मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिस व्हॅनला अपघात ; 12 पोलिस कर्मचारी जखमी, एक गंभीर
मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिस व्हॅनला अपघात ;
12 पोलिस कर्मचारी जखमी, एक गंभीर
चांदवड प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंदोबस्तासाठी मालेगाव येथे जात असलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वाहनाला मुंबई- आग्रा महामार्गावरील राहूड घाटात अपघात होऊन 12 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी एक जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालका विराधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात शुक्रवारी (दि. ४) विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याने नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे १२ पोलिस कर्मचारी (एम. एच. १२, व्ही. सी. ६३४०) पोलिस वाहनाने मुंबई-आग्रा महामार्गाने मालेगावकडे जात असताना राहुड घाटात समोरून आलेल्या ट्रकचालकाने गाडी हळू केल्याने मागच्या बाजूने येणारी पोलिस गाडी ट्रकला धडकली. या अपघातात पोलिस चालक हवालदार पुरुषोत्तम पुंडलिक मोरे (४९) यांच्या डोक्याला, पायाला गंभीर मार लागला आहे. त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिकला हलविण्यात आले आहे. तर इतर ११ कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती कळताच चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस उपनिरीक्षक भानुदास नन्हे, पोलिस कर्मचारी विक्रम बस्ते, सुनील जाधव, अमोल जाधव, स्वप्निल जाधव, भाऊलाल हेंबाडे, राजू गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
चौकट
*जखमी पोलिस कर्मचारी असे…*
नीलेश लोंढे, जयवंत चौधरी, कुमार जाधव, किरण आहेर, चेतन तुंगार, नीलेश कंडाळे, पुरुषतम मोरे, शीतल गायकवाड, किशोर बोडके, नानाजी मांडवडे, शांताराम गाढे, नीलेश आहिरे आदी.
फोटो
अपघातग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांवर सुरू असलेले उपचार.