प्रशासकीय परंपरेचा वारसा जपणारे लोकाभिमुख नेतृत्व : आयएएस आयुष प्रसाद
प्रशासकीय परंपरेचा वारसा जपणारे लोकाभिमुख नेतृत्व : आयएएस आयुष प्रसाद
*..……मंगळवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५.. वेळ दुपारी साधारण २ वाजेची… व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप साळुंके आणि कपिल भास्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित होते.शिष्टमंडळ कार्यालयात पोहचत असतांनाच जिल्हाधिकारी बाहेर निघण्याच्या तयारीत होते. समोरासमोर भेट होताच जिल्हाधिकाऱ्यांनी आस्थेने चौकशी केली. भेटीचे कारण विचारले आणि निवेदन द्यायचं आहे, असे उत्तर मिळताच, मी आधी निवेदन घेणार नाही, आधी चर्चा करू, मी काय करू शकतो, ते सांगा नंतर निवेदन घेतो, असे सांगून, पुढील एक तासाची वेळ देऊन मार्गस्थही झाले. दिलेला शब्द पाळून नंतरच्या दीड तासात शिष्टमंडळाला वेळ देऊन प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून उपाय योजनांवर मंथन केले. गेल्या ३५ वर्षाच्या पत्रकारितेत महसूल विभागात या पद्धतीची कार्य शैली जगणारे पहिले आय ए एस अधिकारी पाहिले. आयुष प्रसाद.. नाशिकचे विद्यमान जिल्हाधिकारी. हे पत्रकारांशी म्हणून ही कार्यपद्धती आहे का?की सामान्य अभ्यागतांशीही ते तसेच वागतात, अशी शंका आल्याने पत्रकारितेच्या नजरेतून त्यांची कार्य शैली जाणून घेतली आणि आश्चर्याचा धक्का बसला….*
……….
नाशिक जिल्ह्याचे प्रशासकीय सूत्रे हाती घेतलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे नाव अल्पावधीतच शिस्तबद्ध, निर्णयक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. गाजावाजा टाळणारी कार्यपद्धत, मुद्देसूद संवाद आणि कामातून बोलण्याची शैली ही त्यांची ठळक ओळख आहे.
आयुष प्रसाद यांचा स्वभाव मितभाषी, संयमी आणि ऐकून घेणारा आहे. ते निर्णय घेताना भावनेपेक्षा तथ्य, आकडेवारी आणि कायदेशीर चौकटीला प्राधान्य देतात. अधिकारी-कर्मचारी असो वा सामान्य नागरिक, प्रत्येकाशी सन्मानाने संवाद साधण्यावर त्यांचा भर असतो. कठोर निर्णय घ्यावे लागले तरी त्यामागील कारणे स्पष्ट करण्याची त्यांची पद्धत विश्वास निर्माण करते.
***जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा सुरु असतांना एक भगवे वस्र धारण केलेले महाराज दालनात आले. दालनात एक आमदार महोदय देखील होते. महाराजांनी भेट म्हणून मिठाई आणली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी उभे राहूनच मिठाईचा बॉक्स उघडला. आणि आपल्या हाताने सर्व उपस्थितांना आणि दालनबाहेर असलेले अधिकारी कर्मचारी, अभ्यागतांना स्वहस्ते मिठाई दिली. घटना साधी पण मनाला भिडणारी. या साध्या साध्या गोष्टीतून माणसाचे मन, स्वभाव आणि संस्कार कळतात.आयुष प्रसाद यांची माणूस म्हणून यापेक्षा वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नसावी….****
……….
प्रशासन ही केवळ अधिकार तत्वाची रचना नाही, तर समाजाशी सतत संवाद साधत विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या विचारधारेचे सशक्त प्रतिनिधीआहेत, असा विश्वास त्यांच्यासोबत केवळ 2 मिनिटांचा सहवास लाभलेले कुणीही व्यक्त करील. परंपरेचा सन्मान राखत आधुनिकतेची कास धरणे, नियमांच्या चौकटीत राहून मानवी दृष्टिकोन जपणे आणि समस्यांकडे केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष जीवनाच्या संदर्भात पाहणाऱ्या तत्त्वांवर त्यांची प्रशासनशैली उभी आहे.
—
आयुष प्रसाद हे महाराष्ट्र कॅडरचे २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मणिपूर विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) शाखेत बी.ई. पदवी प्राप्त केली आहे. १४ ऑगस्ट १९८८ रोजी जन्मलेल्या आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय कौशल्य, कार्यक्षमता आणि दूरदृष्टी यांचे प्रभावी दर्शन घडवले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आणि प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे……
—
*चार पिढ्यांचा प्रशासकीय वारसा*
आयुष प्रसाद यांचे कुटुंब म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवांच्या परंपरेचे जिवंत उदाहरण. चार पिढ्यांपासून सार्वजनिक सेवेशी नाते असलेल्या या कुटुंबात सेवाभाव, शिस्त आणि जबाबदारी ही मूल्ये घराघरांतून पुढे आली.
वडील भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी, तर आई भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असल्याने प्रशासन हे केवळ करिअर नव्हे, तर समाजाप्रती कर्तव्य आहे,ही भावना त्यांच्या बालमनावर ठसली. निर्णयांचे परिणाम, अधिकारांचा विवेकपूर्ण वापर आणि कायदा-सुव्यवस्थेची संवेदनशीलता त्यांनी घरच्या वातावरणातूनच अनुभवली.
*भ्रमंतीतून घडलेले व्यक्तिमत्त्व*
वडिलांच्या बदलीमुळे आयुष प्रसाद यांचे शालेय शिक्षण बारा वेगवेगळ्या शाळांमध्ये झाले. अनेकांसाठी हा अस्थिरतेचा अनुभव ठरला असता; मात्र आयुष प्रसाद यांच्यासाठी तो शिकण्याची मोठी संधी ठरली.बारा गावचं पाणी पिलेला असे आपण एखाद्याविषयी नकारात्मक भावना व्यक्त करण्यासाठी म्हणतो, आयुष प्रसाद यांच्याबाबतीत मात्र हीच बारा गावे आणि तिथलं पाणी पूरक ठरलं आहे. विविध भाषा, संस्कृती, सामाजिक पार्श्वभूमी आणि लोकस्वभाव यांचा प्रत्यक्ष परिचय झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला.
नव्या शहरात, नव्या शाळेत पटकन जुळवून घेणे, विविध मतांचा आदर करणे आणि संवादातून संबंध निर्माण करणे, कौशल्ये पुढील प्रशासकीय कारकिर्दीत उपयोगी ठरली.
—
*अभ्यास, तंत्रज्ञान आणि जागतिक दृष्टी*
अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत तंत्रज्ञान, नवकल्पना आणि परिणामाभिमुख व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. कार्यक्षमतेचा अर्थ केवळ वेग नव्हे, तर अचूक नियोजन आणि मोजमापक्षम परिणाम असतो, हे त्यांनी याच काळात आत्मसात केले.
पुढे अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून नेतृत्व आणि उदारमतवादी शिक्षण घेतल्याने त्यांची दृष्टी अधिक व्यापक झाली. जागतिक पातळीवरील प्रशासकीय मॉडेल्स, धोरणनिर्मितीतील मानवी पैलू आणि दीर्घकालीन विकासाची संकल्पना त्यांनी जवळून अभ्यासली.
*प्रशासनापूर्वीचा सामाजिक आणि आर्थिक अनुभव*
प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी बँकिंग क्षेत्रात काम करताना त्यांनी ग्रामीण व शहरी भागांतील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. आर्थिक समावेशन, कर्जपुरवठा, स्वयंरोजगार आणि स्थानिक विकास यांचे वास्तव त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.यामुळे योजना कागदावर कशा दिसतात आणि प्रत्यक्षात त्या राबवताना कोणत्या अडचणी येतात, याची सखोल जाणीव त्यांना झाली. हाच अनुभव पुढे प्रशासकीय निर्णय घेताना त्यांना जमिनीवरील वास्तवाशी जोडून ठेवतो.
*अपयश, आत्मपरीक्षण आणि यश*
यूपीएससी परीक्षेत पहिल्यांदा अपयश आले. मात्र त्याकडे त्यांनी पराभव म्हणून पाहिले नाही, तर आत्मपरीक्षणाची संधी म्हणून पाहिले. अभ्यासपद्धतीत बदल, अधिक शिस्तबद्ध नियोजन आणि समकालीन घडामोडींचा सखोल अभ्यास करत त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात उत्कृष्ट यश मिळवले.
महाराष्ट्र कॅडरची निवड करून विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी पारदर्शकता, निधी व्यवस्थापन आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रियेचा ठसा उमटवला. विशेषतः कोविड काळात दाखवलेले नेतृत्व,वेळीच निर्णय, समन्वय आणि मानवी संवेदनशीलता यामुळे त्यांची प्रशासकीय क्षमता अधोरेखित झाली.
*संवादकेंद्रित जिल्हाधिकारी*
जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांची कार्यशैली पारंपरिक चौकटींपेक्षा पुढे जाणारी आहे. अभ्यागतांशी थेट चर्चा करून समस्येचे मूळ समजून घेणे, “तुमच्या मते उपाय काय?” असा प्रश्न विचारून अभ्यागतालाच प्रक्रियेचा भाग बनवणे, ही त्यांची खासियत आहे.यामुळे निवेदनांची फाजील गर्दी कमी होते, अभ्यागत तयारीनिशी येतात आणि अनेक प्रश्न पहिल्याच भेटीत सुटतात. प्रशासन हे आदेश देणारे नव्हे, तर उपाय शोधणारे व्यासपीठ बनते,हा बदल नाशिकमध्ये ठळकपणे जाणवतो.
*विचारवंत अधिकारी आणि लेखक*
आयुष प्रसाद हे केवळ प्रशासकीय अधिकारी नाहीत, तर विचारवंत लेखक, अभ्यासू स्तंभलेखक आणि संवेदनशील नेतृत्वकर्ता आहेत. विकास, शिस्त आणि मानवी मूल्ये यांचा समतोल साधण्यावर त्यांचा भर असतो. निर्णय घेताना आकडेवारी, कायदे आणि सामाजिक परिणाम या तिन्हींचा समन्वय साधण्याची त्यांची पद्धत प्रशासकीय वर्तुळात वेगळी ओळख निर्माण करते.
भविष्यासाठी दिशा
नाशिकसारख्या औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकांशी थेट संवाद साधणारे बनावे, ही त्यांची भूमिका आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, क्षेत्रीय भेटी आणि लोकसहभाग यातून विकास प्रक्रियेला गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
थोडक्यात,प्रशासकीय परंपरेचा वारसा जपत आधुनिक विचार, जागतिक दृष्टी आणि लोकाभिमुख नेतृत्व स्वीकारणारे आयएएस आयुष प्रसाद हे नव्या पिढीच्या प्रशासनाचे प्रतिनिधी ठरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन केवळ कार्यक्षमच नव्हे, तर विश्वासार्ह आणि संवेदनशील बनते,हीच त्यांच्या कामकाजाची खरी ओळख आहे.
-बी. के. तथा कुमार कडलग
नाशिक
दुनियादारी won’t lie



