क्राईम

….अखेर गीते आमदार झालेच! मुजोर सत्तेचा अहंकार आणि पडद्यामागील राजकारणाला चोख उत्तर;  नव्या पर्वाची सुरुवात;भाजपात दोन सत्ता केंद्र सक्रिय होणार?


.…अखेर गीते आमदार झालेच!

मुजोर सत्तेचा अहंकार आणि पडद्यामागील राजकारणाला चोख उत्तर;

 नव्या पर्वाची सुरुवात;भाजपात दोन सत्ता केंद्र सक्रिय होणार?

 

कुमार कडलग, नाशिक

……..

नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निकालाने केवळ एक आमदार निवडला नाही, तर अनेक वर्षे साचलेल्या राजकीय असंतोषाला वाट मोकळी करून दिली. गोकुळ गीते यांच्या विजयात फक्त त्यांचा व्यक्तिगत संघर्ष नाही, तर गणेश गीते यांच्या दीर्घ राजकीय प्रवासातील अपूर्ण राहिलेल्या आकांक्षांचाही प्रतिध्वनी ऐकू येतो. अनेक वर्षांची उपेक्षा, हिरमोड, राजकीय तिरस्कार आणि बाजूला सारल्याची भावना यांचा एकत्रित उद्रेक या निकालातून झाल्याचे दिसून येते.

या विजयाकडे केवळ एका निवडणुकीचा निकाल म्हणून पाहणे चूक ठरेल. हा निकाल नाशिकच्या राजकारणातील अनेक वर्षांपासून दबलेल्या भावनांचा उद्रेक आहे. विशेषतः पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघातील आणि पंचवटी परिसरातील राजकीय समीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत. अनेकांच्या मते, पंचवटीच्या कुटी (ल) परिसरात निर्माण झालेल्या विशिष्ट राजकीय वर्चस्वाला प्रभावी पर्याय उभा करण्याची क्षमता गीते गटात आहे आणि या निकालाने त्या शक्यतेला नवे बळ मिळाले आहे.

दराडे गटाविरोधात मतदारांमध्ये असलेली नाराजी ही केवळ राजकीय नव्हती, तर ती मानसिक होती. प्रतिस्पर्ध्याला राजकीय विरोधक म्हणून न पाहता त्याला कमी लेखणे, हिणवणे किंवा त्याच्या राजकीय अस्तित्वालाच गौण समजणे, अशी प्रतिमा विरोधकांनी सातत्याने रंगवली होती. ती कितपत खरी किंवा अतिशयोक्त होती हा वेगळा विषय; पण मतदारांच्या मनात ती भावना घर करून बसली होती, हे निकालाने स्पष्ट केले.

विशेषतः नव्या पिढीतील काही राजकीय वारसदारांमध्ये निर्माण झालेली मुजोरी, पद आणि सत्तेमुळे आलेला अति आत्मविश्वास, आणि “आम्हाला पर्याय नाही” हा समज मतदारांनी स्पष्टपणे फेटाळला आहे. लोकशाहीत मतदार शांत असतो, पण तो विसरभोळा नसतो. योग्य वेळी तो हिशेब चुकता करतो आणि हा निकाल त्याचाच पुरावा आहे.

मात्र या विजयाचे विश्लेषण करताना एक गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झाली, असे म्हणण्यास फारसा वाव नाही. कारण वास्तव पाहता दोन्ही बाजूंना तुल्यबळ आर्थिक ताकद उपलब्ध होती. धनशक्तीचा वापर कुठेच झाला नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण केवळ धनशक्तीच्या बळावर हा विजय मिळाला, असे म्हणणे त्याहून मोठे अर्धसत्य ठरेल.

कारण तसे म्हणणे म्हणजे गोकुळ गीते यांनी गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी ठेवलेला संपर्क, केलेले पडद्यामागचे परिश्रम, जपलेली नाती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांच्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा अपमान ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदार हे सर्वसामान्य जनतेप्रमाणे भावनिक लाटेत मतदान करणारे नसतात. हे मतदार राजकीयदृष्ट्या प्रगल्भ, अनुभवी आणि गणित समजणारे असतात. त्यामुळे त्यांचा निकाल हा बहुधा संदेश देणारा असतो.

Advertisement

या निवडणुकीत तो संदेश स्पष्ट होता, “दराडे कंपनीला धडा शिकवायचा.”

त्यातही अनेक स्तरांवर असंतोष कार्यरत होता. काहींना स्वतःच्या राजकीय उपेक्षेचा हिशेब चुकता करायचा होता. काहींना गेल्या काही वर्षांतील वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करायची होती. तर काहींना “संकटमोचक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही राजकीय शक्तींनाही त्यांची मर्यादा दाखवून द्यायची होती. त्यामुळे हा निकाल केवळ एका व्यक्तीच्या समर्थनाचा नसून अनेक नाराज प्रवाहांच्या संगमातून निर्माण झालेला राजकीय स्फोट होता.

या निकालाने आणखी एक वास्तव अधोरेखित केले. एकाच घरात किंवा एकाच गटात सत्ता एकवटली की संवाद कमी होतो, जनाधार गृहीत धरला जातो आणि हळूहळू राजकीय मस्ती वाढू लागते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील अनेक मतदारांच्या मनात गेल्या काही वर्षांत ही भावना निर्माण झाली होती. सत्तेची सलग उपलब्धता ही कधीकधी जनसंपर्काची उणीव निर्माण करते. पण लोकशाहीत त्याची किंमत कधीतरी चुकवावीच लागते.

गोकुळ गीते यांचा विजय हा त्या किंमतीची पावती आहे.

तथापि, या विजयातून काही निष्कर्ष काढताना अतिरेकही टाळला पाहिजे. गोकुळ गीते अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यांना पारंपरिक अर्थाने “बंडखोर” म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण त्यांच्या कुटुंबाची एकूण राजकीय वाटचाल, भाजपशी असलेले संबंध, आणि विशेषतः भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याशी असलेला प्रदीर्घ घरोबा पाहता, गीते यांची राजकीय भूमिका कोणत्या दिशेने असेल याचा अंदाज बांधण्यासाठी कुठल्याही राजकीय तत्त्ववेत्त्याची आवश्यकता नाही.

सभागृहात ते अपक्ष सदस्य म्हणून बसतील; मात्र त्यांची भूमिका बहुतांशी भाजपस्नेही आणि सहयोगी स्वरूपाची असेल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा विजय महायुतीविरोधी नसून महायुतीतील अंतर्गत समीकरणांना दिलेला संदेश मानणे अधिक योग्य ठरेल.

मात्र या निकालाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम आता शहर भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर दिसू शकतो. आजवर पडद्यामागे असलेली गटबाजी आता अधिक उघड स्वरूपात समोर येण्याची शक्यता आहे. विशेषतः गीते गट आणि विद्यमान विधानसभा सदस्य गट अशी दोन स्वतंत्र राजकीय केंद्रे अधिक स्पष्टपणे सक्रिय होताना दिसू शकतात. आगामी महापालिका, विधानसभा आणि संघटनात्मक निवडणुकांमध्ये या नव्या समीकरणांचा प्रभाव नक्कीच जाणवेल.

एकूणच, गोकुळ गीते यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नाही. तो अनेक वर्षे साचलेल्या नाराजीचा उद्रेक आहे. तो राजकीय अहंकाराविरुद्धचा इशारा आहे. तो कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाचा आवाज आहे. आणि त्याचवेळी तो नाशिकच्या राजकारणात नव्या सत्ताकेंद्राच्या उदयाची चाहूलही आहे.

आता पुढील काही वर्षांत गोकुळ गीते हा विजय राजकीय भांडवलात रूपांतरित करतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र आजच्या घडीला एवढे नक्की म्हणता येईल की,मतदारांनी केवळ आमदार निवडलेला नाही; त्यांनी नाशिकच्या राजकारणातील अनेक वर्षे अभेद्य वाटणाऱ्या एका समजुतीलाच मतदान पेटीतून पराभूत केले आहे.

-दुनियादारी won’t lie 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *