स्वातंत्र्यदिन आणि वर्दीतील लाथ;लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार; कुसुमाग्रज आणि ढसाळ यांच्या शब्द प्रहाराची होतेय आठवण
स्वातंत्र्यदिन आणि वर्दीतील लाथ;लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार;
कुसुमाग्रज आणि ढसाळ यांच्या शब्द प्रहाराची होतेय आठवण
स्वातंत्र्यदिन म्हणजे देशाने स्वतःच्या सन्मानाची, हक्कांची आणि मानवी मूल्यांची पुन्हा उजळणी करण्याचा दिवस. हा तो दिवस, ज्या दिवशी आपण देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांच्या बलिदानाची आठवण काढतो. पण जालन्यात याच दिवशी, एका वर्दीधारी अधिकाऱ्याच्या बुटाचा प्रहार झाला. तो केवळ एका आंदोलकाच्या कमरेवर झाला नाही,तो लोकशाहीच्या आत्म्यावर झाला.
घटना केवळ एक मारहाण नाही :-
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताफ्याला भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या, न्यायाच्या अपेक्षेने महिनाभर उपोषण करणाऱ्या अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाच्या मागून धावत जाऊन डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी ‘फिल्मी स्टाईलने’ कंबरड्यात लाथ मारली.
हे वाचताना अनेकांना वाटेल पोलिसांनी तो जीव वाचवला. पण प्रश्न असा आहे की, जीव वाचवण्यासाठी लाथच का? लाथ मारून जीव किंवा लोकशाही वाचते का? की अशा प्रसंगी, पोलिसांच्या प्रशिक्षणातल्या ‘मानवीय हस्तक्षेप’ पद्धतीची आठवणच होत नाही?जीव वाचवण्यासाठी लाथ मारली हा युक्तवाद देखील तसा केविलवाणा आहे. आत्मदहन करण्याचा आंदोलनकर्त्यांचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर वर्दीधारी त्याला घेऊन जात असतांना पाठीमागून चालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने ठरवून त्याच्या कमरेत लाथ मारल्याचे स्पष्ट दिसते. ही खाकीची मुजोरीच नाही का?
स्वातंत्र्यदिनाची विडंबना
आपण इंग्रजांच्या जुलमी पोलिसशाहीतून मुक्त झालो होतो, कारण ती लोकांचा आवाज दाबत होती, विरोधकांवर दडपशाही करत होती. पण जर आज आपल्या स्वतःच्या राज्यातील वर्दीवाले स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी लोकांच्या कंबरड्यात बूट घालत असतील, तर हा स्वातंत्र्याचा उत्सव आहे का की त्याच दडपशाहीचा पुनरुच्चार?
स्वातंत्र्याला लाथ , लोकशाहीच्या तोंडावर बूट
जालन्यात जे घडलं, ते फक्त एका आंदोलकावरची पोलिसी कारवाई नाही, लोकशाहीच्या तोंडावरच मारलेली ती लाथ आहे. महिनाभर उपोषण करणाऱ्या अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांना न्याय न देता, त्यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न रोखण्याच्या नावाखाली डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने कंबरड्यात लाथ घातली.
पोलिस प्रशिक्षणात आत्महत्या रोखण्यासाठी “लाथ” हा उपाय आहे का? की माणुसकी, संवाद आणि कायद्याचा मार्ग विसरून वर्दीतील गर्व आणि रागच तेव्हढा उरला आहे?
१५ ऑगस्टला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाल्याचा उत्सव साजरा करताना, आपल्या वर्दीवाल्यांकडूनच नागरिकांचा असा अपमान होत असेल, तर ही स्वातंत्र्याची नव्हे, गुलामगिरीची आठवण आहे.
हे कृत्य पोलिस मॅन्युअलमध्ये बसतं का?आणि जर नाही, तर हाच बूट कुणाच्या मानेला बसायला हवा?या प्रश्नाचे उत्तर गृहमंत्र्यांनीच द्यायला हवं
कुसुमाग्रज असते तर त्यांनी विचारलं असतं,“हीच का ती शपथ, जी तू वर्दी चढवताना घेतली होतीस?”
ढसाळ असते तर त्यांनी ठोकून सांगितलं असतं,“तुझा बूट आणि इंग्रजाचा बूट यात फरक नाही.”
कुसुमाग्रज यांच्या लेखणीने हा प्रसंग लोकशाहीच्या जखमेवर लिहून स्वातंत्र्य देवीला पुन्हा विनवणी केली असती,
ढसाळ यांच्या शब्दांनी तो बूट थेट सत्तेच्या दारावर फेकून मारला असता.
प्रश्न आज आपलाच आहे.त्या दोघांची लेखणी आपल्यात नाही,म्हणूनच आपल्या लेखनीला त्यांच्या शब्दांची धार लावून
रोषाचा आवाज मुजोर होऊ पाहणाऱ्या वर्दीच्या कानठळ्या बसे पर्यंत निनादायला हवा.
कुसुमाग्रज्यांच्या शैलीत सांगायचं तर
“स्वातंत्र्यदेवीला विनवणी”
स्वातंत्र्यदेवी,
तुझ्या स्वातंत्र्य दिवसाच्या उषःकाली
एक बूट पडला आहे,
जनतेच्या कमरेत,
लोकशाहीच्या पोटात .
वर्दीच्या वस्त्राखाली ,शपथ हरवली आहे,
मानवी संवेदना गंजलेल्या शस्त्रासारख्या
कोपऱ्यात फेकल्या गेल्या आहेत.
तू दिलेल्या स्वातंत्र्याच्या आभाळाखाली
आजही काही पावलांना इंग्रजाची चाल आहे,
त्या चालेला दिशा दे, त्या बुटाला माणुसकी शिकव.
—तर नामदेव ढसाळ म्हणाले असते,
कुलकर्णी,
तुझा बूट ओळखीचा वाटतो..
तो माझ्या आजोबांच्या पाठीवर बसलेल्या
इंग्रजाच्या बुटासारखाच आहे. …
तू म्हणशील, “मी वाचवलं त्याचं प्राण”
पण लाथ वाचवते का रे जीव?
लाथ तर अपमान करते,
अपमान ही हळूहळू मारणारा विषबाण असतो…
तुझ्या बुटाचा ठसा
फक्त आंदोलकाच्या कमरेवर नाही,
तो बसलाय लोकशाहीच्या छातीत,
आणि इतिहास बसला अश्रू ढाळीत….
कुमार कडलग
नाशिक
दुनियादारी won’t lie
*पंकज त्रिपाठी:सपनोंको चुनीए, ड्रग्ज को नही*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
………..
*राजकुमार राव :अपने सपनोंको ना तोडे, ड्रग्ज को अपनी मेहनत को चुराने ना दे!*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
…………………………………….
*शरद केळकर :अपने मन को मजबूत रखें,किसी भी कठीण समय मे सकारात्मक सोचे और ड्रग्ज जैसे किसी भी चीज से दूर रहे!*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
………………………………………
*मकरंद अनासपुरे :आपल्या मात्या पित्याच्या प्रेमाचा, अभिमानाचा सन्मान करा, कुठलीही नशा त्यांच्या दुःखापेक्षा मोठी नाही, त्यांना दुःख देऊ नका!*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇https://youtu.be/A1450r9cff8?si=q2SK0h1pwWKwwLMm
……*Just Say 👉No Drugs*……