महाराष्ट्र

व्यवस्था विरुद्ध आंदोलन :न्यायबुद्धीचा कस आणि लोकशाहीचा आरसा


 

 

व्यवस्था विरुद्ध आंदोलन :न्यायबुद्धीचा कस आणि लोकशाहीचा आरसा

जितेंद्र भावे हे नाव नाशिकच्या जनआंदोलनाच्या इतिहासात एक ठळक, पण वादग्रस्त ठसा उमटवत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी भ्रष्टाचार, अधिकार्‍यांची मुजोरी आणि अन्यायकारक धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. त्यांच्या भाषेत धार आहे, शब्दांत दाह आहे, आणि शैलीत कडवटपणा आहे; पण हेतू लोकांच्या हक्कांसाठी लढण्याचा आहे, हे नाकारता येत नाही.

मात्र, प्रश्न असा आहे, की आज भावेंवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा हेतू काय? ही खरी कायदेशीर आणि नीतिमान कारवाई आहे का? की ही सत्ता, प्रशासन आणि राजकीय संरचनेने आखलेली सूडनीती आहे? कारण लोकशाहीत गंभीर आरोप असलेल्या मोठ्या नेत्यांवर चौकशीची छाया सुद्धा पडत नाही, पण लोकांसाठी उभा राहणारा कार्यकर्ता क्षणार्धात गुन्हेगार ठरवला जातो. हे केवळ व्यक्तीवरचे हल्ले नाहीत,हे लोकशाहीच्या मणक्यावर केलेले वार आहेत.

व्यवस्था जेंव्हा एखाद्याला गप्प करण्यासाठी पोलीस, कायदा, यंत्रणा, सत्तेची सर्व साधनं वापरते, तेंव्हा तो केवळ व्यक्तीचा लढा राहत नाही. तो प्रत्येक नागरिकाच्या हक्कांवरचा थेट आघात ठरतो. कारण लोकशाहीची ताकद ही ‘विरोधकांच्या आवाजात’ असते. तो आवाज दाबून, गप्प करून लोकशाही जिवंत राहू शकत नाही.

पण दुसरी बाजूही दुर्लक्षून चालणार नाही. भावेंच्या आंदोलनाची पद्धत वादग्रस्त आहे.अनेकदा असंविधानिक, आक्रमक आणि कधी कधी व्यक्तीगत अपमानाच्या सीमारेषा ओलांडणारी. लोकशाही जपायची असेल, तर लोकशाहीची मूल्यं स्वतः पाळणं अपरिहार्य असतं. “जनता मालक आहे” हे सत्य आहे, पण ‘व्यवस्था’ ही जनतेपासून वेगळी कुठे आहे? नोकरशाहीही ह्या समाजाचीच अपत्यं आहेत. त्यातही प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ, कष्टकरी लोक आहेत. मग आंदोलनात सर्वांनाच भ्रष्ट, कर्तव्यच्युत, स्वार्थी ठरवणं हा न्यायाचा नाही, तर सूडाचा दृष्टिकोन ठरतो.

सार्वजनिक अपमान, शिवीगाळ, व्यक्तीची अब्रू चव्हाट्यावर आणणं, ही साधनं आंदोलनाला रोखठोक, प्रामाणिक आणि धाडसी बनवत नाहीत, उलट त्याची नैतिक उंची खालावतात. आंदोलनाचं खारट पाणी जेंव्हा अति खारट होतं, तेंव्हा तहान भागवण्याऐवजी घशाला खवखव सुटते.

आंदोलनकर्त्यांनी हेही समजून घ्यावं की केवळ अधिकार्‍यांवर राग काढून काही साध्य होत नाही. खरा संघर्ष तो आहे, जिथे सत्ता राबवली जाते,कायदेमंडळात, राजकीय पटलावर, निर्णयप्रक्रियेच्या गाभ्यात. आज ज्यांच्याविरुद्ध आंदोलन होतंय, त्यापैकी बरेचजण फक्त प्यादे आहेत.धागे खेचणारे हात वेगळेच आहेत. प्याद्यांवर दगड फेकून जखमा मिळतील, पण खेळ बदलणार नाही.

Advertisement

म्हणून आजचा प्रश्न केवळ “भावेंचे काय चुकले?” एवढाच नाही. तितकाच कठोर प्रश्न आहे—“व्यवस्थेचे काय चुकले?” आणि त्याहून टोकदार प्रश्न आहे “आपण, म्हणजे जनता, काय चुकते ?”

कारण लोकशाही फक्त न्यायालय, प्रशासन किंवा आंदोलनकर्ते यांच्यामुळे टिकत नाही.

ती तेंव्हाच टिकते जेंव्हा 

सत्ताधारी सत्याचा सामना करतात,

नोकरशाही पारदर्शक राहते,

आणि जनता प्रामाणिक आत्मपरीक्षण करते.

भावेंची लढाई खरी असेल, तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पण त्यांची पद्धत चुकली असेल, तर ती सुधारणं त्यांचं कर्तव्य आहे. आणि जर व्यवस्था त्यांच्या आवाजाला दडपून टाकत असेल, तर ती लढाई फक्त भावेंची राहणार नाही,ती प्रत्येक जागरूक नागरिकाची बनेल.

लोकशाहीच्या घरट्यातील अंडं फुटतंय का, की सडतंय,हे आपणच ठरवायचं आहे.कारण आवाज दाबला, तर पुढचा नंबर तुमचा, माझा असू शकतो.

-कुमार कडलग

नाशिक

दुनियादारी won’t lie 

…………

पंकज त्रिपाठी:सपनोंको चुनीए, ड्रग्ज को नही

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

………..

राजकुमार राव :अपने सपनोंको ना तोडे, ड्रग्ज को अपनी मेहनत को चुराने ना दे!

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

…………………………………….

शरद केळकर :अपने मन को मजबूत रखें,किसी भी कठीण समय मे सकारात्मक सोचे और ड्रग्ज जैसे किसी भी चीज से दूर रहे!

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

………………………………………

मकरंद अनासपुरे :आपल्या मात्या पित्याच्या प्रेमाचा, अभिमानाचा सन्मान करा, कुठलीही नशा त्यांच्या दुःखापेक्षा मोठी नाही, त्यांना दुःख देऊ नका!

👇👇👇👇👇👇👇👇👇👇https://youtu.be/A1450r9cff8?si=q2SK0h1pwWKwwLMm

..….Just Say 👉No Drugs……


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *