क्राईम

♦अंबड एमआयडीसीतील रस्त्यांची दयनीय अवस्था; उद्योजक त्रस्त, प्रशासन बेफिकीर


♦अंबड एमआयडीसीतील रस्त्यांची दयनीय अवस्था; उद्योजक त्रस्त, प्रशासन बेफिकीर

सिडको, ता. २८ : नाशिकच्या औद्योगिक हृदयस्थानी असलेल्या अंबड एमआयडीसीतील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की येथील उद्योजक, कामगार आणि नागरिक अक्षरशः संतापाच्या टोकावर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून, दुरुस्तीकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.

एफ-८ डी रोडवरील दातार कॅन्सर जेनेटिक्स व फॉर्च्युना कंपनीसमोरचा रस्ता याचे ठळक उदाहरण आहे. इथे रस्ता नाही तर खड्डेच खड्डे दिसून येतात. दररोज दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत असून, जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी वाहनचालकांना सुद्धा वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. काही ठिकाणी तर खड्डे एवढे मोठे झाले आहेत की वाहनं अडकतात, त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम होतो.

Advertisement

महत्त्वाची बाब म्हणजे एमआयडीसीतील कंपन्यांमधून मनपा आणि एमआयडीसी प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तरीही त्या प्रमाणात सुविधा पुरविल्या जात नाहीत. रोज हजारो कामगार या परिसरात ये-जा करतात, परंतु खडबडीत रस्त्यांमुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वाहनांचे मोठे नुकसान होते, तर अपघातांचा धोका कायम आहे. या परिस्थितीमुळे उद्योजकांमध्ये नाराजी वाढली असून, अनेकांना प्रश्न पडतोय की नाशिकमध्ये उद्योग सुरू ठेवायचे की इतरत्र हलवायचे?

“प्रशासनाने आमच्याकडून महसूल घेतला पण सुविधा शून्य. उद्योजकांचा संयम संपत चालला आहे. जर तातडीने दुरुस्ती झाली नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा औद्योगिक वर्तुळाकडून देण्यात येत आहे.

एमआयडीसी आणि मनपा प्रशासनाकडून तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अधिकारी फक्त बैठकींची भाषा बोलतात, प्रत्यक्ष काम मात्र होत नाही. उद्योगांचे नुकसान, कामगारांचा जीव धोक्यात, आणि नाशिकच्या औद्योगिक प्रतिमेवर काळी छाया—या सर्वासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न आज प्रत्येक उद्योजक विचारत आहे.

प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी उद्योगजगताने आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *