सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने शहर पोलिसांचा होमवर्क सुरु आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत पूर्व अधिकाऱ्यांनी दिल्या टिप्स
सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने शहर पोलिसांचा होमवर्क सुरु
आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत पूर्व अधिकाऱ्यांनी दिल्या टिप्स
नाशिक प्रतिनिधी
डिसेंबर २०२६ मध्ये ध्वजरोहन होऊन आगामी कुंभमेळ्याला सुरुवात होणार असल्याने तयारी करण्यासाठी प्रशासनाच्या हातात अवघा सव्वा वर्षाचा कालावधी उरला आहे. त्याच अनुषंगाने प्रशासनाचे सर्व विभागाच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. या कुंभमेळ्यात गर्दीचे सारे विक्रम मोडीत निघणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने गर्दीचे व्यवस्थापन करून कुंभ निर्विघ्न पार पाडण्याचे आव्हान पोलिस आयुक्तालयासमोर असले तरी हे आव्हान स्वीकारून येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सारे शिलेदार सज्ज झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वारंवार बैठका घेऊन अनुभवी अधिकारी, एन जी ओ तसेच जेष्ठ नागरिकांशी सातत्याने संवाद सुरु आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दिनांक २०/०३/२०२५ रोजी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली आय.एम.आर.टी. कॉलेज सभागृह, मॅरेथॉन चौक, गंगापूर रोड, नाशिक येथे आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेसाठी प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे, किरणकुमार चव्हाण परिमंडळ १ मोनिका राऊत परिमंडळ २, चंद्रकांत खांडवी पोलीस उपआयुक्त मुख्यालय सर्व सहायक पोलीस आयुक्त, सर्व प्रभारी अधिकारी पो.स्टे. शाखा, पो.स्टे. गोपनिय अंमलदार, सिंहस्थ कुंभमेळा कक्ष प्रभारी अधिकारी अंमलदार, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामिण, पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच यापुर्वी सिंहस्थ कुंभमेळ्यात काम केलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी महाराष्ट्र पोलीस अकादमी असे सर्व उपस्थित होते. सदर कार्यशाळे दरम्यान आपत्ती व्यवस्थापना बाबत रिजिलेंट इंडीया संस्थेचे राजीव चौबे तसेच इंन्टॅक संस्थेच्या रितु शर्मा, जय गोखले यांनी यापुर्वी आलेल्या अडचणी व त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित व चांगला होण्यासाठी काय काय उपाय योजना करणे आवश्यक आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले असुन संदर्भीत सादरीकरण केले. त्यांनतर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले अनुभवी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले अनुभव व त्यानां आलेल्या अडचणी सांगून त्यावर काय उपायोजना केल्या पाहिजेत याबाबत व यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळा २०१५-१६ मध्ये काम केलेले पोलीस अधिकरी यांनी मार्गदर्शन केले.
या सर्वांच्या मार्गदर्शना नंतर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सर्वांकडून प्राप्त झालेल्या सुचनांबाबत यादी तयार करुन महानगर पालीका, स्थानिक राजकीय नेते व स्थानिक नागरीक, यांचेशी समन्वय साधून त्यात काय सुधारणा करता येतील याबाबत अंमलबजावणी करण्याच्या व नाशिक शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे एन.सी.सी., आर.एस.पी., एन.एस.एस. चे विद्यार्थीनां स्वयंमसेवक म्हणून काम करणेसाठी प्रोत्साहन देणेबाबत तसेच सर्व पोलीस स्टेशन येथे पो.नि. गुन्हे व अंमलदार यांचा सिंहस्थ कुंभमेळा सेल स्थापण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.