क्राईम

राजकीय घडामोडींना वेग…! धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार…?


राजकीय घडामोडींना वेग…! धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार…?

 

केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या राजकीय संबंधांबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत इशारा दिला की, आरोपीच्या राजकीय संबंधांचा विचार न करता त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या इशाऱ्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात येईल का…?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Advertisement

संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधकांनी वाल्मिक कराडचे नाव घेत धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. वाल्मिक कराड हे मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात, आणि याच कारणामुळे विरोधकांनी मुंडे यांना अधिवेशनात जोरदार फटके दिले. गुरूवारी आणि शुक्रवारी दोन्हीही दिवस मुंडे अधिवेशनात उपस्थित नव्हते, ज्यामुळे त्यांच्याबद्दल चर्चा आणखी वाढली आहे.

राजकीय वर्तुळात यावर चर्चा आहे की, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले जाईल. या संदर्भात आज सकाळी मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेटले. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामध्ये मुंडे यांना मंत्रिमंडळात राहायचं की नाही याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-कुबेर जाधव

नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *