तोतया किन्नरांमुळे ‘खऱ्या’ किन्नर समाजाची बदनामी; ‘मानवता किन्नर समाजा’कडून प्रशासनाकडे कारवाईची मागणी;पोलिस आयुक्तांना दिले निवेदन
तोतया किन्नरांमुळे ‘खऱ्या’ किन्नर समाजाची बदनामी; ‘मानवता किन्नर समाजा’कडून प्रशासनाकडे कारवाईची मागणी;पोलिस आयुक्तांना दिले निवेदन
नाशिक प्रतिनिधी :
नाशिक शहरात धार्मिक पर्वांच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून आलेल्या तोतया किन्नरांकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे खऱ्या किन्नर समाजाची बदनामी होत असल्याची तक्रार “मानवता किन्नर समाज नाशिक” या संस्थेने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना केली आहे.
संस्थेच्या अध्यक्षा सलमा गुरु नायक यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, सध्या नाशिक शहरातील विविध वर्दळीच्या आर. के., जत्रा हॉटेल परिसर, पाथर्डी फाटा, सीबीएस, शालिमार, नाशिक रोड रेल्वे स्टेशन, महामार्ग व चौकांतील वर्दळीच्या भागात हे तोतया किन्नर वाहनचालकांना आणि पादचार्यांना अडवून जबरदस्तीने पैसे उकळत आहेत.
अवैध वेश्या व्यवसाय, लुटमार व धमकावणीचे प्रकार हे या बनावट किन्नरांच्या टोळ्यांकडून उघडपणे सुरु आहेत. काही ठिकाणी धारदार शस्त्रांचा वापर करून नागरिकांना भयभीत केल्याचेही निदर्शनास आले आहे.
सलमा गरु नायक यांनी सांगितले की, “या तोतया व्यक्तींमुळे खऱ्या किन्नर समाजाविषयी गैरसमज निर्माण होत असून, समाजाची प्रतिमा मलिन केली जात आहे. याआधीही आम्ही प्रशासनाला अशा प्रकारांबद्दल तक्रार केली होती, त्यावेळी कारवाईही झाली. मात्र, सध्या हे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करावी लागत आहे.”
कुंभमेळा पवित्र पर्वासारखा महत्त्वाचा धार्मिक सोहळा लवकरच नाशिकमध्ये पार पडणार असल्याने, शहरात बाहेरून आलेल्या अशा व्यक्तींच्या हालचालींवर नजर ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.प्रशासनाकडून या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई होण्याची अपेक्षा शहरातील नागरिकांसह किन्नर समाजाकडून व्यक्त होत आहे.



