सिन्नरच्या मोहदरी घाटात सात लाखांची लूट दुचाकी स्वारावर सहा लुटारुंनी चाकू हल्ला करून पळवली रोकड
सिन्नरच्या मोहदरी घाटात सात लाखांची लूट
दुचाकी स्वारावर सहा लुटारुंनी चाकू हल्ला करून पळवली रोकड
सिन्नर प्रतिनिधी
नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी गावाजवळ दुचाकीस्वारावर चाकूने वार करीत त्याच्याकडील सुमारे साडे ७ लाख रुपये लूटल्याचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी (ता.२९) महामार्गावरील या लूटीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सागर नंदू चौधरी (वय ३२, पळसे) रेडियन्ड कंपनीच्या पुणे शाखेत कॅश एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. कंपनीचे सिन्नर तालुक्याचे क्षेत्र आहे. शहर व ग्रामीण भागातून मॉल व अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या कडील रोजची जमा होणारी रोकड व चेक बँकेत भरणा करण्यासाठी कंपनीसोबत करार केलेला आहे. चौधरी हे तालुक्यातील व्यावसायिकांकडून रोजची जमा होणारी रोकड व चेक जमा करून नाशिक येथील बँकेत जमा करण्याचे काम करतात.
*पाळत ठेउन हल्ला*
नेहमीप्रमाणे जमलेली ७ लाख ५३ हजार ४१६ रुपयांची रोकड, धनादेश घेऊन दुचाकीने दुपारी नाशिकला जात होते. मोहदरी गावाजवळील गतीरोधकाजवळ त्यांच्या पाठीमागून नंबर नसलेल्या दोन दुचाकीवरील सहा अनोळखी लुटारूपैकी एका दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने सागर चौधरी यांच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केले. चौधरी यांनी त्यांची दुचाकी थांबवली असता दोन्ही दुचाकीवरील सहा लुटारुनी त्यांच्याकडील हॉकी स्टिकने तसेच लाथा बुक्क्यांनी चौधरी यांच्यावर थेट हल्ला केला. मारहाणीत त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावून तेथून पळ काढला. काही वेळातच हल्ला करीत रोकड लांबविल्याचा हा प्रकार लक्षात आल्यावर जखमी चौधरी यांनी आरडाओरड करीत परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी जखमी चौधरी यांना रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा अनोळखी लुटारूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक यशवंत बाविस्कर तपास करत आहेत.