खा. वाजे यांच्या शिष्टाईला यश ; आवर्तनास पाटबंधारे विभागाचा हिरवा कंदील भोजापूर कालवा दुथडी ; कडवा कालव्यातूनही पुर पाणी वाहणार
खा. वाजे यांच्या शिष्टाईला यश ; आवर्तनास पाटबंधारे विभागाचा हिरवा कंदील
भोजापूर कालवा दुथडी ; कडवा कालव्यातूनही पुर पाणी वाहणार
सिन्नर प्रतिनिधी
संतत धारेमुळे नदी पात्रात वाहून जाणारे पाणी कडवा आणि भोजापूर कॅनाल मध्ये सोडावे ही खा. राजाभाऊ वाजे यांची मागणी नाशिक पाट बंधारे विभागाने मान्य केली असून भोजापूर कॅनाल मध्ये पूर पाणी सोडण्यात आले आहे, तर कडवा कॅनलमध्येही पाणी सोडले जाणार आहे. या संदर्भात खा. वाजे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता शहाणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंमलबजावणी करण्यात आली.
सिन्नर व निफाड तालुक्यातून जाणारा कडवा धरणावरील कालव्यावर बहुतांश शेतकरी अवलंबून आहेत. यावर्षी सिन्नर तालुक्यात पुरेश्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली नसून टंचाई सदृश्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या आवर्तनाची मागणी होत होती. त्या अनुषंगाने खा. वाजे यांनी पाटबंधारे विभागाला पत्र देऊन कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली.
सिन्नर व निफाड तालुक्यातील मौजे किर्तागळी, खडांगळी, पिंपळगाव, पंचाळे, महाजनपुर, सोनगाव, रामनगर (बेरवाडी), भुसे, औरंगपुर (श्रीरामपूर), भेंडाळी व इतर ग्रामपंचायतीचे व लाभधारक शेतकऱ्यांचे पाणी आवर्तन सोडण्यासाठीची मागणी आहेत. पुरपाण्याचे आवर्तन सोडल्यास विहिरींना पाड़ार येऊन या गावांमधील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.