क्राईम

“त्या” सत्य-वीरांना अखेरचा सलाम!


“त्या” सत्य-वीरांना अखेरचा सलाम!

पत्रकार, हा फक्त बातमी देणारा नाही. तो सत्याचा पहारेकरी आहे, समाजाला जागं ठेवणारा आणि सत्तेच्या पेटाऱ्यात दबून राहिलेल्या आवाजाला जगासमोर आणणारा आहे. पण या सत्यासाठी उभं राहणं किती महागात पडू शकतं, हे आपण पुन्हा एकदा पाहिलं. अनस अल-शरीफ, मोहम्मद कुरैकेह, इब्राहिम जाहेर, मोआमेन अलीवा आणि मोहम्मद नौफाल यांच्या बलिदानात.

 

ही केवळ पाच नावे नाहीत. हे पाच सक्षम आवाज होते, जे गोळ्या, बॉम्ब, आणि भीतीच्या भिंती ओलांडूनही “जगाला हे माहीत असायला हवं” या विश्वासाने काम करत होते. त्यांनी जगासमोर उभं केलं ते दृश्य, जे अनेकांना पाहायचं नव्हतं.

आज त्यांच्या अनुपस्थितीत एक आग आहे, पण त्या आगीच्या ज्वालातून सत्याची ज्योत आणखी तेवणार आहे. कारण त्यांच्या बलिदानातून प्रत्येक सत्य प्रेमी निर्भय पत्रकाराच्या मनात ती पेटती राहणार आहे.

जेव्हा जगात सत्य सांगणार्‍यांचा आवाज गप्प बसवला जातो, तेव्हा लोकशाही, मानवता आणि न्याय कुठे उभे राहतात? पत्रकारितेवर हल्ला हा फक्त एका व्यक्तीवर नव्हे, तर लोकशाहीच्या आत्म्यावर हल्ला असतो.

म्हणूनच व्हॉईस ऑफ मीडियाच्या विचारपिठावरून “माध्यमांचा आवाज” त्यांना फक्त श्रद्धांजली वाहत नाही, तर एक वचनही देतो, जोपर्यंत प्रत्येक पत्रकार निर्भयपणे काम करू शकत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.यासाठी पत्रकारांचे हे हक्काचे विचारपीठ कटीबद्ध असेल.

हे शब्द केवळ श्रद्धांजलीचे नाहीत, तर व्हॉईस ऑफ मीडियाची पत्रकार आणि पत्रकारितेप्रती वचनबद्धता आहे, साम्राज्यवादी, स्टेट स्पॉन्सर्ड दहशतवादाला एक इशारा आहे, सत्याला मारता येत नाही. ते नेहमीच कुणाच्या तरी लेखणीतून, कुणाच्या तरी कॅमेर्‍यातून, कुणाच्या तरी धैर्यातून जिवंत राहतं.

पत्रकारांच्या हत्येचा अर्थ,लोकशाहीच्या गळ्याला फास

अनस अल-शरीफ, मोहम्मद कुरैकेह, इब्राहिम जाहेर, मोआमेन अलीवा, आणि मोहम्मद नौफाल, ही नावे फक्त हौतात्म्याची नाहीत, तर एक राजकीय गुन्ह्याची साक्ष देणारी आहेत.

ही पाच माणसं मारली गेली कारण त्यांनी सत्तेने लपवलेलं सत्य उघड करण्याचं धाडस केलं.

पत्रकारांची हत्या ही कुठल्याही देशात अपघाती घटना नसते. ती एक नियोजित मोहीम असते. सत्ताधाऱ्यांच्या अस्वस्थतेची आणि भीतीची जाहीर पावती.

जिथे कॅमेर्‍यावर बंदूक जिंकते, तिथे लोकशाही आधीच मरण पावलेली असते.

आणि जगातील अनेक सत्ताकेंद्रं आज हेच करत आहेत. सत्य सांगणाऱ्यांचा आवाज बंद करणे.

या हत्यांमागे केवळ बंदुकीची गोळी नाही, तर त्यामागे आहे राजकीय मौन आणि जागतिक पातळीवरची सोयीस्कर आंधळी दृष्टी.

जेव्हा पत्रकार मारले जातात, तेव्हा केवळ सरकार नव्हे तर त्या शांत, तटस्थ प्रेक्षकांचाही अपराधात सहभाग असतो, जे ‘हे आमचं प्रकरण नाही’ असं म्हणत बाजूला उभे राहतात.

 

VOM हा “माध्यमांचा आवाज” या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो, पण त्याच वेळी स्पष्ट सांगतो,

Advertisement

जोपर्यंत प्रत्येक पत्रकार निर्भयपणे काम करू शकत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही.

कारण ही फक्त पत्रकारितेची लढाई नाही, ही लोकशाहीच्या अस्तित्वाची लढाई आहे.

आज जर आपण या आवाजांसाठी लढलो नाही, तर उद्या जेव्हा आपला आवाज दाबला जाईल, तेव्हा लढायला कुणीच उरणार नाही.

 

Vom चा इशारा :-

“सत्याचा आवाज गप्प बसणार नाही”

सत्य लपवणाऱ्यांचा, दडपणाऱ्यांचा पर्दाफाश करणार.

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड करणार.

भीतीच्या सावलीत जगणाऱ्या प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी , उभं राहणार.

Vom ची धारणा :-

पत्रकारांची हत्या = लोकशाहीचा खून

सत्ताधाऱ्यांचे मौन = गुन्ह्यातील भागीदारी

जागतिक मौन = अत्याचाराला परवानगी

Vom च्या मागण्या:

1. पत्रकारांवरील हत्यांसाठी जबाबदारांना आंतरराष्ट्रीय कायद्याखाली तात्काळ शिक्षा.

2. युद्ध, संघर्ष आणि दमनाच्या प्रदेशात पत्रकारितेच्या संरक्षणासाठी जागतिक सुरक्षा करार.

3.  सरकार, न्यायालय आणि जनतेकडून प्रत्येक पत्रकाराला निर्भय कामाची हमी

 

Vomचे वचन

अनस अल-शरीफ, मोहम्मद कुरैकेह, इब्राहिम जाहेर, मोआमेन अलीवा, मोहम्मद नौफाल यांच्या बलिदानाचं बीज आम्ही संघर्षात पेरू.

सत्याचा आवाज बंद करण्यासाठी जो कोणी हात उचलणार, त्याला इतिहासाच्या न्यायालयात आणि जनतेच्या चौकात उभं करणार.

 

“सत्याची गोळी बंदुकीपेक्षा भारी”असते मित्रानो,

पत्रकारांचा खून म्हणजे केवळ एका व्यक्तीचं मरण नाही — तो लोकशाहीच्या गळ्याला लावलेला फास आहे.

अनस अल-शरीफ, मोहम्मद कुरैकेह, इब्राहिम जाहेर, मोआमेन अलीवा, मोहम्मद नौफाल… ही नावे फक्त पत्रकार नव्हेत, तर रणांगणात सत्याचा कॅमेरा उचलणारे सैनिक होते . त्यांनी गोळी झाडली नाही. पण सत्य झाडलं. आणि सत्याची गोळी बंदुकीपेक्षा जास्त घातक असते.म्हणूनच सत्तेला त्यांचा इतका राग होता.त्यांना गप्प बसवण्यासाठी गोळ्या झाडल्या गेल्या.

पण खरी गोष्ट ही आहे की, पत्रकाराचा मृत्यू म्हणजे केवळ त्याचा आवाज थांबवणं नाही, तर जनतेने डोळ्यांवर काळा चष्मा घालणं आहे.

 

सगळ्यात मोठा गुन्हा कुणाचा?

फक्त हत्याऱ्यांचा नाही, तर त्या सरकारांचा, आंतरराष्ट्रीय संघटनांचा आणि समाजाचा, जे हे सगळं पाहूनही गप्प राहतात.

मौन म्हणजे तटस्थता नाही तर मौन म्हणजे भागीदारी.

आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या जेव्हा तुमचं सत्य दाबलं जाईल, तुमच्यासाठी लढायला कुणी उरणार नाही.

म्हणून हा लढा फक्त पत्रकारांचा नाही, हा प्रत्येक नागरिकाच्या माहितीच्या हक्काचा लढा आहे.

 

-कुमार कडलग

नाशिक

सबसे बढियाँ,व्हॉईस ऑफ मीडिया!

लढेंगे, जितेंगे!

हम सब एक है “

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *