क्राईम

नाशिक पोलीसांच्या यशोगाथेला समर्पित   गुन्हे शाखेचा शौर्यगौरवः सजग पोलीस यंत्रणा म्हणजे सशक्त राष्ट्राचा पाया 


 

नाशिक पोलीसांच्या यशोगाथेला समर्पित 

 गुन्हे शाखेचा शौर्यगौरवः

सजग पोलीस यंत्रणा म्हणजे सशक्त राष्ट्राचा पाया 

देशाच्या सुरक्षिततेसाठी केवळ सीमेवरील जवान नव्हे, तर अंतर्गत सुरक्षेचं भक्कम जाळं उभं करणाऱ्या पोलीस दलाची भूमिका देखील तितकीच मोलाची आहे.

नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने अलीकडे केलेली एक धाडसी कारवाई हेच सिद्ध करते , की सजग पोलीस व्यवस्था म्हणजेच सशक्त राष्ट्राचा पाया.

पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या स्फोटक घटनांमध्ये सहभागी असलेला एक फरार आरोपी नाशिकमध्ये वेष व नाव बदलून लपून राहत असल्याची संवेदनशील माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) मिळाली. ही माहिती सामान्य नव्हती ,ही एक संभाव्य धोक्याची घंटा होती.

त्या क्षणी NIA ने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधताच, गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ची संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाली. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली एक अत्यंत कुशल, संयमी आणि गोपनीय ऑपरेशन सुरु झालं.

अदृश्य सावली ते अचूक अटकः

सातपूर एमआयडीसी परिसरातील गल्ल्यांतून संशयास्पद हालचालींचं बारकाईनं निरीक्षण, तांत्रिक विश्लेषण, परिसरात सातत्याने हालचाली,

अशा दोन दिवसांच्या अहोरात्र तपासानंतर पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा निश्चित केला आणि त्याला अचूकपणे अटक केली. ही अटक म्हणजे केवळ गुन्हेगारावर कारवाई नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेला दिलेले आव्हान परतून लावण्याचा यशस्वी प्रयत्न होता.

या यशस्वी कारवाईबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून गुन्हे शाखेला बहाल करण्यात आलेले प्रशंसापत्र हे केवळ औपचारिक सन्मान नव्हे, तर नाशिक पोलिसांच्या सजगतेची आणि समन्वयशक्तीची मान्यताच आहे.

तीन गोष्टी अधोरेखित करणारा प्रसंग

राष्ट्रीय आणि स्थानिक यंत्रणांतील विश्वास आणि समन्वयाचा दर्जा

तांत्रिक, गुप्तचर आणि भौगोलिक कौशल्याचा उत्तम वापर

गुन्हेगार कुठेही लपला, तरी पोलिसांची नजर टोकदार आणि तत्पर असते.

 

नाशिकचा बदलता चेहरा – ‘धार्मिक’ ते ‘ सजग शहर’:

अनेकदा पोलीस दलावर टीका होते. पण अशा प्रकारच्या संयमी आणि यशस्वी कामगिरीमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक घट्ट होतो.

Advertisement

आज नाशिक केवळ संत, परंपरा, कारखाने किंवा द्राक्षांसाठी ओळखलं जात नाही , तर अशा जागरूक आणि राष्ट्रनिष्ठ पोलिसांमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा नेटवर्कमध्ये विश्वासार्ह भागीदार म्हणून ओळख निर्माण करत आहे.

अंधारातील किरण…

जेव्हा संपूर्ण देशभर तपास यंत्रणा एका गुन्हेगाराच्या मागावर असतात, तेव्हा तो केवळ माहितीने सापडत नाही ;

तर मैदानात उतरून, शत्रूच्या सावलीत जाऊन, अचूक अटक करणारे सैनिक पोलीसच असतात.

 

सन्मानित पथक:

वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा महेश साळुंके, पोअं राहुल पालखेडे, पोअं आप्पा पानवळ, पोअं राम बर्डे, पोअं विलास चारोस्कर, पोअं नितीन जगताप, पोहवा माझीमखान पठाण पोअं समाधान पवार

 

सावध छाया, सजग हात”

गुन्हे शाखेचे शौर्यकाव्य

पश्चिमेचा स्फोटक काळोख ,

देशभर निखाऱ्यांचं सावट ..

तेव्हा एक शहर भान राखून,

नाशिक उभं असतं , झोप हरपून.

 

गुप्त माहिती, रेष ओलांडते,

NIAचं पथक नाशिकच्या दिशेने झेपावते.

“इथे आहे ,तो चेहरा नवा, नाव वेगळं,”

पण नजर नाशिक पोलिसांची,

 

जागरूक, प्रगल्भ आणि सजग.

 

सातपूरच्या गल्ल्यांपासून कारखान्याच्या छायेत,

सावलींमध्ये फिरतात चौकस डोळे,

संशयाचा धागा पकडत,

व्यूहात्मक चालीने, गुंफतात जाळं…

 

दोन दिवस सलग, काळजात काळ रात्र ,

 

पावलोपावली जोखीम, पण मनात एकच निर्धार ..

“शोधायचं त्याला… अटक हेच अंतिम अस्त्र!”

 

नाशिक गुन्हे शाखेचं पथक,

 

एक नेत्रदीपक झोत,

 

जणू अंधारावर उमटलेली स्फोटक सूर्यरेषांची पोत.

नाही बंदुका, नाही तोफा, नाही आरडाओरड,

फक्त शौर्य, संयम आणि देशासाठी निस्वार्थ योगदान.

 

अखेर…

जेथे गुन्हेगार चकवतो

तिथे सजग पोलीस सावली ओळखतात,

 

 

NIAचं कौतुक – शहराचा सन्मान

नाशिकचा अभिमान देशाचा सन्मान उजळून निघाला!

 

शब्द अपुरे, पण कर्तव्याची कविता गात राहते,

या सजग प्रहरींच्या शौर्याची गाथा

जनतेच्या मनात , विश्वास म्हणून नांदत राहते

शेवटी एवढंच…

“पोलीस म्हणजे काय?”

ते केवळ वर्दीधारी नाहीत 

ते त्या अंधारातील किरण आहेत,

जे राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी

रात्रींचा त्याग करून

दिवस शोधत राहतात.”

 

-कुमार कडलग ,नाशिक

दुनियादारी won’t lie


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *