चांदवडला वृद्धाची तीन लाखांची लूट; चांदवड पोलीसांत दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल
- चांदवडला वृद्धाची तीन लाखांची लूट; चांदवड पोलीसांत दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल
चांदवड प्रतिनिधी
येथील इंद्रायणी कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी वृद्धाकडून ३ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी चांदवड पोलीसांत दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदवड येथील इंद्रायणी कॉलनी येथील रहिवासी केशवराव भिका पगार (८१, मुळ रा. देवळाणे ता. सटाणा) हे सोमवारी (दि. २२) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास एका कापडी पिशवीत तीन लाख रुपयांची रकम घेऊन इंद्रायणी कॉलनीतून घराकडे जात असताना सुरेश पाटील यांच्या घरासमोर पाठीमागून दुचाकीवर भरधाव आलेल्या दोघा चोरट्यांपैकी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने पगार यांच्या हातातील पिशवी हिसकावून घेत दुचाकीवरुन पोबारा केला. याबाबत केशवराव पगार यांनी चांदवड पोलीसांत फिर्याद दिल्याने पोलीसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. नर्हे करीत आहेत.
—–