उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; सोलापूरमधील घटना, एका आरोपीला अटक, पोलिस तपास सुरू
उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला;
सोलापूरमधील घटना, एका आरोपीला अटक, पोलिस तपास सुरू
सोलापूर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्यात आपल्या सामाजिक कार्याची छाप पाडत अनेक उद्योजकांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देणारे उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. राणा सूर्यवंशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये सुरू केलेल्या मोठ्या सामाजिक कामामुळे ते लोकांच्या मनात ठसले होते. त्यातूनच हा प्राणघातक हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
राणा सूर्यवंशी नेहमीप्रमाणे कामानिमित्त सोलापूर दौर्यावर होते. अक्कलकोट दर्शन करून येत असतांना त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला झाला. हल्लेखोरांच्या हातात पिस्तूल आणि धारदार शस्त्र होते. बुलेरो जीप क्रमांक MH 42 24 29 या गाडीमधून आरोपी आले होते. या आरोपींमध्ये सचिन लालू राठोड (राहणार मुळेगाव तांडा, सोलापूर), आकाश मधुकर चव्हाण, कृष्णा फुलचंद पवार (दोघेही राहणार वडजी कॅनल तांडा) आणि अविनाश शिवाजी राठोड (राहणार बक्षी हिप्परगा तांडा) हे चौघेजण सहभागी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
राणा शिपिंग कंपनीचे चेअरमन म्हणून उद्योगपती राणा सूर्यवंशी हे राज्यभर परिचित झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील पाऊलवाटा आणि सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राणा सूर्यवंशी यांच्यासोबत असलेले पोलीस कॉन्स्टेबल वामन पिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. अतुल कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “या घटनेची आम्ही बारकाईने चौकशी करत आहोत. घडलेल्या प्रकाराचे काही नवे पैलू समोर येतात का याचीही चौकशी सुरू आहे.”
यापूर्वीही राणा सूर्यवंशी यांच्यावर सामाजिक कार्यातूनच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात आपल्या सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध आहेत. अलीकडे राणा शिपिंगच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले मोठे काम राज्याच्या सामाजिक व औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.
राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का?” आणि “अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर सामाजिक क्षेत्रात आणि उद्योजकतेत काम करायचे का नाही?” असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सामाजिक,राजकीय, उद्योग आणि पत्रकार मित्र म्हणून ओळख असलेल्या राणा यांच्या प्रति सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान राणा सूर्यवंशी यांनी स्वतः सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यामध्ये काही नक्षली कलेक्शन आहेत काय याचाही तपास पोलीस करत आहे.
…. …. …. … … … … … .. ….