क्राईम

ही आहेत निलंबनाची कारणे :भाग १ एसटीच्या नाशिक विभागात बेशिस्तीचा कळस; स्वच्छतागृहापासून आर्थिक अनियमिततेपर्यंत धक्कादायक प्रकार, ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारनाम्यांचा अहवाल


ही आहेत निलंबनाची कारणे :भाग १

एसटीच्या नाशिक विभागात बेशिस्तीचा कळस; स्वच्छतागृहापासून आर्थिक अनियमिततेपर्यंत धक्कादायक प्रकार, ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारनाम्यांचा अहवाल

नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागातील तब्बल ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनामागील कारणे अखेर समोर आली असून नियंत्रण अधिकारी तथा महाव्यवस्थापक (मावत) यांनी सादर केलेल्या सुमारे ४०५ पानी अहवालात विभागातील कारभाराचे अत्यंत धक्कादायक चित्र उघड झाले आहे. बसस्थानकांतील अस्वच्छता, प्रवाशांच्या सुविधांकडे झालेले दुर्लक्ष, नोंदवह्यांतील गंभीर त्रुटी, बसफेऱ्यांमधील अनियमितता, चालक-वाहकांच्या रजा व अतिकालिक भत्त्याचा बेजबाबदार वापर, वाहन दुरुस्तीतील हलगर्जीपणा, स्थानिक खरेदीतील अनियमितता, खर्च नियंत्रणाचा पूर्ण अभाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

दि. १० जून २०२६ रोजी नियंत्रण अधिकारी तथा महाव्यवस्थापक यांनी मुख्य सांख्यिकी अधिकारी व नियोजन अधिकाऱ्यांसह नाशिक विभागातील इगतपुरी व नाशिक-२ आगाराला अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर केलेल्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या.

 

*स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था; प्रवाशांकडून स्वच्छता शुल्क, पण सुविधा शून्य*

इगतपुरी बसस्थानकावर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रवासी म्हणून भेट दिल्यानंतर पुरुष व महिला स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात आली. त्यावेळी स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ असून सर्वत्र घाण, दुर्गंधी आणि मलमूत्राचे साम्राज्य असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत स्वच्छतागृहाचा वापर करणेही अशक्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

………..

यांचे झाले निलंबन 

श्री श्रावण सोनवणे प्रादेशिक अभियंता 

श्री सचिन क्षीरसागर विभाग नियंत्रक 

श्री पंकज महाजन यंत्र अभियंता 

श्री किरण भोसले विभागीय वाहतूक अधिकारी 

श्री सौरभ देवरे आ व्य वरिष्ठ पंचवटी  

सौ निलिमा विसपुते लेखा अधिकारी नाशिक 

श्री संजय गायधनी विभागीय लेखा अधिकारी 

श्री अमोल वाघ विभागीय भांडार अधिकारी 

सौ अश्विनी चव्हाण विभागीय कर्मवर्ग अधिकारी 

सौ चैताली भुसारे विभागीय अभियंता 

श्री प्रणव अहिरे आ व्य इगतपुरी

……….

स्वच्छतेबाबत विचारणा केल्यानंतर सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याचे सांगण्यात आले. तर संबंधित वाहकाने “स्वच्छतागृह पाहणे माझे काम नाही,” असे उर्मट उत्तर दिल्याची नोंदही अहवालात आहे. आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय अभियंता, यंत्र अभियंता आणि विभाग नियंत्रक यांनी स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रवाशांकडून स्वच्छतेसाठी प्रत्येकी दोन रुपये आकारले जात असताना प्रत्यक्षात सुविधा अत्यंत दयनीय असल्याने महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

*कंट्रोल चार्टमध्ये गंभीर त्रुटी*

इगतपुरी आगारातील कंट्रोल चार्ट तपासताना सकाळी साडेदहापर्यंत सुटणाऱ्या २७ फेऱ्यांपैकी केवळ १३ फेऱ्यांचीच नोंद करण्यात आली होती. उर्वरित फेऱ्यांची नोंदच नव्हती. दोन फेऱ्या उशिरा सुटल्या तरी त्याची कारणे नोंदवली नव्हती.

Advertisement

महामंडळाने वेळेवर फेऱ्या चालविण्याबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने आगार व्यवस्थापकांसह विभागीय वाहतूक अधिकारी, यंत्र अभियंता आणि विभाग नियंत्रक यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

*वाहन निरीक्षण नोंदवही अपूर्ण*

वाहन निरीक्षकांच्या नोंदवहीत उशिरा सुटलेल्या फेऱ्यांची कारणे नोंदविण्यात आलेली नव्हती. वाहन वेळेवर उपलब्ध झाले की नाही, उशीर का झाला, देखभाल, ओव्हरटाईम आणि वाहन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या नोंदीच गायब असल्याचे आढळून आले.

*Issue and Start पद्धती केवळ कागदावर*

महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी लागू केलेली ‘इश्यू अँड स्टार्ट’ प्रणाली प्रत्यक्षात राबविण्यात येत नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. एका फेरीसाठी नोंदीनुसार बस सुटण्यापूर्वी १८ प्रवासी असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र ETIM मशीनची पडताळणी केली असता पहिले तिकीट बस सुटल्यानंतरच देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

यातून प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता केवळ कागदोपत्री नोंदी करून वरिष्ठांची दिशाभूल करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

*ट्रॅफिक मास्टर रजिस्टरच गायब*

इगतपुरी आगारात ट्रॅफिक मास्टर रजिस्टर फेब्रुवारी २०२६ पासून भरले गेलेले नव्हते. आधीच्या रजिस्टरमधील अनेक पाने कोरीच होती. एवढे महत्त्वाचे रजिस्टर उपलब्ध नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधीही त्याची विचारणा केली नाही किंवा तपासणी केली नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

*चालक-वाहकांच्या रजा, डबल ड्युटी आणि आर्थिक नुकसान*

आगारात आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचारी उपलब्ध असतानाही चालक आणि वाहकांना मोठ्या प्रमाणात रजा मंजूर करण्यात आल्या. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांकडून डबल ड्युटी करून घेण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर अतिकालिक भत्ता देण्यात आला.

गर्दीच्या हंगामात रजा कोटा कमी करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही त्याचे पालन करण्यात आले नाही. यामुळे महामंडळाचा खर्च वाढून आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवण्यात आला आहे.

 

*डिफॉल्ट रजिस्टर अपूर्ण*

डिफॉल्ट रजिस्टरमध्ये अनेक महिन्यांच्या नोंदीच नव्हत्या. शिस्तभंगाची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली होती. विभागीय कामगार अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभाग नियंत्रक यांनी या नोंदवह्यांची तपासणी केल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नव्हते.

यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राखण्याची यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचे स्पष्ट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

*अपघातग्रस्त बस १५ दिवस पडून; दोन लाखांचा महसूल बुडाला*

बुलढाणा विभागातील अपघातग्रस्त बस इगतपुरी आगारात तब्बल १५ दिवस दुरुस्तीशिवाय उभी होती. रेडिएटर दुरुस्तीचे साधे काम वेळेत न झाल्याने गर्दीच्या हंगामात वाहन रस्त्यावर आले नाही. यामुळे किमान दोन लाख रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठपका यंत्र अभियंते आणि प्रादेशिक अभियंत्यावर ठेवण्यात आला आहे.

 

  • (क्रमशः – भाग २ मध्ये : नाशिक-२ आगारातील धक्कादायक अनियमितता, विभागीय कार्यालयातील आर्थिक गोंधळ, CPKM, स्थानिक खरेदी, लेखा शाखेतील त्रुटी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील गंभीर ठपके.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *