क्राईम

ऑनलाईन गेम्सचे तरुणांमध्ये वाढते आकर्षण ; हारजीतच्या भुलथापांनी पिढी होतेय कर्जबाजारी


ऑनलाईन गेम्सचे तरुणांमध्ये वाढते आकर्षण ;

 

हारजीतच्या भुलथापांनी पिढी होतेय कर्जबाजारी

 

 

प्रशांत हिरे / सुरगाणा

 

कोणती क्रिकेटची टीम जिंकणार किंवा रमीमध्ये कोणती तीन पत्ती लागणार? यावर आकडे लावून ज्याची तीन पत्ती अथवा टीमचा अंदाज अचूक येईल, त्याला पैसे मिळतात. सार्वजनिक बंदी असलेला हा जुगार आता ऑनलाईन पद्धतीने खेळला जात आहे. यासाठी खास विंझो, माय इलेव्हन सर्कल, रमी सर्कल, जंगली रमी आणि ड्रीम्स ११ यासारख्या ऑनलाईन गेमिंग ऍप्सची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ऍप्सची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. या खेळाच्या जुगारामध्ये पैसे हरल्याने अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत, तर काहींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ हा महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम (१८८७) कायदा म्हणून राज्यभर लागू आहे. कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी जुगार किंवा मटका खेळण्यास मनाई आहे. कोणीही व्यक्ती जुगार खेळताना आढळल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. पण या मनाईमुळे पारंपरिक आकडे लावून चालणारा जुगार आता सर्रासपणे ऑनलाईन खेळला जात आहे. सध्याचे कायदे हे ब्रिटिशांच्या काळातील असून, त्यात कालपरत्वे बदल होणे अपेक्षित आहे. त्यानुसार या ऑनलाईन जुगारावर नियंत्रण आणण्याकरिता प्रचलित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारला नवीन कायद्याचा मसुदाही सादर केला आहे, परंतु, अद्यापही तो कागदावरच आहे. काही तरुण मुले पैसे कमविण्याच्या शॉर्टकट मार्ग म्हणून मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळतात. त्यातून हजारो तरुण याच्या आकर्षणाचे शिकार बनत असून, त्यांना आर्थिक लाभ होण्याचे तर द्रच पण ती मुले घरातील आर्थिक गणिते सुद्धा बिघडवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यांना नैराश्य, आर्थिक अडचणी, शिक्षणात व कुटुंबाच्या कामात वेळ देता न येणे, निद्रानाश आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पच्या माध्यमातून अनेक जीवघेण्या ऑनलाइन गेम्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत. पैशाच्या हव्यासापोटी तरुणाई ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन कर्जबाजारी, व्यसनाधीन, निद्रानाशाचा तरुणाईला फटका बसत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन गेमच्या माध्यमातून ‘काही तासातच लाखो रुपये कमवा करोडपती व्हा’ अशी आमिषे दाखविणाऱ्या जाहिरात दिवसभरात सतत पाहायला मिळत आहेत. तरुणाई याकडे ओढली जात असून, कर्जबाजारी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement

 

चौकट

 

             *पैसे हरल्यामुळे झोप उडणे*

 

रात्री उशिरापर्यंत जागून मोबाईल गेम खेळणे तसेच पैसे हरल्यामुळे झोप उडणे अशा मानसिक नैराश्यातून मद्यपानाकडेही ओढा वाढला आहे. एकंदरीतच हे ऑनलाइन पैसे मिळवून देण्याचा दावा करणारे गेम तरुणाईसाठी घातक ठरत आहेत, हे मात्र नक्की आहे. अशा या ऑनलाइन गेमच्या घातक खेळापासून तरुणाईला रोखण्यासाठी सामाजिक संस्थानी मार्गदर्शनपर शिबिरे राबविण्याची गरज आहे.

 

 

*नवीन मसुद्यात कोणत्या तरतुदी ?*

 

महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा (१८८७) यात बदल करून मोबाईल प्लिकेशन किंवा लिंकद्वारे गेमच्या नावाने महसुली कर आणि विविध कर बुडविणारा जुगार नियंत्रणात आणण्यासाठी जुगार चालविणाऱ्यावर तीन ते सात वर्षांसाठी कारावास, पाच लाखाच्या दंडाची शिक्षेची तरतूद सुचविली आहे. किमान २५ टक्के तरी कर आकारला जावा, असे त्यात नमूद आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *