दिंडोरीत युती आघाडीला बंडखोरीचे ग्रहण ; झिरवाळ यांना महाले यांचे तर चारोसकरांना रेहरे यांच्या उमदेवारीची डोकेदुःखी
दिंडोरीत युती आघाडीला बंडखोरीचे ग्रहण ;
झिरवाळ यांना महाले यांचे तर चारोसकरांना रेहरे यांच्या उमदेवारीची डोकेदुःखी
वणी सुरेश सुराशे
तीनास तीन अशी गाठ बांधलेले महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांसमोर विधानसभा निवडणुकीत उभे ठाकणार असले तरी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या महत्वकांक्षेला धुमारे फुटू लागल्याने बंडखोरीचे वाढते प्रमाण दोन्ही पक्षांना आव्हान देत आहे. दिंडोरी मतदार संघात देखील युती आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोर उमेदवारांनी दंड थोपटले आहेत.
महायुतीचे अधिकृत उमेदवार नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादीची उमेदवारी करीत असून त्यांच्याविरुद्ध इच्छुक धनराज महाले यांनीही शंख फुंकून उमेदवारी अर्ज भरला.
महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली असून महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार संतोष रेहरे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संतोष चेहरे यांच्या उमेदवारीमुळे दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघात महायुतीत बंडखोरी होऊन सर्वप्रथम माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आ. नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी त्याचप्रमाणे प्रचार चालू केला आहे महाविकास आघाडीच्या वतीने यापूर्वी सुनीता चारोस्कर व संतोष रे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला. त्यानंतर आता उमेदवारी जाहीर होताना सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी घोषित झाली. त्यामुळे संतोष रेहरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिंडोरी, कोचरगाव, मोहाडी, खेडगाव, उमराळे, वणी, अहिवंतवाडी गटात सर्व कार्यकर्त्यांनी संतोष रेहरे यांना उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह केला आहे. संतोष रहरे यांच्यावर जनतेचे प्रेम असल्याने त्यांनी अर्ज भरावा, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्याने संतोष रेहरे यांचे सोशल मीडियावर प्रचंड मेसेज व्हायरल झाले. प्रत्येक ग्रुप वर संतोष रेहरे यांचाच अपक्ष उमेदवाराची चर्चा होती त्यामुळे पुढील काळात माजी आमदार धनराज महाले यांच्या अपक्ष उमेदवारीने आव्हान नरहरी झिरवाळ यांना राहील तर सुनिता चारोस्कर यांच्यापुढे संतोष रेहरे यांच्या उमेदवारीची आव्हान राहील पण खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल.