क्राईम

….आणि हो सजा देखील मग त्यांनाच व्हायला हवी! “भोंदू फक्त अशोक खरात नाही… समांतर काळ्या व्यवस्थेचे मुखवटे कधी फाटणार?”


….आणि हो सजा देखील मग त्यांनाच व्हायला हवी!

“भोंदू फक्त अशोक खरात नाही… समांतर काळ्या व्यवस्थेचे मुखवटे कधी फाटणार?”

कुमार कडलग, नाशिक

अशोक खरात हे नाव आज केवळ एका व्यक्तीचे राहिलेले नाही; ते सत्तेच्या गलियार्‍यात, पैशाच्या अंधाऱ्या मार्गांत आणि समाजाच्या विवेकहिनतेत रुजलेल्या विकृतीचे प्रतीक बनले आहे. प्रश्न केवळ इतकाच नाही की तो भोंदू आहे, विकृत आहे किंवा त्याने श्रद्धेचा गैरवापर केला. खरा प्रश्न हा आहे की ही विकृती इतकी वर्षे वाढू कशी दिली गेली? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न ती नेमक्या याच क्षणीच का उघड झाली?

हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले जात आहे का, याविषयी निर्माण झालेल्या शंका काही उगाच नाहीत. कारण घटनांची मालिकाच संशयाला खतपाणी घालणारी आहे. राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतील अशा काही घडामोडी ऐन प्रवाहात असताना अचानक विशेष तपास पथक स्थापन होते, एका रात्री नाट्यमय अटक होते आणि मग एकामागून एक फाइल्समध्ये दडलेले “कच्चे चिठ्ठे” बाहेर येऊ लागतात. बाहेरून सगळं गोपनीयतेच्या नावाखाली झाकलं जातं, पण त्याचवेळी काही ठरावीक माध्यमांपर्यंत नेमकी माहिती पोहोचते. यामुळे जनमानसात प्रश्न उभा राहणं स्वाभाविक आहे.हा तपास न्यायासाठी आहे की नियोजनबद्ध राजकीय पटकथा?

पण या सर्व संशयांच्या धुरामागे एक मोठी आग आहे, आणि ती म्हणजे अशोक खरात नावाच्या व्यक्तीभोवती उभी राहिलेली समांतर काळी व्यवस्था.

ही केवळ भोंदूगिरी नाही. हा फक्त अंधश्रद्धेचा बाजार नाही. हा एक संपूर्ण नेटवर्क आहे.प्रभाव, पैशांची देवाणघेवाण, गुप्त संबंध, सत्तेतील लोकांशी जवळीक, आणि हजारो कोटींच्या काळ्या बाजाराची शक्यता.

समाजाला सर्वात जास्त हादरवणारी बाब म्हणजे या जाळ्यात सामान्य भक्तांइतकेच आमदार, खासदार, मंत्री, उद्योगपती, नामवंत चेहरे यांची नावे चर्चेत येत आहेत. इथे काही लोक अत्यंत साळसूदपणे असा युक्तिवाद करत आहेत की “सामान्य माणूस गेला तर बातमी होत नाही, पण एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव आले की बातमी होते.” हा युक्तिवाद केविलवाणा आहे. कारण सामान्य माणूस सामान्यच असतो; पण तुम्ही स्वतःला असामान्य स्थानावर नेले आहे,म्हणूनच तुम्ही आमदार, खासदार, मंत्री आहात.

जे लोक जनतेचे प्रतिनिधित्व करतात, ज्यांच्याकडून समाज मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवतो, तेच जर अशा विकृत आणि भोंदू प्रवृत्तीच्या नादाला लागले, तर दोष फक्त त्या भोंदूचा राहत नाही,दोष तुमचाही तितकाच, किंबहुना अधिक मोठा ठरतो.

कारण अशोक खरातला विवेक नव्हता, नैतिकता नव्हती, तो विकृत होता हे मान्य. पण तुम्ही तर स्वतःला सुशिक्षित, शहाणे, निर्णयक्षम म्हणवता ना? मग तुम्ही त्याच्या जाळ्यात का अडकलात?

हा प्रश्न टाळून चालणार नाही.

या प्रकरणात समाजाने एक अत्यंत अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती पाहिली आहे.भोंदू एकटा नसतो; त्याला मोठे लोक मोठे करतात.

Advertisement

सामान्य माणसाच्या श्रद्धेचा गैरवापर करून त्यातून पैसा कमावणे ही पहिली पायरी असते. पण जेव्हा सत्ताधारी, प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य चेहरे त्याच्याशी सलगी करतात, तेव्हा त्या भोंदूपणाला “वैधता” मिळते. लोकांना वाटते, “फलाणा आमदार जातो, अमुक उद्योगपती जातो, मग यात काहीतरी असणारच.”

याच मानसिकतेवर ही काळी व्यवस्था फोफावते.

अशोक खरात हा म्हणूनच एक व्यक्ती नसून संपूर्ण सामाजिक-राजकीय सडलेपणाचा आरसा आहे.

श्रद्धेच्या नावावर शरीरसुख, प्रभाव, ब्लॅकमेल, पैशांची उलाढाल, आणि गुप्त फाईल्समध्ये दडवलेले कच्चे चिठ्ठे या सगळ्याने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की ही व्यवस्था केवळ अध्यात्मिक फसवणूक नाही; ती सत्ता आणि स्वार्थाचा गुप्त महामार्ग आहे.

आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या प्रकरणातील “मोठे चेहरे” खरोखर उघडे पडतील का?

की तपासाचा रोख एका व्यक्तीपुरता मर्यादित ठेवून समांतर व्यवस्थेतील बाकीचे चेहरे सुरक्षित बाहेर काढले जातील?

कारण इतिहास सांगतो.अशा प्रकरणांत बहुतेकदा “मुख्य आरोपी” जनतेसमोर फेकला जातो आणि त्याच्या आड दडलेले मोठे लोक पडद्यामागे निसटतात.

जनतेला आता फक्त अटक, चौकशी आणि प्रेस नोट्स नको आहेत. जनतेला संपूर्ण सत्य हवे आहे.

कोणत्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी, उद्योगपतींनी हे जाळे विणले, या जाळ्याला बळ दिले?

कुणा कुणाच्या पैशांनी ही समांतर व्यवस्था उभी राहिली?

कोणत्या संस्थांनी किंवा माध्यमांनी त्याला देवत्वाचा मुलामा दिला?

आणि सर्वात महत्त्वाचे या व्यवस्थेतून कुणाचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध साधले गेले?

जर अशोक खरात भोंदू आहे, विकृत आहे, तर त्याच्या नादाला लागलेले “शहाणे” लोक निरपराध कसे?

त्यांनी आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा आणि समाजातील विश्वासाचा गैरवापर केला नाही का?

जनतेसमोर स्वच्छ प्रतिमा आणि बंद दाराआड अशा विकृत जाळ्याशी संबंध,हा दुहेरी चेहराच तर आहे.

म्हणूनच या प्रकरणात शिक्षा केवळ एका भोंदू व्यक्तीपुरती मर्यादित राहता कामा नये.

त्याला मोठं करणारे, त्याच्याकडे जाणारे, त्याच्या जाळ्याला वैधता देणारे, त्यातून फायदा घेणारे आणि त्याच्या नावावर काळा बाजार उभा करणारे,प्रत्येक चेहरा चौकशीच्या केंद्रस्थानी आला पाहिजे.

समाजाचा संताप याच गोष्टीवर आहे.भोंदूला शिक्षा होईल, पण त्याला देव बनवणारे आणि त्याच्या विकृतीत सहभागी होणारे प्रतिष्ठित चेहरे वाचणार तर नाहीत ना?

हा लेख म्हणून एका व्यक्तीवर प्रहार नाही; हा सत्तेच्या, पैशाच्या आणि ढोंगी प्रतिष्ठेच्या समांतर काळ्या व्यवस्थेवर हल्ला आहे.

भोंदूगिरीचा सर्वात धोकादायक चेहरा तो नसतो जो फसवतो,तर तो असतो जो सर्व काही समजूनही स्वतःच्या स्वार्थासाठी त्या फसवणुकीला खतपाणी घालतो.

आता समाजानेही ठरवायला हवे,

आपण फक्त भोंदूवर दगड मारणार, की त्याला उभे करणाऱ्या महालाचेही दरवाजे फोडणार?

कारण दोष फक्त अशोक खरातचा नाही.

दोष त्या प्रत्येक “शहाण्या” चेहऱ्याचा आहे, ज्याने स्वतःच्या पदाची लाज न बाळगता या विकृतीसमोर नतमस्तक होणे पसंत केले.

आणि हो सजा देखील मग त्यांनाच व्हायला हवी.

 

दुनियादारी won’t lie 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *