अवैध सावकारीचा ग्रामीण भागाच्या गळ्याला फास; प्रशासनाने सक्रिय होण्याची गरज
अवैध सावकारीचा ग्रामीण भागाच्या गळ्याला फास;
प्रशासनाने सक्रिय होण्याची गरज
☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
प्रशांत हिरे / सुरगाणा
जिल्ह्यासह ग्रामीण भागात खासगी सावकाराच्या कारनाम्याचे पेव दिवसेंदिवस वाढत चालले. आहे. नागरिकांकडून अवैध वसुली करणाऱ्या खासगी सावकारांना कायद्याचा धाक राहिलेला दिसून येत नाही. सावकाराने बेकायदेशीररित्या दिलेल्या रकमेच्या व्याजाची अव्वाच्या सव्वा वसुलीने नागरिक त्रस्त झाले असून ‘त्या’ खासगी सावकाराने नागरिकांना धमक्या देऊन मानसिक छळ सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. ग्रामीण भागातील व्यावसायिक, कामगार, शेतकरी, बेरोजगार तरुण यापैकी अनेकांना आर्थिक गरज पडते. अशा वेळी त्यांचा आर्थिक प्रश्न बैंक,पतसंस्थामधून सुटत असला तरी सगळ्यांना कर्ज मिळतेच असे नाही. गरजेला ऐनवेळी कुणी कर्ज देत नसल्याने तातडीने पैसे उपलब्ध होण्यासाठी अनेक वेळा खासगी सावकारांच्या दारात जावे लागत असल्याने ग्रामीण भागात अवैधरित्या कर्ज देणारे असंख्य सावकार आहे यांच्याकडे कुठलाही परवाना नाही. कुणाच्या तरी मध्यस्थीने पैसे दिले जातात. एक महिन्यासाठी शेकडा पंधरा ते वीस टक्यांप्रमाणे सावकार पैसे देतात. कजपिक्षा व्याज जास्त होत असल्याने अनेक नागरिक खासगी सावकाराच्या जाचाला भयभीत झाले आहे. ग्रामीण भागात शेती, सिंचन, मुला- मुलींचे लग्न, पाल्यांचे शिक्षण, घर बांधकाम, शेती आवजारांसाठी पैशाची गरज लागते. त्यामुळे अवैध सावकारी ग्रामीण भागात जोरात सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, शेतकरी, छोटा व्यावसायिक व तरुणांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना अव्वाच्या सव्वा व्याज दराने कर्ज देऊन मालमत्ता ताब्यात घेण्याच्या धमक्या दिल्या जातात. राज्य सरकारच्या सावकारी नियमन अध्यादेश २०१४ या सुधारित नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्या व्यक्तिंवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रशासनाने आक्रमक भूमिका घेणे गरजेचे
सावकार दरमहा दर शेकडा पाच टक्के ते दहा-पंधरा टक्के असा बेहिशोबी व्याजदर आकारतो. शिवाय कोरे धनादेश, मुद्रांक यावर गरजुंची सही घेऊन वेळप्रसंगी मोठी आकडेवारी यावर टाकून फसवणूक केली जाते. खासगी सावकारांच्या दादागिरीमुळे अनेकांना जीवन नकोसे झाले आहे. काही खासगी सावकारांची सावकारकी राजकीय वरदहस्तातून सुरू आहे. सध्या स्थितीला शहर आणि ग्रामीण भागात मिळून शेकडो अनधिकृत सावकारांनी आपला अवैध सावकारीचा व्यवसाय जोरात सुरू ठेवला आहे. सहकार खात्याकडे या विरोधात लोकांनी तक्रार दाखल केल्यास सहकार खाते आणि पोलीस प्रशासन मिळून यावर अंकुश येऊ शकतो. भविष्यातील धोका ओळखून प्रशासनाने आक्रमक भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.