दुचाकी चोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ; १० मोटर सायकल हस्तगत ;०७ गुन्हे उघडकीस
दुचाकी चोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ;
१० मोटर सायकल हस्तगत ;०७ गुन्हे उघडकीस
नासिक प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात वाढत असलेल्या दुचाकीच्या चोर्या रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने उघडलेल्या मोहीमेला मोठे यश आले असून पांढुर्ली गावातील संशयितांकडून तपास पथकाने १० दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
जिल्हा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
नाशिक जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते. या वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील संभाव्य आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटर सायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेवून सिन्नर तालुक्यातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेत सदर गुन्ह्यात चोरी गेलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळवले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा तपास करीत असतांना, सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गाव शिवारात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदाराकडून मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील पांढुर्ली चौफुली परिसरात सापळा रचुन अजय दत्तात्रय दळवी, वय २१, रा. विंचूर दळवी, भावदेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक,अनिकेत श्रीधर मानकर, वय २४, रा. राहुरी, भगुर-पांढुर्ली रोड, ता.जि. नाशिक या दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळाले. त्यांच्या ताब्यातील बजाज पल्सर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी व त्यांचा साथीदार नावे चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके, रा. विंचुर दळवी, ता. सिन्नर (फरार) अशांनी मिळून सदरची मोटर सायकल चिंचोली ता. सिन्नर येथुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.
तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, दोडी, तसेच घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपुर परिसरातुन एकुण १० मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.
*आरोपींच्या कबुली जबाबात उघड झालेले दाखल गुन्हेः*
1) सिन्नर पो.स्टे. गुस्ने ३३३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
२) वावी पो.स्टे. गुरनं २५०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२).
३) संगमनेर शहर पो. स्टे. जिल्हा अहिल्यानगर, गुरण ६९७/२०२४ भा. न्या. से. कलम ३०३(२).
४) वणी पो.स्टे. गुरणं १९२/२०२४ भा.द.वि. कलम ३.
५) वावी पो.स्टे. गुरुनं ३०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
६) घोटी पी.स्टे. गुरनं ६३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
७) श्रीरामपुर शहर पो.स्टे. जिल्हा अहिल्यानगर गुरनं ५१२/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२)
जप्त मुद्देमालः ०४ हिरो स्प्लेंडर, ०१ बजाज २२० पल्सर, ०१ बजाज प्लॅटीना, ०२ बजाज पल्सर, ०१ रॉयल इनफिल्ड बुलेट, ०१ होण्डा यूनिकॉर्न अशा एकुण चोरीच्या १० मोटर सायकल किं, रू. ०८ लाख ३५ हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपींना सिन्नर पोलीस स्टेशनकडील गुरनं ३३३/२०२४ भा.द.वि.क. ३७९ कलमान्वये अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.
फरार आरोपी चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके हा अभिलेखावरील गुन्हेगार असुन तो सिन्नर पो.स्टे. कडील भादवि कलम ३७६, सह पॉक्सो कायद्यान्वये दाखल असलेले गुन्हयात सुमारे ०३ वर्षापासून मध्यवर्ती कारागृहात होता, जामीनावर सुटल्यानंतर त्याने त्याचे वरील साथीदारांसह मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलीस पथक त्याचा कसोशिने शोध घेत आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सपोउनि नवनाय सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटर सायकल चोरीवे ०७ गुन्हे उघडकीस आणुन चोरीच्या १० मोटर सायकल हस्तगत केल्या आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.



