क्राईम

छत्तीसगडची पहिली महिला ऑलंम्पियाड करणार मविप्र मॅरेथॉनचा शुभारंभ; रेणुका यादव:उमलत्या खेळाडूंसाठी मॅरेथॉन एक सुवर्ण संधी 


छत्तीसगडची पहिली महिला ऑलंम्पियाड करणार मविप्र मॅरेथॉनचा शुभारंभ;

रेणुका यादव:उमलत्या खेळाडूंसाठी मॅरेथॉन एक सुवर्ण संधी 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

             मराठी संस्कृती जतन करा 

……………………………………………………………………………..

नाशिक प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेली मॅरेथॉन समाजातील उमलत असलेल्या खेळाडूंसाठी एक चांगली संधी आहे. या ठिकाणी राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पातळीवर वेळीवेळी आपले कौशल्य पणाला लावून विविध क्रीडा प्रकारात अनेक पदकं मिळवून कीर्तिमान स्थापन केलेले खेळाडू उपस्थित राहतात, त्यातून प्रेरणा मिळवून पराक्रमाचे स्फूलिंग चेतते. म्हणून अशा उपक्रमात नवोदितांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन छत्तीसगडच्या पहिल्या महिला ऑलम्पिक खेळाडू रेणुका यादव यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही नववर्षाच्या दुसऱ्या रविवारी म्हणजे दिनांक १२ जानेवारी रोजी फुल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उदघाट्न समारंभ हॉकी पटू रेणुका यादव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रेणुका यादव यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांच्या ऑलम्पिक प्रवास कथन केला.

 

फिल्ड हॉकीची राजकुमारी : रेणुका यादव

खेड्या-पाड्यावरचे स्वछंदी वातावरण आणि अवखळ बालपण हे बहुतेकांना संघर्षाविरुद्ध झुंजण्याची शक्ती निसर्गतःच प्रदान करत असते. कठीण परिस्थितीतही आनंद शोधत, जबाबदारीचं ओझं वाटू न देता जे जीवन जगतात, त्यांच्या यशोगाथा लिहिल्या जातात आणि त्यातीलच काही अगदी जगाच्या पटलावरही पोहोचतात. त्यातीलच एक असलेली रेणुका यादव ही ‘रिओ ऑलम्पिक २०१६’ स्पर्धेत भारतीय हॉकी संघात स्थान मिळविणारी सर्वात तरुण आणि छत्तीसगढची सर्वांत पहिली खेळाडू आहे. या तरुणीने बालपणातच कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून सायकलवरून दूध वाटण्याचे काम केले आणि या चाकांनीच तिच्या पायात बळ भरत भारतीय हॉकी संघात तिची जागा पक्की केली.

आईसोबत धुणीभांडी तर वडिलांसोबत दूधही वाटले!

१८ जुलै १९९४ रोजी छत्तिसगड मधल्या राजनांदगाव या महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यात शेतकरी असलेल्या यादवांच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रेणुकाचे बालपण गरिबीच्या कारणास्तव अत्यन्त खडतर आणि सुविधारहित गेले. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून प्रसंगी शालेय शिक्षण अर्धवट सोडून तिने काही घरांमध्ये आईसोबत धुणीभांडी करण्याचे काम केले तर कधी वडिलांसोबत सायकलवरून दूध वाटपाचे काम केले. हा संघर्ष करीत असतांना हॉकी विषयी माहिती मिळाली आणि एक सुप्त आकर्षण या खेळाविषयी तयार झाले. पारंपारिक विचारसरणी आणि गरिबीमुळे सुविधांची वाणवा याचा परिणाम साहजिकच रेणुकाच्या हॉकी खेळण्यास कुटुंबाकडून विरोध सुरु झाला परंतु घराला आर्थिक पाठबळ देत जमेल तसे प्रसंगी चोरून-लपून रेणुका हॉकीची साधना करीत राहिली.

Advertisement

 

ग्वाल्हेरच्या सिंधिया अकॅडमीने दिले पाठबळ:

ग्वाह्लेरची सिंधिया अकॅडमी मुख्यमंत्री सहायता निधीतून होतकरू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि खेळाविषयीच्या जडणघडणीला पाठबळ देते याची माहिती रेणुकाला मिळाली आणि अर्धवट राहिलेले शिक्षण सोबतच हॉकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी तिने ग्वाल्हेर गाठले आणि हॉकीच्या प्रशिक्षणातला आर्थिक अडथळा दूर झाला. तीन वर्षे तिथे प्रशिक्षण घेतल्यानंतर नशिबाने साथ देत १२ वीत असतांनाच तिला रेल्वेत टी.सी.ची नोकरी मिळाली आणि तिच्या हक्काचा शाश्वत असा आर्थिक स्रोत सुरु झाला.

कष्टाने कमतरतेवर केली मात:

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कुठल्याही क्षेत्रात स्पर्धात्मक आव्हाने पुष्कळ आहेत. अशात देशासाठी खेळणाऱ्या संघात आपले स्थान पक्के व्हावे आणि राष्ट्रकुल, आशियाई आणि सरतेशेवटी ऑलिम्पिक सारख्या जगप्रसिद्ध स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटावा, ही प्रत्येक खेळाडूची स्वप्ने असतात. तशीच रेणुकाचीही होती. स्पर्धात्मक चढाओढीत त्या वेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत रेणुकाचा नंबर काही लागला नाही. त्यांनतर रेल्वे टी. सी. प्रशिक्षण आणि खेळाचा सराव अशी तारेवरची कसरत सांभाळताना आशियाई स्पर्धेतील सहभागाचीही तिची संधी हुकली. स्वतःला मिळालेल्या या रिजेक्शनला पॉसिटीव्हली घेत तिने प्रशिक्षकांना स्वतःच्या कमतरतांविषयी विचारले आणि त्यावर मेहनत घेत मात केली.

स्वप्नपूर्ती तिच्या डोळ्यांतून ओघळते तेव्हा!

भारत वरिष्ठ संघात आल्यानंतर दोनच वर्षांत तिने जवळपास १२ जागतिक स्पर्धा खेळत तिने आपला खेळ बहरवला आणि एक दिवस अचानक रिओ ऑलिम्पिक २०१६ च्या स्पर्धेत भारतीय संघातर्फे खेळण्यासाठी ती पात्र झाल्याचा निरोप आला तेव्हा तिची स्वप्नपूर्ती तिच्या डोळ्यांतून ओघळत होती.

 

अकॅडमी उभारण्याचे रेणुकाचे ध्येय:

‘आपण कोण म्हणून आणि कोणत्या आर्थिक-सामाजिक परिक्षेत्रात जन्माला आलो, या गोष्टी आपल्या प्रतिभेपासून वंचित ठेऊ शकत नाही, सुरुवातीला थोडा त्रास होतो. परंतु आपण आपल्या ध्येयाप्रती ठाम असलो तर कोणत्याही परिस्थितीत आपण विजयी होऊ शकतो’ अशी वाक्ये रेणुकाच्या तोंडून ऐकतांना तिने संघर्षावर कोरलेली यशोगाथा ठामपणे झळकते. स्वतःला आणखी सक्षम करण्याबरोबरच राजनांदगावातून पर्यायाने छत्तीसगढमधून आणखी रेणुका वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकाव्यात, यासाठी रेणुका सुविधायुक्त परिपूर्ण अकॅडमी उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *