वज्रमुठ सर्व लढवय्या संघटनांची: नाशिकमध्ये राज्यव्यापी बैठक संपन्न; उद्या मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेण्याचा निर्धार
वज्रमुठ सर्व लढवय्या संघटनांची:
नाशिकमध्ये राज्यव्यापी बैठक संपन्न; उद्या मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेण्याचा निर्धार
नाशिक प्रतिनिधी
विविध सामाजिक, शेतकरी, मराठा आणि पुरोगामी विचारांच्या समविचारी संघटनांनी वज्रमुठ आवळली असून त्या संदर्भात दुसरी राज्यव्यापी बैठक आज नाशिक येथे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत राज्यात वाढणारे अन्याय, सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे, आंदोलनकर्त्यांवरील प्राणघातक हल्ले या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन ठोस आंदोलनात्मक दिशा ठरवण्यात आली.
बैठकीत ठरल्याप्रमाणे, ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी प्रतिनिधी मंडळ भेट घेणार आहे. ही भेट संवादासाठी असून घटनात्मक मार्गाने न्याय मागण्याचा उद्देश ठेवूनच हा पुढाकार घेण्यात आला आहे.
बैठकीतील ठळक मागण्या व ठराव:
1. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतंत्र कायदा.
2. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जप्रकरणी दोषींवर कारवाई.
3. सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा.
4. इंद्रजित सावंत यांच्यावरच्या प्रकरणात दोषींवर कायदेशीर कारवाई.
5. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यासह थोर महापुरुषांच्या अपमानावर कठोर कारवाई.
6. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व दोषींवर कारवाई.
7. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीची चौकशी.
8. विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी.
9. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे.
10. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेला आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करणे.
या बैठकीत सहभागी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला, की हा संघर्ष केवळ मराठा समाजाचा नसून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठीचा आहे. सरकारने जर योग्य ती कारवाई केली नाही, तर ‘जशास तसे’ उत्तर देण्यात येईल, असा निर्धार करण्यात आला.
सरकारने पोलीस यंत्रणा राजकीय हेतूंनी न वापरता घटनात्मक मार्गाने काम करावे, अशी एकमुखी मागणीही करण्यात आली.
या बैठकीला विविध जिल्ह्यांतून आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यात करण गायकर, सुभाष दादा जावळे, महादेव देवसरकर, विलास पांगारकर,राजेश मोरे, शिवा तेलंग, विजय वाहुळे, राजू देसले, प्रफुल वाघ, आशिष हिरे,नवनाथ शिंदे,योगेश गांगुर्डे, मनोरमा पाटील, प्रवीण पाटील, अश्विनी पाटील, सविता वाघ, प्रताप भोसले, निलेश गायकवाड, भारत पिंगळे,शुभम महाले, दादासाहेब जोगदंड यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.



