बंद बंगल्याच्या आवरातून ३५ लाखांचा चंदन साठा जप्त ; ट्रान्सिट पास आणि साठवणूक परवाना नसल्याने संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
बंद बंगल्याच्या आवरातून ३५ लाखांचा चंदन साठा जप्त ;
ट्रान्सिट पास आणि साठवणूक परवाना नसल्याने संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक प्रतिनिधी
वनविभाग नाशिक पश्चिमच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात म्हसरूळ शिवारातील रासबिहारी लिंक रोडवरील निर्जन भागात कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या जुन्या जीपमध्ये तसेच बंगल्यातील रूममध्ये साडेतीन हजार किलोंचा सुमारे 35 लाखांचा चंदनसाठा आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक वनपरिक्षेत्राचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक हृषिकेश रंजन यांच्या बंगल्यातील चंदनाच्या चार झाडांवर गुरुवारी (दि. 12) चंदनचोरांनी डल्ला मारला. यानंतर हृषिकेश रंजन यांनी नाशिक पश्चिमच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावत चोरांना पकडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक भावेश सिद्धेश यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी विशाल माळी (दक्षता), सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, वनक्षेत्रपाल हर्षल पारेकर, प्रभारी वनक्षेत्रपाल सविता पाटील यांच्या पथकाने तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान वणी दक्षता पथकाला पेठ येथील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयाची सूई म्हसरूळच्या शिवाल्य ट्रेडर्सकडे वळाली. म्हसरूळ भागातील या बंगल्याचा शोध घेतला अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या या बंगल्यात जुन्या जीपमध्ये (एमएच 15 बीजे 9765) चंदनाची पाच लाकडे आढळून आली. त्यानंतर वनअधिकाऱ्यांनी बंगल्याची झडती घेतली असता, बंगल्यात सुमारे साडेतीन हजार किलोंचा अंदाजे 35 लाखांचा चंदनसाठा आढळून आला. बंगल्याच्या मालकाचे नाव गोपाल रामलाल वर्मा असून, वनअधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता, सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला. जप्त करण्यात आलेल्या चंदनाच्या लाकडांच्या साठ्यात काही लाकडांवर वनविभागाकडून करण्यात येणारा क्रमांक आढळला. यामुळे चंदनाची झाडे नेमकी कोठून चोरण्यात आली याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. वनअधिकाऱ्यांनी त्यांचा अभिलेख तपासला असता, चंदनाची साठवणूक करण्याविषयीचा ट्रान्सिट पास आणि साठवणूक परवाना संबंधित व्यापाऱ्याकडे नसल्याचे तपासात समोर आले आहे.
चौकट
*छाप्यात आढळलेला साठा*
सालविरहित चंदन नग 265.150 कि.ग्रॅ.
सालविरहित चंदन तुकडा नग 41.108 कि.ग्रॅ.
कोर्ट केसमधील माल 2,375.050 कि.ग्रॅ.
पत्र्याच्या गोडाउनमधील माल 305 नग, 551.37 कि.ग्रॅ.
साल नग 2 (घ.मी.0.066)
चेन सॉ मशीन 4, कुन्हाड 3, छन्नी 2, वाकस 1, गिरमीट 1
*वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल*
वनविभागाची सर्व कागदपत्रे असल्याचा दावा संबंधित व्यापाऱ्याने केला आहे. त्याला कागदपत्रे सादर करण्यास आठ दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र साठवणूक परवाना आणि ट्रान्झिट पास नसल्याने वनअधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.