पद गेल्याने पत संपली म्हणून भान सुटले नूतन सभापतींची बोचरी टीका नाशिक बाजार समिती सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड
पद गेल्याने पत संपली म्हणून भान सुटले
नूतन सभापतींची बोचरी टीका
- नाशिक बाजार समिती सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड
पंचवटी प्रतिनिधी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत चुंबळे गटाने पिंगळे गटाला धोबी पिछाड देऊन बाजार समितीवर कब्जा केला असून कल्पना चुंबळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सत्तेचा लपंडाव आणि भ्रष्टाचारापाठोपाठ पोलिस, न्यायालयाचे उंबरठे झीजवावे लागलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रथमच महिला सभापती लाभल्याने यावेळी तरी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही,अशा अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत.
नवीन सभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया बुधवार, (दि. १९) रोजी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि.११) रोजी झालेल्या बैठकीत १५ विरुद्ध ० ने तो मंजूर करण्यात आल्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सभापती देवीदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत संचालकांनी एकत्र येत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. पिंगळे यांच्या गटातीलच काही नाराज संचालक माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली आले आणि नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली. सभापतीपदासाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे आणि कल्पना चुंभळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड झाली.
चुंभळे गटाचे १५ संचालक बुधवारी सकाळी ११ वाजता थेट बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. यानंतर सभापतीपदासाठी अर्ज मागविण्यात आले असता कल्पना चुंभळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतांना देविदास पिंगळे आणि त्यांच्या सोबत अन्य दोन संचालकांनी प्रक्रिया सुरु असलेल्या सभागृहात प्रवेश केला,त्यावेळी शांततेत होणारी निवडणूक गाजणार अशी कुजबुज बाहेर सुरु होती. तथापी अवघ्या काही मिनिटात पिंगळे आणि त्यांचे समर्थक सदस्य यांनी सभागृहातून बाहेर येत काढता पाय घेतल्याने निवडणूक शांततेत बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले.
माजी सभापती शिवाजी चुंभळे, जेष्ठ संचालक संपतराव सकाळे, उपसभापती विनायक माळेकर, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, धनाजी पाटील, युवराज कोठुळे, प्रल्हाद काकड, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, कल्पना चुंभळे, सविता तुंगार, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील हे उपस्थित होते.
पत गेल्याने बेभान वक्तव्य :कल्पना चुंभळे
सभापती पदी निवडून आल्यानंतर जेष्ठ अनुभवी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा कारभार पारदर्शकपणे हाताळू. तसेच महिलांसाठी बाजार समितीती आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे नवनिर्वाचित सभापती कल्पना चुंभळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. संचालकांना पन्नास लाखांचे अमिष दाखवून आपल्या बाजूला वळविण्यात आले या पिंगळे यांच्या आरोपाला उत्तर देतांना कल्पना चुंभळे यांनी पिंगळे यांच्यावर बोचरी टीका केली. त्या म्हणाल्या, पद गेले त्यामुळे पतही गेली , त्यामुळे ते काहीही बरळत आहेत.ही तर गद्दारी : पिंगळे
निवडून मी आणले आणि पद आणि पैशासाठी त्या संचालकांनी गद्दारी केली. त्याचा निषेध म्हणून आम्ही गद्दारीचे इत्तीवृत्त लिहून सभात्याग करीत आम्ही या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. अशी प्रतिक्रिया हाराकिरी पतकरलेल्या देविदास पिंगळे यांनी दिली. या प्रतिक्रियेनंतर पिंगळे यांचा हा टोला बाजार समितीच्या संचालकांना होता की स्वतः अनेक वेळा केलेल्या राजकीय गद्दारीला. अशी चर्चा बराच वेळ बाजार समिती आवारात सुरु होती.