क्राईम

“महाराष्ट्रात पत्रकारांना मरण पत्करून का लिहावं लागतंय?” एक वास्तव प्रश्न: पत्रकारांनी खरं लिहिणं बंद केलं, तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल? तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडेल?


“महाराष्ट्रात पत्रकारांना मरण पत्करून का लिहावं लागतंय?”

एक वास्तव प्रश्न:

 

पत्रकारांनी खरं लिहिणं बंद केलं, तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल? तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडेल?

पत्रकार आहे म्हणून प्रश्न विचारतो,

पत्रकार आहे म्हणून सत्य मांडतो,

पण पत्रकार आहे म्हणूनच आज त्याचा जीव धोक्यात आहे!

अकोला, नेवासा, नाशिक… ठिकाणं बदलत आहेत, पण पद्धत तीच आहे — बातमी दिलीस की हल्ला, गुन्हेगारांविरुद्ध लिहिलंस की खोटे गुन्हे, आणि व्यवस्थेला प्रश्न विचारला की आत्महत्येच्या टोकावर नेणारा मानसिक छळ!

हा केवळ पत्रकारांवरचा हल्ला नाही, हा लोकशाहीच्या श्वासावरचा घाला आहे. पत्रकार जेव्हा आवाज उठवतो,तेव्हा तो स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी करतो. पण आता प्रश्न असा आहे, समाज त्याच्यासाठी उभा राहील का?

आज जर एखादा पत्रकार जिवावर उदार होऊन तुमच्यासाठी बातमी करत असेल, तर उद्या तुमच्याच प्रश्नांना आवाज देणारा तोच पत्रकार जिवंत राहील याची खात्री आहे का?

पत्रकारांवर हल्ला म्हणजे, “लोकशाहीतील डोळ्यांमध्ये तापलेली सळई ठोसण्याचा कट आहे!”

वास्तव मांडणाऱ्यांचे तोंड बंद करायचं, भीतीचं वातावरण निर्माण करायचं, आणि मग समाजाला अंधारात ठेवायचं, हाच या सगळ्या कटाचा रोख आहे.

पण प्रश्न हा आहे की,

हे सहन करायचं का?

पत्रकारांनी जिवाच्या भीतीने माघार घ्यायची का?

की समाजानं एकत्र येऊन सांगायचं, “सत्य मांडणाऱ्याच्या मागे आम्ही भक्कम उभे आहोत!

राजकीय पोसलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना थेट आव्हान देणं कठीण आहे, पण अशा प्रवृत्तींना पराभूत करायचं असेल तर पत्रकार आणि समाज यांच्यातला विश्वासाचं नातं अजून बळकट करावं लागेल.

आज जर पत्रकार गप्प बसला, तर उद्या प्रत्येक सामान्य माणसाचं आयुष्य या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात जाणार आहे.

कारण,”पत्रकाराचा आवाज बंद होणे म्हणजे समाजाचं भविष्य दडपलं जाणं!

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्यात अग्रभागी असलेली, विचारस्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांची भूमी. परंतु, आज याच भूमीत पत्रकारांना प्रश्न विचारायचं धाडस केल्यामुळे गोळ्या खाव्या लागत आहेत, बातमी दाखवल्यामुळे ऍट्रॉसिटीचे गुन्हे झेलावे लागत आहेत, आणि कधीकधी मानसिक छळाने आत्महत्येच्या दरीत ढकललं जातंय.

Advertisement

अकोल्यात गुन्हेगारांविरुद्ध बातमी केली म्हणून संपादकावर प्राणघातक हल्ला होतो, नेवास्यात पत्रकारांवर हल्ला होतो, नाशिकमध्ये महिला पत्रकाराच्या पतीला आत्महत्येपर्यंत छळलं जातं, आणि गुन्हेगारांविरोधात बातमी केल्याने पत्रकारांवरच खोटे गुन्हे दाखल होतात… ही केवळ घटनांची साखळी नाही, तर ही महाराष्ट्राच्या लोकशाहीवर चाललेली एक संघटीत आणि बिनधास्त मोहीम आहे.

 

प्रश्न विचारणं हा पत्रकारांचा धर्म आहे, आणि तो धर्म पाळताना जर पत्रकारांना जीवाचा धोका जाणवत असेल, तर ती एकट्या पत्रकारांची नाही, तर समाजाच्या विवेकाची हत्या आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसते, ती सत्तेवर प्रश्न विचारण्याची ताकद असते. आणि हीच ताकद दाबण्यासाठी गुन्हेगार, राजकीय स्वार्थी प्रवृत्ती आणि व्यवस्थेतील काही बेजबाबदार घटक यांची बेहिशोब धडपड सुरू आहे.

सर्वात मोठं दुःख म्हणजे,या घटनांवर प्रतिक्रिया देताना व्यवस्थेची उदासीनता. पोलीस कारवाई करतात, पण ती केवळ “कागदोपत्री” मर्यादित असते. राजकीय पक्ष फक्त निवेदनं देतात, पण प्रत्यक्ष पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं कुणीच उचलताना दिसत नाहीत.

हे वास्तव भयावह आहे. कारण पत्रकार जर सुरक्षित नसेल, तर समाजाची माहिती मिळवण्याचा हक्कच धोक्यात येतो. हा हक्क कुठलाही कायदा, कुठलाही गुन्हा दाखल करून हिरावून घेतला जाऊ शकत नाही.

पत्रकारांवर होणारे हे हल्ले केवळ पत्रकारांवर नाहीत, तर ते सामान्य जनतेवरचं बौद्धिक हल्ले आहेत. आज जर आम्ही एक पत्रकार म्हणून शांत राहिलो, उद्या एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला वाचा उघडण्याचाही अधिकार शिल्लक राहणार नाही.

शेवटी एकच गोष्ट अधोरेखित करावी लागेल,

लोकशाहीत पत्रकारांचे स्वातंत्र्य म्हणजे जनतेचा श्वास असतो. हा श्वास घोटण्याचा प्रयत्न ज्या प्रवृत्ती करत आहेत, त्यांना सर्व समाजाने एकजुटीनं रोखलं पाहिजे. कारण हा प्रश्न फक्त ‘पत्रकाराचा’ नाही, हा प्रश्न आहे, “सत्याचा!”

“काय चाललंय महाराष्ट्रात? कशी करायची पत्रकारिता?”, हा फक्त पत्रकारांचा नाही तर एकूणच लोकशाहीतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अस्वस्थ करणारा सवाल आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सध्या पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांची मालिका चिंताजनक आहे.

शेवटी एक वास्तव प्रश्न:

पत्रकारांनी खरं लिहिणं बंद केलं, तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल? तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडेल?

-कुमार कडलग,नाशिक

दुनियादारी won’t lie 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *