*कांद्याला तीन हजाराचा भाव मिळण्यासाठी चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक;* *रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते ताब्यात*
*कांद्याला तीन हजाराचा भाव मिळण्यासाठी चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक;*
*रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते ताब्यात*
चांदवड | प्रतिनिधी
कांद्याला प्रतिक्विंटल ३००० रुपये हमीभाव मिळावा तसेच शेतीमालाला योग्य दर देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आज चांदवड चौफुली येथे शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखत तीव्र आंदोलन छेडले. ‘कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा’च्या माध्यमातून हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
![]()
![]()
शेतकऱ्यांनी हातात कांदे, गळ्यात कांद्याच्या माळा आणि सरकारविरोधी फलक घेत घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरला. “कांद्याला ३००० भाव द्या”, “शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ देणार नाही”, “हुकूमशाही सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार भगरे , निरीक्षक भूसारे , जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, खासदार बच्छाव, खासदार वाजे, कोंडाजी आव्हाड, माजी आमदार अनिल कदम यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
![]()
![]()
![]()
Advertisement
आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवार यांनी थेट महामार्गावर ठिय्या आंदोलन करत सरकारवर जोरदार टीका केली. “कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी रोहित पवारांसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. निर्यात धोरणातील गोंधळ, व्यापाऱ्यांचे वर्चस्व आणि सरकारची उदासीनता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वारंवार निवेदने देऊनही सरकारने हमीभावाचा निर्णय घेतला नसल्याने अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनात सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग होता. तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी गुंजाळ, कन्हैया लोणारे, कुंडलिक बलक, संजय शिंदे, अर्जुन घोरपडे, एस. पी. शिंदे, पांडुरंग कोकाटे, राहुल पगार, तानाजी वारुग्णसे, संदेश पवार, जयेश सांगळे, राहुल रूपवते, भगवान आव्हाड, अरुण नाईक, बालाजी थोरात, चिंधु गुंजाळ, सुरेश उगले, राजाराम सानप, प्रविण हारक, लक्ष्मण तुपे, राज काहाडळ, वसंत चतूर, साजण चिने, सीताराम वाजे, रतन तुपे, कारभारी वाघ, सुदेश मिठे, बापू सिरसाट, जय गुरुळे, विलास बोडके, वसीम शेख, जयराम खुळे, राजेंद्र शेलार, देवा सानप, वसंत पाटोळे, भिकाजी काकड, रतन जाधव, केरू कुराडे, दिनेश हाटकर, सुका डावरे, सुदाम बोंबले, खंडू पवार, सोमा शिरसाठ, बबन सानप, राघू कातकाडे, सोनू सूर्यवंशी, कैलास हिरे, दामू बिन्नर, जय पानसरे, सुदाम काटे, दया थोरात, तानाजी जाधव, सुकदेव दिघोळे, सचिन आव्हाड, गणेश काळे आदी शेतकरी सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर “शेतकरीविरोधी धोरण” राबवल्याचा आरोप करत, कांद्याला हमीभाव जाहीर होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.







