नववर्षाच्या स्वागतासाठी गड-किल्ल्यांवर पार्टी केल्यास जाग्यावरच शिक्षा; नाशिक शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचा कडक इशारा
नववर्षाच्या स्वागतासाठी गड-किल्ल्यांवर पार्टी केल्यास जाग्यावरच शिक्षा;
नाशिक शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचा कडक इशारा

गोकुळ निकम/ नाशिक
नववर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर पार्टी, मद्यपान, नाच-गाणे, कचरा टाकणे अथवा अशोभनीय प्रकार केल्यास संबंधितांवर जाग्यावरच कारवाई व शिक्षा केली जाईल, असा कडक इशारा *नाशिक येथील शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेने दिला आहे.* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड-किल्ले हे मनोरंजनाची ठिकाणे नसून राष्ट्रीय वारसा व श्रद्धास्थान आहेत, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.*
संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी नववर्षाच्या काळात काही समाजकंटकांकडून गड-किल्ल्यांवर दारू पिणे, पार्टी करणे, भिंतींवर नावे कोरणे, प्लास्टिक कचरा टाकणे, आग पेटवणे असे प्रकार घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा संस्थेच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात येणार असून स्वयंसेवकांचे पथक, गडप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने पाळत व तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
या इशाऱ्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर गव्हाणे, सोमनाथ गव्हाणे, बाळाभाऊ शिंदे, संतोष शिंदे, शिवव्याख्याती सईताई गव्हाणे, वैशाली गव्हाणे, कविता गव्हाणे, विजय महाले, विजय दराने, आर्यन गव्हाणे, अभिलाष मुळे, भानुदास परबत, करण मुसळे, नंदाताई गव्हाणे, समाधान गायकर, सोपान सहाणे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
संस्थेच्या सदस्यांनी स्पष्ट केले की, गड-किल्ल्यांचे नुकसान करणे हा कायदेशीर गुन्हा असून दोषी आढळल्यास कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच पर्यटकांनी नियमांचे पालन करावे, स्वच्छता राखावी, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि गड-किल्ल्यांवरील शांतता व पवित्रता जपावी, असे आवाहन करण्यात आले.
नाशिक शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या वतीने नागरिकांना संदेश देण्यात आला आहे की, नववर्षाचे स्वागत इतिहासप्रेम, शिस्त व संवर्धनाच्या भावनेने करा. गड-किल्ल्यांवर सहल करा; मात्र पार्टी नव्हे, तर वारशाची जपणूक करा—हीच खरी नववर्षाची सुरुवात ठरेल.
तसेच गड-किल्ल्यांवर कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ संस्थेच्या स्वयंसेवकांशी किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही संस्थेने आवाहन केले आहे.



