क्राईम

पत्नीनेच केला पतीचा घात; स्थानिक गुन्हे शाखेने उलगडले मालगोंदा खुनाचे रहस्य


 

 

 

 

पत्नीनेच केला पतीचा घात;

स्थानिक गुन्हे शाखेने उलगडले मालगोंदा खुनाचे रहस्य

 

सुरगाणा प्रतिनिधी

दारूच्या नशेत पतीने गळा दाबला म्हणून संतप्त झालेल्या पतीने कुऱ्हाडीचा घाव घालून पतीचा खून केल्याचे रहस्य नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उलगडले आणि तब्बल दोन महिन्यापूर्वी दाखल मिसिंग प्रकरणाची अखेर झाली.

या संदर्भात जिल्हा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील यशवंत मनोहर ठाकरे हा ४२ वर्षाचा तरुण दोन महिन्यांपासून बेपत्ता होता. सुरगाणा पोलिस ठाण्यात त्याची मिसिंग दाखल होती.

समांतर तपास करतांना स्थानिक गुन्हे शाखेने पती बेपत्ता असल्यापासून मोल मजुरीसाठी बिलमोरा येथे गेलेल्या त्याच्या पत्नीचा शोध घेतला. आणि तिला विश्वासात घेत सखोल चौकशी केली. त्यानंतर पत्नी प्रभावती यशवंत ठाकरे हिने या गुन्ह्याची कबुली दिली.

Advertisement

, दि. १४/०४/२०२५ रोजी दुपारचे सुमारास तिचे पती यशवंत ठाकरे हे मद्य प्राशन करून घरी आले व तिने जेवण वाढून दिले असता, त्यांनी जेवण फेकून दिले. तसेच काही कारण नसतांना यशवंत याने त्याचे पत्नीस शिवीगाळ मारहान केली, त्यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. राग अनावर झाल्याने यशवंत याने त्याची पत्नी प्रभावती हिचा गळा दाबला, तेव्हा प्रभावती हिने घराचे पढवीमध्ये बाजुस असलेली कु-हाड घेवुन यशवंत याचे डोक्यात मारली तेव्हा तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर पत्नीने डोक्यात मारले याचा राग मनात धरून यशवंत याने आता मी तुला मारूनच टाकतो असे बोलल्याने, त्याची पत्नी प्रभावती हिने तिचे हातातील कु-हाडीने त्याचे मानेवर घाव घालुन जमीनीवर खाली पाडले, त्यात तो मयत झाला. त्यानंतर प्रभावती हिने आता तिला शिक्षा होईल, या भितीने कोणालाही काहीच न सांगता, तसेच तिला मारतांना कोणीही बघितलेले नाही याची खात्री करून तिने यशवंत याचा मृतदेह ओढत नेऊन त्यांचे घराचे पढवीच्या बाजूस शौचालयासाठी खोदुन ठेवलेल्या खड्डयात पुरून, त्यावर आजुबाजूचा कचरा व माती टाकुन खड्‌डा बुजवून त्यावर लाकुड ठेवून दिले. तसेच तिने परिधान केलेले कपडे देखील पेटवून दिले व कु-हाडीस लागलेले रक्त पाण्याने धुवून टाकून सर्व पुरावे नष्ट केले. त्यानंतर दोन दिवसांनी मयत याचे वडील मोहन ठाकरे हे तिचे घरी आले असता, त्यांना यशवंत हा कामासाठी गुजरात राज्यात गेला असल्याचे सांगितले, व तिचा मुलगा हा देखील त्याचे मामाचे घरी बिलीमोरा येथे कामासाठी गेल्याची थाप मारली.

या कबुलीनंतर सुरगाणा पोलीस ठाण्यात गुरनं १४०/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शौचालयासाठी केलेल्या खड्डयात पुरलेल्या अवस्थेत मिळुन आला असून त्याची पत्नी प्रभावती यशवंत ठाकरे, वय ३६, रा. मालगोंदा, पो. सतखांब, ता. सुरगाणा हिस गुन्हयाचे पुढील तपासकामी सुरगाणा पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

 

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरणकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोहवा किरण बैरागी, पोकॉ कैलास मानकर, महिला पोहवा ललिता शिरसाठ यांचे पथकाने वरील क्लिष्ट स्वरूपाचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *