जाधव, मोरे आदींचा समावेश असलेल्या पथकाने सहभाग घेतला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या यशस्वी कारवाईमुळे मालेगाव तालुका पोलीसांनी बनावट चलन रॅकेटवर मोठा आघात केल्याचे मानले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *