क्राईम

सकारात्मक दृष्टिकोन :ही आहे वज्रमुठची खरी कमाई! मुख्यमंत्री फडणवीस यांनी जपली महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा 


सकारात्मक दृष्टिकोन :ही आहे वज्रमुठची खरी कमाई!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जपली महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा 

 

वज्रमूठ आणि मुख्यमंत्री यांच्यात वाद नाही तर सवांद झाला.या चर्चेत सुडाची नाही तर जबाबदारी आणि कर्तव्याची भावना होती. केवळ विरोधासाठी विरोध नसावा तर तत्वाने भांडण करून आपली भूमिका प्रति पक्षाला पटवून देता येऊ शकते, या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांचे प्रतीक ही बैठक होती.

 

वाद की सवांद, शोध की प्रतिशोध,, विरोध तात्विक की केवळ विरोधासाठी हा दृष्टिकोन राजकीय जीवनात महत्वाचा ठरतो. संघटनात्मक बांधणीसोबत व्यक्तीगत पातळीवर देखील यश की अपयश हे ठरविण्यात या दृष्टिकोनाची भूमिका महत्वाची ठरते. महाराष्ट्राच्या राजकारणात नमूद मुद्द्यांचा सूक्ष्म अभ्यास करून सकारात्मक पावलं ठाकणारे राजकीय नेते एका वेगळ्या उंचीवर गेले आणि आजही त्यांची उदाहरणे दिली जातात. त्याच मार्गावर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास सुरु असल्याचे दिसते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आणि बहुजन समविचारी संघटनांच्या शिष्टमंडळाशी केलेली चर्चा. आणि शिष्टमंडळासॊबत प्रदीर्घ चर्चा, शिष्टमंडळाकडून आलेल्या सुचनांचा आदर. प्रामुख्याने मंत्री आणि आमदारांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. ती टीका अगदीच वास्तव नाही.त्यातच सत्ताधारी आमदार आणि मंत्र्याच्याही वाचाळगीरीने भर घातली. त्या वाचाळगीरीला विरोध करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होणे, खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढले. या अन्यायाविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषातून वज्रमुठ बांधली गेली आणि त्याची दुसरी राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीत बहुजन मराठा बहुजन चळवळीचा तरुण चेहरा, आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले करण गायकर यांनीमंत्री, आमदार या जबाबदार मंडळींच्या वात्रट, बेताल वाचाळगीरीवर बोट ठेवून त्यांना मुख्यमंत्र्यांनी या वाचाळवीरांना प्रशिक्षण द्यावे, अशी सूचना मांडली होती.

लोकप्रतिनिधी प्रशिक्षित असावे यात काहीच गैर नाही. उलट ते असावेतच.हाच धागा पकडून आपली दुनियादारीने त्याचे विश्लेषण केले होते.

Advertisement

महाराष्ट्राची ही वज्रमुठ काल म्हणजे बुधवार दिनांक ३० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर गेली होती. मराठा आरक्षण आणि इतर सामाजिक मुद्दे आज ज्या गंभीर वळणावर आहेत, ते लक्षात घेता वज्रमुठ आणि शासन यांच्यात ठिणगी पडेल. भेट नाकारली जाईल. वज्रमुठ सैल होऊन रिकाम्या हाताने माघारी फिरेल असे आडाखे बांधले जात होते. तथापी तसं काही घडलं नाही. मुख्यमंत्र्यांनी वज्रमुठीचे मन मोकळे स्वागत केले. केवळ भेटच दिली नाही तर प्रदीर्घ चर्चा करून चर्चेतील सर्व मुद्यांवर सकारात्मक भूमिका घेतली. जवळपास सर्व मागण्या मान्य देखील केल्या.

 

लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शन शिबिराविषयक सूचना मुख्यमंत्र्यांना चांगलीच भावली. ती आजची गरज असल्याचेही त्यांच्या लक्षात आले आणि सर्व मंत्री आणि आमदारांसाठी लवकरच दोन दिवसांचे, जनसेवा व लोकसंपर्क मार्गदर्शन शिबिर घेण्यात येईल, असे जाहीर केले. ही बैठक संघर्ष नव्हे तर संवादासाठी होती. आणि त्यातून जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यावेळी ‌‘वज्रमूठ‌’ व्यासपीठ सरकारला आगामी काळात जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत राहील असे सांगतानाच सरकारने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण झाली नाही तर, घटनात्मक चौकटीत आंदोलक स्वरूपात सर्व संघटना पुन्हा एकत्र येईल, याच्या पुनरुच्चारही ‌‘वज्रमुठ‌’तर्फे करण्यात आला.

एकूणच वज्रमूठ आणि मुख्यमंत्री यांच्यात वाद नाही तर सवांद झाला. या चर्चेत सुडाची नाही तर जबाबदारी आणि कर्तव्याची भावना होती. केवळ विरोधासाठी विरोध नसावा तर तत्वाने भांडण करून आपली भूमिका प्रति पक्षाला पटवून देता येऊ शकते, या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांचे प्रतीक ही बैठक होती. मुख्यमंत्र्यांची राजकीय भूमिका, विचार कुठलेही असतील, पण आपण कुठल्या एका विचाराचे, एका पक्षाचे प्रतिनिधी नाही आहोत,तर महाराष्ट्र राज्याचे पालक आहोत. कुटुंब प्रमुख म्हणून कानावर येणारे गाऱ्हाणं ऐकलं पाहिजे. त्याला पर्याय दिला पाहिजे, ही उदात्त भावना मुख्यमंत्र्यांनी जपली आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा अधोरेखित केली. हीच वज्रमुठची खरी कमाई.

-कुमार कडलग,नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *